तुम्हांला देवी रोग माहिती आहे? भयंकर वेदनादायी असलेल्या या रोगात त्वचेवर पुरळ यायचे, त्यात पाणी भरायचे, खूप त्रास व्हायचा, क्वचित नाका- तोंडातून रक्तस्त्राव व्हायचा आणि बरेचदा माणसं त्यात दगावायची, कित्येकांना अंधत्व यायचं. जगभरातील अनेक लोक यानं जुन्या काळात दगावले आहेत, किंवा त्यांना कायमचं अंधत्व आलं होतं. पण हे सगळं थांबलं ते शास्त्रज्ञ एडवर्ड जेन्नर यांनी शोधलेल्या ‘देवी’ वरच्या लसीने. तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिकांनी नक्कीच ही लस घेतलेली असणार. भारतात हा रोग देवीच्या (मरिआई, शितलादेवी इ./ स्थानिक देवतांच्या) कोपातून होतो, अशी अंधश्रद्धा होती. सुरूवातीला लस घेण्यासाठीही लोकांचं प्रबोधन करावं लागे, पण सुदैवाने विज्ञानाच्या साथीने हा रोग भारतातूनच नाही तर आता जगातून हद्दपार झालाय.
“वैज्ञानिकांनी आणि डॉक्टरांनी अखंड मेहनतीतून तयार केलेल्या लसी हे मानवजातीच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी खरोखरच एक वरदान आहे. त्यामुळेच आज देवी असेल किंवा पोलिओ हे रोग भारतातून 100 टक्के नष्ट झाले आहेत, असं आपण अभिमानाने सांगू शकतो. बाळ जन्माला आल्यानंतर त्याचे योग्य ते लसीकरण होणे अत्यावश्यक असते. हे लसीकरण अनेक असाध्य रोगांपासून बालकाचे रक्षण तर करतेच, पण त्याचे आयुर्मान वाढण्याची, रोगमुक्त जीवन जगण्याची संधी हे लसीकरण देते” असं रत्नागिरीचे बालरोगतज्ज्ञ डॉ. संतोष बेडेकर सांगत होते.
बाळांचे वेळच्यावेळी लसीकरण गरजेचे आहे
बालकाच्या प्राथमिक लसीकरणात बीसीजी, पोलिओ, घटसर्प, कावीळ, धनुर्वात, डांग्या खोकला, कावीळ ब, गोवर या महत्त्वाच्या रोगावरच्या लशी आहेत. यासोबतच डायरिया अर्थात हगवणीवरची रोटा व्हायरस आणि न्युमोनिया वरची लसही शासकीय आरोग्य केंद्रात आणि खाजगी दवाखान्यातही उपलब्ध असते. बाळ जन्माला आल्यानंतर एक वर्षाच्या आत बहुतांश रोगांवरच्या लसी, ठराविक अंतराने दिल्या जातात. मुलांना दीड वर्षे आणि पाचव्या बूस्टर डोस दिला जातो. बाळ जन्माला आल्यावर लगेचच बीसीजी डोस दिला जातो, जवळपास सर्व खाजगी, शासकीय प्रसूती रुग्णालयात लसीकरण उपलब्ध आहेत.
अगदी खेडोपाडीही प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यातून ठराविक दोन दिवशी या लसी उपलब्ध असतात. आशा सेविका, अंगणवाडी ताई, आरोग्य केंद्रावरच्या परिचारिका या गावातल्या सर्व मुलांना लसी मिळतायत ना, याबद्दल दक्ष असतात. त्यांच्या पालकांचे प्रबोधन, लस मिळालेल्या मुलांची यादी अपडेट ठेवणे, कुणाला लस मिळाली नसेल तर ते बाळ लस घ्यायला का आलं नाही, याचा पाठपुरावा करणं ही महत्त्वाची कामं या आशा सेविका, अंगणवाडी ताई आणि परिचारिका करतात. ग्रामीण भागात बालकांचे आयुर्मान वाढवण्यात आणि त्यांना सुदृढ करण्यात, यांच्या प्रयत्नाचा मोठा वाटा आहे, डॉ. बेडेकर सांगत होते.
डॉ. बेडेकर पुढे सांगतात, “लहान बालकं दगावण्याच्या काही कारणांपैकी दोन प्रमुख कारणं म्हणजे- डायरिया/ अतिसार/ हगवण आणि लहानपणी होणारा न्युमोनिया. विषाणूंमुळे होणाऱ्या डायरियामुळे सातत्याने बाळाला उलट्या- जुलाब लागतात, पोटात अन्न- पाणी काहीच टिकत नाही आणि शरीरातील पाणी कमी होऊन विषाणूंच्या हल्ल्याने बाळ दगावण्याचीही शक्यता असते. पण यावरील रोटा व्हायरसची लस आता आपल्याकडे उपलब्ध आहे, बाळ जन्मल्यानंतर सहा महिन्यांच्या आत, याचे दोन डोस घ्यायचे असतात. तसंच बाळ लहान असताना होणाऱ्या न्युमोनियात बालकाच्या फुफ्फुसात पाणी होऊन बाळ दगावण्याची शक्यता असते. पण मुळात हा रोगच होऊ नये याकरिता बाळ दीड महिन्याचे, अडीच महिन्याचे आणि साडेतीन महिन्याचे असताना प्रत्येकी एक एक लस दिली जाते. या लशी बाळांना जीवघेण्या आजारांच्या संसर्गापासून वाचवतात”
“लसीकरण हे अत्यंत प्रभावशाली असतं. दोन वर्षांपूर्वी केंद्रीय आरोग्य विभागाच्या एका योजनेअंतर्गत, राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सर्व शासकीय शाळांमध्ये एमआर कॅम्पेन राबवले . एमआऱ म्हणजे ‘मिझेल्स अँन्ड रूबेला’ अर्थात ‘गोवर आणि कांजिण्यां’वरील लस. 14-15 वर्षे वयापर्यंतच्या सर्व मुलांना याच्या लसी शाळांतून दिल्या गेल्या. त्यानंतर केलेल्या सर्वेक्षणात गोवर- कांजिण्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झालेले आहे. फक्त सर्वेक्षणच नव्हे तर खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या आम्हां डॉक्टरांनाही, या रोगाचे प्रमाण कमी झालेले जाणवते” डॉ. बेडेकर सांगत होते.
याशिवाय खाजगी दवाखान्यात टायफॉईड , कावीळ अ, चिकन पॉक्स, माकडताप यावरील लसीही उपलब्ध असतात. डॉ. बेडेकर म्हणतात, “सुदैवाने आजकाल तरूण पालकांना लसीकरणाचे महत्त्व कळतेय. अगदी ग्रामीण आणि दुर्गम भागांतही लसीकरणाला क्वचित विरोध होतोय. पूर्वी साठ- सत्तर टक्क्यांवर असलेलं लसीकरणाचं प्रमाण आता नव्वद टक्क्यांवर आलंय. तरीही संपूर्ण 100 टक्के लसीकरण गाठण्यासाठी प्रत्येक पालक जागरूक असायला हवा. तुमच्या मुलांचे वेळेत आणि योग्य ते लसीकरण जरूर करा, ते चुकवू नकात, त्याने तुमच्या बाळाचं आयुष्य वाढणार आहे, ते रोगमुक्त राहिल्याने आनंदी आयुष्य जगू शकेल.”
लेखन: काशी विनोद, रत्नागिरी
नवी उमेद कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक: https://naviumed.org/support/