फ्लेक्स, वापरलेले कपडे, टायर ट्यूब्ज यांची नवी कहाणी : ‘द अदर स्टोरी’

 

आजीच्या साडीची गोधडी, साड्यांचे पडदे, जुन्या कपड्यांपासून पायपुसणी बनताना आपण पाहिलीयेत. सध्या साड्यांचे ड्रेस तयार करण्याचीही चांगलीच चलती आहे. जुन्या कपड्यांपासून सतरंजी, चादर, पर्सेस बनवल्या जातात. याच संकल्पनेला आणखी वेगळ्या उंचीवर नेत वापरलेल्या कपड्यांना फ्लेक्स, टायर ट्यूबच्या पुनर्वापराची जोड देऊन नव्या वस्तू तयार करण्याचं आणि तीच जीवनशैली म्हणून रुजवण्याचा प्रयत्न ‘द अदर स्टोरी’ ही करत आहे.
तन्मयी गीध या नाशिकच्या २५ वर्षीय युवतीच्या कल्पनेतून ‘द अदर स्टोरी’ सुरू झालंय. गेल्या २ वर्षात ३ ते ४ हजार किलो टाकाऊ वस्तू तिने अपसायकल केल्या आहेत. फक्त वापरलेलं कापडच नाही, तर स्थानिक पंक्चर काढणाऱ्यांकडून टायर ट्युब्ज, फर्निशिंग इंडस्ट्रीमधले वाया जाणारे फोम्स, डेनिमच्या फॅक्टरीमधलं वेस्टेज, फ्लेक्स, जाहिरातीचे बॅनर, पॅकेजिंग वेस्ट असं जे काही टाकाऊ साहित्य तिच्याकडे आलं, त्यातून तिने पर्सेस, सॅक, पाऊचेस, वॉलेट्स, लॅपटॉप कव्हर्स, योगा मॅट बॅग, फोल्डर्स अशा अनेक उपयोगी वस्तू तयार केल्या आहेत. यातल्या बऱ्याचशा वस्तू या शहरी कचऱ्यातील अविघटनशील घटक आहेत. त्याच्या पुनर्वापराची कोणतीही समाधानकारक व्यवस्था अजून तरी नाहीये. या वस्तू एकतर कचऱ्यात फेकल्या जातात किंवा भट्टीत जाळल्या जातात. त्या जाळल्यानं वायू प्रदूषणही वाढतं. हे सगळं लक्षात घेऊन तन्मयीने या वस्तूंची निवड केली. आणखी एक महत्वाचं म्हणजे, या सगळ्या प्रक्रियेत तिनं कधीच उत्पादनांचा विचार करून साहित्य जमवलेलं नाही, उलट जे काही आलं टाकाऊ साहित्य आहे, त्याचा वापर कसा करता येईल, हा विचार करून तिनं उत्पादन डिझाईन केलं.


तत्त्वज्ञान विषयात पदवी मिळवलेल्या तन्मयीने टाकाऊ वस्तू, उपयोगी डिझाइन्स यांचा अभ्यास केला, मुंबईत अनेक संस्थांशी चर्चा करून, डझनभर कारागिरांना भेटून कामाला सुरूवात केली. इथं वापरलं जाणारं सगळं सामान वेगळं असणार होतं. त्यामुळेच या प्रकारच्या शिलाईसाठी लागणारा संयम असलेले कारागीर शोधणंही कठिण होतं. त्यात तिला थोड्या अडचणीही आल्या, पण मुंबईतला एक जण तयार झाला. मग कपडे, ट्यूब, फ्लेक्स यांच्या ‘अदर स्टोरी’चा प्रवास सुरू झाला. कारागिरांनी केलेली उत्पादनं अनेक प्रदर्शनामध्ये, ऑनलाईन विकून कारागिरांना योग्य मोबदला मिळवून देण्याचं कामही तिने या काळात केलंय.
तन्मयी स्वतः ट्रेकर असल्याने तिला गड, किल्ले किंवा इतर कुठेही ट्रेकिंगला गेल्यावर तिथला कचरा खूप खटकायचा. यावर आपण काही तरी करायला हवं असं तिला वाटायचं. ती कंटेंट रायटर म्हणून काम करत असल्याने तिला आधी वाटलं, की याबद्दल लिहावं, पण मग तिने ‘द अदर स्टोरी’च्या माध्यमातून एक चळवळ सुरू केली. ‘द अदर स्टोरी’ हे तिच्या फक्त उत्पादनांच्या ब्रँडचं नाव नाहीये, तर ती एका वेगळ्या जीवनशैलीची संकल्पना आहे. यामधून लोकांनी एकदा आमची पर्स विकत घ्यावी हा उद्देश नाही, तर आपली जीवनशैली अधिकाधिक पर्यावरणपूरक करावी असा तिचा हेतू आहे. त्यासाठी ती विविध पर्यावरण विषयक मुद्द्यांवर लिखाण करते, अनेक गोष्टी सोशल मिडीया पेजद्वारे लोकांना सोप्या भाषेत समजावते.
जगभरात सध्या पर्यावरणाचा मुद्दा फारच प्रकर्षानं डोकं वर काढत असताना तन्मयीसारख्या तरुणीनं असा मार्ग निवडावा आणि त्यावर यशस्वीरित्या मार्गक्रमण करत राहणं खूपच आशादायी आहे. या प्रयत्नांना आपणही आपल्या आयुष्याचा भाग करूया, एकदा हौस म्हणून अशा वस्तू वापरण्यापेक्षा कायमसाठी पर्यावरणपूरक जीवनशैली निवडूया!

– अदिती अत्रे, पुणे

Leave a Reply