बातम्या तुमच्या आमच्या मुलांच्या

 

गरीब, स्थलांतरित शाळा सुटलेल्या मुलांचा,पालकांचा विश्वास टिकायला हवा

अलका एका खासगी हॉस्पिटलमध्ये सफाईकाम करते. कामावर जाणं तिला भागच. मुलाला धोका नको आणि त्याच्याकडे इथे बघायला कोणीच नाही म्हणून त्याला कधीच गावाला आईकडे पाठवून दिलेलं. आईच गाव एकदम खेडं. तिथे एरवीही शिक्षणाचा प्रश्नच. कोविडच्या काळात तर कसलीच सोय नाही. त्यामुळे बरेच महिने मुलाचं शिक्षण थांबलेलंच. अलकाला आता मात्र मुलाच्या शिक्षणाचं पुढे काय , अशी चिंता वाटू लागली आहे.
कोविड १९ साथीचा परिणाम शिक्षणावर होऊ नये, यासाठी या काळात अनेक पावलं उचलली गेली. शिक्षकांचे जीवतोड प्रयत्न सुरूच आहेत. पण तरीही अलकासारख्या काही गोरगरीब पालकांची मुलं , स्थलांतरित यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहेच. यातून शाळागळतीचं प्रमाण वाढण्याचा धोका आहे.
या पार्श्वभूमीवर कोविडमुळे शाळाबाह्य झालेल्या मुलांच्या शिक्षणातली आव्हानांची तीव्रता कमी व्हावी, यासाठी विशेष प्रयत्नांची गरज केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं व्यक्त केली आहे. या दृष्टीनं स्थलांतरित मुलांची ओळख, प्रवेशप्रक्रिया आणि त्यांचं शिकणं पुढे सुरू राहावं यासाठी शिक्षण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तीनच दिवसांपूर्वी या संबंधीची बातमी आली आहे.
गुणवत्तापूर्ण आणि समान शिक्षण मुलांना मिळावं, यासाठी या सूचनांमध्ये विचार करण्यात आला आहे.
शिक्षण सुटलेल्या मुलांची ओळख पटवण्यासाठी ६ ते १८ वयोगटातल्या मुलांचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण, नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला नावनोंदणी मोहीमा, मुलांच्या उपस्थितीबाबत पालक आणि वस्तीस्तरावर जागृती, मुलांचं समुपदेशन आणि त्यांना मानसिक, सामाजिक आधार, शैक्षणिक साहित्याचं वितरण, गृहभेटीद्वारे त्यांना अभ्यासात मदत, फिरत्या शाळा, छोटे गट करून शिकवणं, विशेष गरज असलेल्या मुलींना वेळेवर शिष्यवृत्ती, स्थानिक स्तरावर बाल सुरक्षा यंत्रणा बळकट करणं, सुरुवातीच्या दिवसात मुलांना शाळेच्या वातावरणाशी जुळवून घेता यावं, त्यांना ताण येऊ किंवा वेगळेपणाची भावना निर्माण होऊ नये यासाठीची तयारी, उत्तीर्णतेच्या नियमांमध्ये शिथिलता, अवांतर वाचन, सर्जनशील लेखन, संख्यात्मक कौशल्य विकसित करणं आणि एकूणच शिक्षणातलं या मुलांचं नुकसान भरून काढणं, अशा काही मुद्द्यांचा या सूचनांमध्ये विचार आहे.
कोविड साथीच्या परिस्थितीमुळे शिक्षण सुटलेल्या मुलांचा, त्यांच्या पालकांचा पुढे शिकण्याविषयीचा आत्मविश्वास, इच्छाशक्ती टिकायला हवी. शाळा सुरू झाल्यावर इतर मुलांच्या तुलनेत आपण मागे पडलोय, या विचारानं त्यांचं खच्चीकरण होऊ नये, त्यांचं शिक्षण सुरू राहावं, यासाठी सर्व स्तरातून व्यापक प्रयत्नांची गरज आहे.

-नवी उमेद प्रतिनिधी

Leave a Reply