बातम्या तुमच्या आमच्या मुलांच्या

‘मुलांना शिकवताना कोणती पद्धत सर्वोत्तम ठरेल, याबाबत पूर्वग्रह न बाळगलेले चांगले!’ इंग्लंडमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ बाथमधल्या ‘मिलनर सेंटर ऑफ इवोल्युशनचे ‘संचालक प्राध्यापक लॉरेन्स हर्स्ट यांचं अलीकडच्या प्रयोगाच्या आधारे हे मत.
या केंद्रानं केलेल्या प्रयोगाची बातमी चार दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली आहे. इंग्लंडमध्ये विद्यार्थीकेंद्रित अध्ययनाचा (एखाद्या कृती/उपक्रमात सहभागी होऊन मुलं शिकतात ) दृष्टिकोन प्रचलित आहे.
विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन आणि शिक्षक केंद्रित दृष्टिकोन ( शिक्षक कथन/वाचन करतात) याचं परीक्षण अलीकडेच या केंद्रातल्या संशोधकांनी केलं. प्राथमिक शाळांमध्ये ‘उत्क्रांती’ हा पाठ शिकवण्याबाबतच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास केला. उत्क्रांतीची ह्युमन बेस्ड एक्झाम्पल्स, जसं की मानवी हाडांची प्राण्यांच्या हाडांशी तुलना आणि मुलांना फार जवळची वाटणार नाहीत अशी अमूर्त उदाहरणं (ट्रायलोबाईट्सच्या पॅटर्न्सची तुलना ) यासंदर्भातही तुलनात्मक अभ्यास झाला.
यात वेगवेगळ्या पद्धतींद्वारे मुलांची या पाठाबाबतची समज अधिक पक्की झाल्याचं आढळलं. पण शिक्षकांनी केलेल्या कथनाच्या माध्यमातून, अमूर्त उदाहरणांमधून पाठ मुलांना अधिक चांगल्या प्रकारे समजल्याचा निष्कर्ष अभ्यासकांसाठी आश्चर्यकारक होता. मुलांना समजतील अशी मानवी उदाहरणं अवलंबून विद्यार्थीकेंद्रित अध्ययनाच्या उलट हा निष्कर्ष होता. खरं तर कथनापेक्षा विद्यार्थी ऍक्टिव्हिटीमध्ये गुंततील अशी अपेक्षा होती.
ऍक्टिव्हिटीपेक्षा कथन पद्धतीद्वारे मुलं अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकतात, हा निष्कर्ष जीवशास्त्रातील ‘उत्क्रांती’ या पाठाला लागू झाला. हा निष्कर्ष इतर विषयांना लागू होतो का पाहणे औत्स्युक्याचं ठरेल, असं अभ्यासकांनी म्हटलं आहे.
या अभ्यासात प्राथमिक शाळेतली २,५०० मुलं सहभागी झाली होती. अभ्यास सायन्स ऑफ लर्निंग नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.
अध्यनपद्धतींबाबत सातत्यानं होणारं संशोधन शिक्षक आणि मुलांसाठी उपयोगाचं ठरेल. त्याचबरोबर प्राध्यापक हर्स्ट म्हणाले तसं पूर्वग्रह न बाळगता प्रत्येक मुलाची पद्धत, आकलन, ग्रहणक्षमता याला प्राधान्य शिक्षणात मिळालं पाहिजे.
आपल्या इथे कोविडकाळात शिक्षकांनी अध्यापनाचे विविध प्रयोग केले. हा काळही नवा, पहिल्यांदाच अनुभवत आहोत असा. म्हणून शिक्षकांनीही जुने अनुभव पुसूनच प्रयोग केले.

– नवी उमेद प्रतिनिधी
#नवीउमेद
Department of School Education & Sports, Maharashtra
Varsha Gaikwad