बातम्या तुमच्या आमच्या मुलांच्या
मुसळधार पाऊस पडत होता. भर दुपारी अंधारून आलं होतं. पाणीही साचू लागलं होतं. अमृता तिच्या पाच वर्षांच्या मुलाला रिद्धांतला शाळेतून घेऊन येत होती. कधी घरी पोहोचतोय असं झालं होतं. फूट- अर्धा फूट साचलेल्या पाण्यानं वाहनांचा वेग मंदावला होता. ‘बरं झालं, आज घरी होतो, नाहीतर एवढ्या पावसात रिद्धांत …. ‘ अमृता विचार करत होती. तोच कानावर आवाज पडला , ”आंटी, कुछ दे दो ना … ” समोर रिद्धांतएवढीच चिंब भिजलेली मुलगी न तिच्या कडेवर आणखी छोटं मूल. रिक्षा वेग घेत असतानाच अमृतानं पटकन पर्समधली नोट दिली.
अमृताला हा प्रसंग आठवण्याचं कारण म्हणजे तिच्या वाचनात आलेली बातमी. बंगळुरूमध्ये महानगरपालिका, रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांना शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार आहे. यासाठी सिग्नल, बाजारपेठा, झोपड्यांमध्ये व्यापक सर्वेक्षण केलं जाणार आहे. यासाठी आतापर्यंत ४८ स्वयंसेवी संस्था पुढे आल्या असून त्यांची एक दिवसाची कार्यशाळाही झाली आहे.
 
मुलं भीक मागण्यामागच्या कारणांचा शोध घेण्याची गरज तिथल्या महानगरपालिका आयुक्तांनी व्यक्त केली आहे. नेमकं कारण समजेल तेव्हाच मुलांनी भीक मागण्याचे प्रकार आपण थांबवू शकू आणि मुलांना भीक मागायला लावणाऱ्यांचे चेहरे उघड करू शकू, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
मुंबईसारख्या महानगरांमध्ये भीक मागणं, हा मोठा धंदा आहे. मुलांचा त्यासाठी होणारा वापर, आपण पैसे किंवा खाऊ काही दिलं तर या प्रकारांना अधिक चालना मिळते, आणखी मुलांना आपण अशा संकटात ओढतो.. न अशाच काही इतर शहाणपणाच्या,व्यावहारिक गोष्टी आपण ऐकून असतो. त्यात तथ्यही आहेच. पण आपण प्रत्येक जणच कधी ना कधी अमृताप्रमाणे अशा संवेदनशील प्रसंगांना सामोरं जातो की त्या क्षणी आपण शक्य ती मदत, खाऊ देतोच.
भीक मागणाऱ्या मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आपल्या इथेही काही प्रमाणात आहेत. पण एकंदरीतच या प्रकारांशी जोडले जाणारे अनेक पैलू पाहता शासकीय यंत्रणांनी बंगळुरू महानगरपालिकेप्रमाणे अधिक सक्रिय पावलं उचलण्याची गरज आहे.
– नवी उमेद प्रतिनिधी

Leave a Reply