काल होता 12 जून म्हणजे आंतरराष्ट्रीय बालकामगारविरोधी दिवस. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने 2002 मध्ये या दिनाची सुरूवात केली.
म्हणजेच गेल्या सुमारे वीस वर्षांपासून बालकामगारांच्या समस्येवर अनेक संस्था, संघटना, यंत्रणा, कायदे ऑफिशियली काम करीत आहेत. पण आपण आजूबाजूला जर डोळस नजरेनं पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की बालकामगारांची संख्या घटण्याऐवजी वाढतेच आहे. दुर्देवाची गोष्ट ही आहे की, आपल्या देशात बालमजुरांना प्रचंड प्रमाणात मागणी आहे. त्यातही आणखी वाईट गोष्ट म्हणजे कित्येकांची खरेदी- विक्री होऊन त्यांना बालकामगार म्हणून कामाला जुंपलं जातं. बालमजुरीत गरीब कुटुंबातील मुलं तर आहेतच पण काही ठिकाणी मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय घरातली मुलं ही आहेत.
आता आपण पाहूया बालकामगार कोणाला म्हणतात ते- जर एखाद्या मुलाने स्वत: किंवा मुलांकडून इतर व्यक्तीने असं एखादं काम करवून घेतलंय, की ज्याचा मुलाला थोडाफार मोबदला मिळतो, पण बालक म्हणून त्याच्या हक्कांवर गदा येत असेल आणि बालकाच्या शारीरिक, मानसिक, भावनिक विकासात या कामाने बाधा येत असेल तर आपण त्या बालकाला ‘बालकामगार’ असे संबोधतो.
या बालमजुरीची कारणं काय असतील असं तुम्हांला वाटतं? पहिलंच कारण डोक्यात आलं असेल, ते गरिबीचं. अगदी बरोबर, घरात मुलं जास्त, खाणारी तोंडं जास्त आणि कमावणारी कमी अश्या वेळेला घरातल्या बालकांना शिक्षण वगैरे सोडून लहान वयातच बालमजुरीला लागावं लागतं, हे महत्त्वाचं कारण आहे. पण याला अपवाद असणारी अशी किती तरी कुटुंबं आहेत, जी गरिबीत कष्टांत दिवस काढतात, पण मुलांना कामाला लावत नाहीत, त्यांचं शिक्षण सुरू ठेवतात.
त्यामुळे गरिबी हे एक कारण आहेच पण आणखीही काही कारणं असतात. उदा. शिक्षणाचा अभाव, शिक्षणात रस नसणे, अपुऱ्या सुविधा, पालकांना योग्य प्रमाणात वेतन न मिळणे, घरातले कटकटीचे वातावरण, सिनेमा किंवा इतर बाबींचे आकर्षण इ. दुसरीकडे मुलांना बालकामगार म्हणून कमी पगारात राबवून घेता येते. मुलांवर मालकी हक्क गाजवता येतो, रागावता येतं, प्रसंगी मारहाण करता येते, आणि वय लहान असल्याने मुलं घाबरून उलट उत्तरंही देत नाहीत. त्यामुळे मुलांचं मानसिक, शारीरिक प्रसंगी लैंगिक शोषण करणं तथाकथित मालकांना खूप सोप्पं जातं.
मुलं जेव्हा कुटुंबात असतात, तेव्हा त्यांना सर्वांगिण विकासासाठी बहुतांश वेळा योग्य वातावरण मिळते. त्यांच्यावर प्रेम करणारी, त्यांची काळजी घेणारी, मानसिक आधार देणारी, त्यांना सकस आहार आणि औषधोपचार पुरवणारी माणसं घराच उपलब्ध असतात.
पण बालमजुरांना हे सगळं प्रेमाचं, मायेचं, विकासाचं वातावरण मिळतं का? उत्तर आहे – नाही. शिवाय कामाच्या ठिकाणी त्यांच्या मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण होत नाहीत. पोटभर पुरेसं खायला मिळणं, विश्रांती मिळणं हे तर विसराच, सतत आरडाओरडा, दडपणाखाली वावरावं लागणं, त्यांच्यावर चोरीचा आळ घेणं, मारहाण, शिवीगाळ, अपुरं जेवण, क्वचित लैंगिक शोषण याही गोष्टी सर्रास घडतात.
मग ही मुलं या दुष्टचक्रातून बाहेर कशी पडणार?
खरंतर बालकामगारांना असं राबावं लागू नये म्हणून कायदे आहेत, अनेक यंत्रणा सुद्धा काम करीत आहेत. जिल्हा पातळीवर मुलांसाठी बालकल्याण समिती, बालकल्याण पोलीस अधिकारी हे प्रत्येक पोलीस ठाण्यात असतात. तसंच जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी त्यांच्या अध्यक्षतेखाली बालमजुरीविरोधी कृती दल आणि बालसंरक्षण कक्ष असतो. कामगार विभाग, विशेष बाल पोलीस दल हे सुद्धा कार्यरत असतात.
