बातम्या तुमच्या आमच्या मुलांच्या

वेश्याव्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोविड-19 च्या प्रादुर्भाव कालावधीत अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. २६ नोव्हेंबरला याबाबतचा शासन निर्णय जारी झाला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर, 2020 या 3 महिन्यांच्या कालावधीसाठी 51 कोटी 18 लाख 97 हजार 500 रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून देण्याचं शासन निर्णयात म्हटलं आहे.
वेश्याव्यवसायात कार्यरत महिला आणि त्यांच्या मुलांना कोविड कालावधीमध्ये अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याबाबत पश्चिम बंगालमधील एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले. त्या अनुषंगानं महाराष्ट्रात तात्काळ कार्यवाही होण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी निर्देश दिले होते.
नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (नॅको) या संस्थेकडून वेश्याव्यवसायात कार्यरत ओळख निश्चित केलेल्या ३२ जिल्ह्यातल्या महिलांना दरमहा 5 हजार रुपये आणि ज्या महिलांची मुले शाळेत जातात अशा महिलांना अतिरिक्त 2 हजार 500 रुपये कोणत्याही ओळखपत्राचा आग्रह न धरता अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
योग्य अंमलबजावणी झाल्यास राज्यातल्या ३०,९०१ महिला आणि ६ ,४५१ बालकांना याचा लाभ मिळू शकतो. यात पुण्यातील सर्वाधिक ७,०११ महिला आणि १,००० मुलं आहेत. नागपूर ६,६१६ महिला आणि २६१ मुलं, मुंबई शहर २,६८७ महिला आणि ५०० मुलं , उपनगर २,३०५ महिला आणि ५०० मुलं ,नाशिक १,६३० महिला आणि ५७१ मुलं, पालघरमधल्या १,५५३ महिला, लातूरमधल्या १,१४२ महिला अशी आकडेवारी आहे.
सर्वाधिक मुलं नांदेड जिल्ह्यात (१,६२९) आहेत.
वेश्या ,त्यांची मुलं हे अनेकांच्या दृष्टीनं तिरस्काराचे विषय. त्यांना कशाला मदत? या महिला दुसरा व्यवसाय करू शकत नाहीत का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. कारणं अनेक असतील पण अद्याप तरी आपण वेश्याव्यवसाय थांबवू शकलेलो नाही, नजीकच्या काळात तो थांबवू शकू असं दिसत नाही. या व्यवसायातल्या बहुतांश महिला पळवून, फसवून आणलेल्या अत्यंत दारिद्र्यातून आलेल्या. आपण कुठून आलोय, कुठे आहोत अशा प्राथमिक गोष्टीही सांगता न येणाऱ्या, माहीत नसलेल्या. कुठलाही हक्काचा निवारा नसलेला. आहार, आरोग्य या सर्वच हक्कांपासून एरवीही वंचित. या व्यवसायाला गुन्हेगारीचा पैलू आहेच.
या सगळ्यात भरडली जातात ती यातून जन्माला आलेली बालकं. त्यांच्याप्रती आपला मानवतेचा दृष्टिकोन, मानवतेचा दृष्टिकोन ठेवून घेतलेले निर्णय त्यांना यातून बाहेर पडण्यास मदत करू शकतात.
कोविडच्या काळात संपूर्ण मानवजात भरडली गेली असताना समाजातल्या या सर्वात वंचित घटकाला मदत आवश्यक आहे.

-उमेद प्रतिनिधी