बातम्या तुमच्या आमच्या मुलांच्या

आपल्या परिसरात चिमुरड्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजना आहेत का?

5 वर्षांच्या त्रिशानं घटाघट दूध प्यायलं आणि धावतपळत ती खेळायला बाहेर पडणार तोच तिच्या आईने अदितीने तिला अडवलं. ”आपल्या गॅलरीसमोरच खेळायचं. कुठेही इकडेतिकडे जायचं नाही. कोणी खाऊ,चॉकलेट दिलं तरी घ्यायचं नाही. कुणाशी उगीच बडबडत बसू नको. मी येतेच .. .. ” तिच्या सूचना पूर्ण होण्याआधीच त्रिशा बाहेर पडली होती. खरं तर या सूचना ऐकण्याचं,समजण्याचं त्रिशाचं वय नाही , तिचं वय मनमुराद हुंदण्याचं,तमा न बाळगता खेळण्याचं,याची जाणीव अदितीलाही होती. पण नुकत्याच वाचलेल्या बातमीनं ती अस्वस्थ झाली होती.
अदितीच काय प्रत्येक स्त्रीच्या मनात अवतीभवतीच्या चिमुरड्यांविषयी चिंता निर्माण होईल अशीच ती बातमी होती. नवीन वर्ष उजाडायला दोन दिवस बाकी असतानाच ती बातमी आली होती. पेणमधल्या मळेघरवाडीत 3 वर्षांच्या आदिवासी मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. ती राहत असलेल्या झोपडीला दार नव्हतं. आरोपीनं रात्री झोपडीत शिरून झोपलेल्या मुलीला उचलून नेलं. आरोपीवर या पूर्वीही अशा स्वरूपाचा न इतरही गुन्हे होते आणि तो पॅरोलवर सुटला होता, असेही बातमीत होते.
अदिती विचार करू लागली, ती मुलगी राहत असलेलं घर, तिच्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीनं काहीच तरतुदी नव्हत्या. मुलींच्या एकंदरीतच लहान मुलांच्या दृष्टीनं आपल्या परिसरात सुरक्षेच्या काय उपाययोजना आहेत?
अनेक ठिकाणी सीसीटीव्हीदेखील नाही. तिच्या घरी मदतीला येणाऱ्या मंदाच्या 10 वर्षांच्या मुलीला दीपिकाला शाळेतून घरी एकटीला यावं लागतं. अर्धा रस्ता सोबत मैत्रिणी असतात, पण पुढे दीपिका एकटीच. रस्त्याला वर्दळही कमीच, वाटेत तिला काही मदत लागली तर?अशा अनेक बाबी अदितीला आठवू लागल्या. तिने लगेचच या गोष्टींबद्दल पत्रव्यवहार करायचं ठरवलं.
या दृष्टीनं कायदाही तितकाच कडक हवा आणि त्याची अंमलबजावणीही काटेकोर व्हायला हवी. महाराष्ट्रात यासाठी शक्ती कायदा येत आहे, ही दिलासादायक बाब आहे. हा कायदा अधिक प्रभावी व्हावा याकरिता नागरिकांनीही सूचना पाठवण्याचं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. विधेयकाची प्रत www.mic.org.in या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध आहे.संबंधितांनी आपल्या सूचना, सुधारणा निवेदनाच्या स्वरूपात तीन प्रतीमध्ये विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत, विधानमंडळ, बॅकबे रिक्लेमेशन मुंबई इथे किंवा a1.assem-bly.mis@gmail.com या ईमेलवर 15 जानेवारी, सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन देशमुख यांनी केलं आहे

Leave a Reply