बातम्या तुमच्या आमच्या मुलांच्या

रुचिताला रागही आला होता आणि काळजीही वाटत होती. सकाळची घटनाच सतत आठवत होती. तिचा मुलगा ओम पाचवीत आहे. तिचं आणि नवरा रोहितचं ऑफिस सुरू झालं होतं. ऑनलाईन शाळा, क्लास यामुळे ओमला त्यांनी स्वतंत्र मोबाईल घेऊन दिला होता. तसं पाहायला गेला तर ओम शहाणा, समजूतदार, जबाबदारीनं वागणारा, अभ्यास करणारा. इतके दिवस तरी कुठल्याच तक्रारीचं कारण नसलेला. मोबाईलचा वापर वाढलेला. पण ऑफिसच्या व्यापामुळे आणि आजकाल सगळीच मुलं मोबाईलवर असतात या दृष्टिकोनामुळे रुचिता आणि रोहितचं या गोष्टीकडे दुर्लक्षच झालेलं.
रोहितच्या मोबाईलचा काही तरी प्रॉब्लेम होत होता म्हणून त्याने ओमच्या मोबाइलवरूनच काही वस्तूंची खरेदी केली. त्या वस्तूही लगेच आल्या. त्यानंतर चारपाच दिवसांनी त्याच्या अकाऊंटमधून साधारण दीड हजार डेबिट झाले. ओमने आईबाबांना न सांगताच ऑनलाईन गेम खरेदी केला होता.
ओमसारखी अनेक मुलं ऑनलाईन गेम्सच्या जाहिरातींना भुलत आहेत. शहरी भागात कुठलाही स्तर असो, प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल असतोच. अनेक मुलं गेम्सच्या आहारी गेली आहेत.
या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यातली बातमी लक्ष वेधणारी आहे. ऑनलाईन गेमिंग, काल्पनिक खेळ इत्यादीबाबत दूरचित्रवाणीवर मोठ्या संख्येनं जाहिराती प्रसारित होत आहेत. त्यातल्या बहुसंख्य दिशाभूल करणाऱ्या ,ग्राहकांना आर्थिक आणि इतर धोक्यांची योग्य माहिती न देणाऱ्या असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला आढळलं.
त्यामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. सर्व खाजगी दूरचित्रवाणी प्रसारकांना ऑनलाईन गेमिंग, काल्पनिक खेळांसंदर्भात जाहिरातींसाठी अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टँडर्डस काउन्सिल ऑफ इंडियानं (एएससीआय) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्यास सांगितलं आहे. कायद्याद्वारे प्रतिबंधित कोणत्याही उपक्रमाला जाहिरातीत प्रोत्साहन दिलं जाऊ नये अशी सूचना मंत्रालयानं केली आहे.
एएससीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलं आहे, प्रत्येक गेमिंग जाहिरातीमध्ये पुढील डिस्क्लेमर असणं आवश्यक आहे: “या गेममध्ये आर्थिक जोखीम असते आणि ते व्यसन असू शकते. कृपया जबाबदारीने आणि स्वतःच्या जोखमीवर खेळा”. अशा प्रकारचं डिस्क्लेमर जाहिरातीच्या किमान 20% जागेत असायला हवं. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना “प्रत्यक्ष पैसे जिंकण्यासाठी ऑनलाईन गेमिंग” खेळण्यात सहभागी आहेत असे या जाहिराती दाखवू शकत नाही किंवा असे गेम खेळू शकतील असं सुचवू शकत नाहीत. ऑनलाइन गेमिंगमध्ये रोजगाराचा पर्याय म्हणून उत्पन्नाची संधी मिळू शकते किंवा असे गेम खेळणारी व्यक्ती इतरांपेक्षा यशस्वी असल्याचं जाहिरातीत दाखवू नये.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ग्राहक व्यवहार मंत्रालय, एएससीआय, न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन, इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन, ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन, फेडरेशन ऑफ इंडियन फँटेसी स्पोर्ट्स, आणि ऑनलाईन रम्मी फेडरेशन यांच्या अधिकारी आणि प्रतिनिधींशी सल्लामसलत केल्यानंतर ही सूचना जारी केली आहे.
आजच्या काळात कुठल्याही वयोगटातल्या मुलांना मोबाइलपासून पूर्ण लांब ठेवणं शक्य नाही. पालकांनी स्वतः मोबाईलचा काळजीपूर्वक,सुरक्षित वापर करणं आवश्यक आहेच. पालकांनी जसं मुलांना मोबाईलचा जबाबदार, योग्य आणि प्रमाणात वापर करायला शिकवलं पाहिजे तसंच इतर घटकांनीही यासंदर्भात गांभीर्यानं, जबाबदारीनं वागलं पाहिजे.
-उमेद प्रतिनिधी
#नवीउमेद
Ministry of Information & Broadcasting, Government of India
UNICEF India
Swati Mohapatra