या सर्व यंत्रणा एकत्रित येऊन काम करतात. तसे पोलीस या पूर्ण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. बालकामगार म्हणून अडकलेल्या मुलांना सुरक्षितपणे सोडवून, पोलिस मालकांवर योग्य कारवाई करतात. आपल्या भारतात बालकामगार कायदा 2016 आणि Juvenile Justice Act 2015 हे बालमजुरीविरोधात महत्त्वाचे कायदे आहेत. या कायद्याच्या मदतीने कार्यवाही केली जाते.
आता पाहुया, आपण काय करू शकतो?
आपण डोळस नागरिक म्हणून बरंच काही करू शकतो. त्यासाठी प्रत्येक मुलाला जगण्याचा, सुरक्षेचा, विकासाचा आणि सहभागितेचा अधिकार आहे, हे समजून घेऊयात आणि त्यासाठी प्रयत्न करूयात. आपल्या आजूबाजूला म्हणजेच सोसायटीमध्ये, दुकानांत, हॉटेल्स, कारखाने इ. मध्ये लहान मुलं काम करताना दिसली तर त्यावर आक्षेप घ्या. तिथल्या मालकांशी किंवा जबाबदार व्यक्तीशी बोलून 18 वर्षे वयाखालील मुलं कामावर ठेवणं हा गुन्हा आहे, याची जाणीव त्यांना करून द्या.
हे एकीकडे करत असतानाच, त्या मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या या बालमजुरीतून सुटकेसाठी शासकीय यंत्रणा किंवा योग्य एनजीओकडे संपर्क साधणे, हे पुढाकार घेऊन तुम्ही करू शकता, अर्थात त्यासाठी तुम्हांला या यंत्रणांची आमि स्वयंसेवी संस्थांची माहिती करून घ्यायला हवी.
अश्या दुर्बल स्तरातून आलेल्या आणि अडचणीत सापडलेल्या प्रत्येक बालकाची सुरक्षा आणि जबाबदारी ही आपलीच आहे, अशी आपली मानसिकता असायला हवी.
मुलांच्या अधिकारांसाठी काम करताना अनेक केसेस हाताळल्या पण एक केस तुम्हांला सांगावीशी वाटतेय. आम्ही बालकांच्या अधिकारासाठी काम करतो हे माहीत असल्याने आम्हांला बालकामगारांची माहिती देणारे अनेक फोन यायचे. अश्याच एका जागरूक नागरिकाने कळवले की अमुक- अमुक सोसायटीत एका कुटुंबात 13 वर्षांची एक मुलगी- पूजा घरकाम करते. तिला स्वयंपाकापासून ते साफसफाईपर्यंत खूप राबवलं जातं. आमची टीम लगेच कामाला लागली आणि आम्ही प्रथम माहिती पडताळून, व्यवस्थित चौकशी केली. ही माहिती सत्य असल्याची खात्री होताच, आम्ही स्थानिक पोलिसांची मदत घेतली. पोलिसांच्या मदतीने आम्ही किशोरवयीन पूजाला त्या घरातून सोडवले. पूजा खूप घाबरली होती, तिला शांत करून विश्वासात घेऊन गप्पा मारल्या, तेव्हा समजलं की, गावावरून पूजाला शहरात आणलं तेव्हा तिला भरपूर शिकवू, शाळेत पाठवू असं आश्वासन तिच्या आई- वडिलांना दिलं गेलं. पण प्रत्यक्षात शहरात आणल्यावर शाळा वगैरे काही घडलंच नाही, पूजाला फक्त आणि फक्त राबवून घेतलं गेलं.
पूजाच्या सुरक्षेसाठी आम्ही तिला बालगृहात ठेवलं आणि नंतर बालसंरक्षण समितीसमोर तिला सादर केलं. समितीने तिच्या सुरक्षिततेसाठी तिच्या पालकांना बोलावून घेतलं. आणि त्यांना तिच्या पुनर्वसनाचे योग्य मार्गदर्शन करून पूजाला घरी घेऊन जाण्यास सांगितलं. पूजाला शाळेत जाऊ द्या, हे अगदी बजावून सांगण्यात आलं. पूजा जेव्हा आपल्या गावी परतली तेव्हा सुद्धा त्या जिल्ह्यातल्या संस्थांना पूजाचं सगळं व्यवस्थित चालू आहे ना, याचा पाठपुरावा करायला सांगितलं होतं. त्यानुसार माहिती मिळाली की पूजा आता शाळेत नियमित जातेय आणि पालकही तिची योग्य काळजी घेत आहेत.
अश्या कित्येक पूजांना बालमजुरीच्या विळख्यातून सोडविण्याचे काम अनेक स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणा आणि काही डोळस नागरिक करत आहेत. मला खात्री आहे, याकामात तुम्हीही नक्की साथ द्याल. संवेदनशील आणि जागरूक नागरिकांची बालमजुरीचा विळखा कमी करण्यासाठी फार गरज आहे.
(पुनर्वसन झालेल्या बालकामगार मुलीचे नाव लेखात बदलण्यात आले आहे)
लेखन- स्नेहलता बुरूटे, अर्पण (बाललैंगिक शोषणातून मुक्तीसाठी कार्यरत संस्था, मुंबई)
#नवी_उमेद
#World_Day_Against_Child_Labour
#बालमजुरीलाविरोध
#शिक्षण_संधी_प्रत्येकाचा_हक्क
#जबाबदार_बनूया
#बालमजुरी_थांबवूया