बॅडमिंटन चॅम्पियनचा पिता म्हणून मीच घडत गेलो

बॅडमिंटन चॅम्पियनचा पिता म्हणून मीच घडत गेलो, असं मला वाटतं. अमन जन्मला तेव्हा आम्हा दोघांपैकी मी त्याच्या संगोपनासाठी अधिक वेळ देणार, हे ठरलं होतं. त्याच्यातला क्रीडापटू फार लवकर आमच्या लक्षात आला कारण आम्ही त्याच्याबरोबर बॅडमिंटन खेळायचो. मग त्याला उत्तम प्रशिक्षण द्यायचं ठरलं. ठाण्यात ‘दादोजी कोंडदेव स्टेडियम’मध्ये ते सुरू केलं. कुटुंबाचे दैनंदिन व्यवहार मग ह्या कोचिंगला अनुसरून आखले. आम्ही पनवेलमध्ये राहात होतो. आठ वर्षांच्या अमनला कोचिंगसाठी पहाटे साडेपाचला निघावं लागायचं. आधी उठून त्याचा डबा तयार करून मी त्याला उठवायचो. आमच्याकडे गाडी होती. मी चालवायचो नि तो स्टेडियम येईपर्यंत झोप काढायचा. स्टेडियममध्ये त्याचा सराव सुरू असताना मी लॅपटॉपवर, फोनवरून माझं काम करत बसायचो. फ्री लान्स पद्धतीचं काम मी निवडलं होतं. सामाजिक काम हे माझं ध्येय मी या वेळापत्रकात बसवू शकत होतो. राज्य पातळीवर खेळत असताना अमनच्या टूर्नामेंट जिल्ह्यांत असायच्या तेव्हा मी त्या त्या जिल्ह्यांतली कामं जोडून घ्यायचो. शाळेनं अमनला सरावासाठी सूट दिली होती. त्याचा तो योग्य उपयोग करत होता. तरीही ठाण्याचं दादोजी कोंडदेव स्टेडियम लांब पडायचं. म्हणून ठाण्यात राहायचं ठरवलं. तिथे माझं वर्तुळ नव्हतं. जाण्यायेण्याच्या वाटा बदलल्या. फार दिवस त्या वातावरणात राहू शकलो नाही. परत पनवेलला आलो.
दरम्यान मी ‘प्रथम’मध्ये पूर्ण वेळ काम सुरू केलं होतं. मी कामात अधिक व्यस्त नि अमनही मोठा बऱ्यापैकी स्वतंत्र झालेला.


त्याच्यावर संस्कार असे काही वेगळे केले नाहीत. ‘फुले-आंबेडकरी चळवळीचा वारसा’ वगैरे माझ्या मनात नसतं. पण माझ्या कामांचा विषयच सामाजिक असल्याने अमनला समानता, मूलभूत हक्कांविषयी माहिती आहे. २६ जानेवारी हा संविधान दिन कसकसा महत्त्वाचा आहे, हे त्याला आईमुळे माहीत आहे. क्लास वन अधिकारी या नात्याने सरकारी कार्यालयांत तिच्या हस्ते झेंडावंदन व्हायचं. आम्ही सगळेच कार्यक्रमाला असायचो. या वातावरणाचे संस्कार त्याच्यावर आहेत. आमच्याकडे पूर्णवेळ कामाला असणाऱ्या मुलीचं शिक्षण अर्ध्यावर सुटलंय. हा म्हणतो, तिला आपण नाइट कॉलेजमध्ये घालू. तिला चांगला जॉब शोधता येईल…
टूर्नामेंटमध्ये यशस्वी होण्याची त्याला सवय आहे. मात्र २००६मध्ये तो अंडर १० गटात रनर अप ठरला. अव्वल न आल्याचं खापर तो परिस्थितीवर फोडू लागला. तेव्हा मी त्याला सांगितलं, कोणत्या मूव्ह चुकल्या होत्या त्या हेरून त्यावर मात कशी करता येईल, याचा विचार करण्यासाठी हा वेळ, शक्ती खर्च कर. नंतर कधीही त्यानं आरोपवजा तक्रारी केल्या नाहीत.
शाळेत तो फार हजर नसल्यामुळे त्याला मित्र फारसे नाहीत. माझ्या मित्रांच्या मुलांबरोबर मात्र त्याचं छान शेअरिंग असतं. त्यामुळे पिअर ग्रुपची गरज भागते.
आई म्हणजे वात्सल्य नि वडील म्हणजे भावनेपेक्षा कर्तव्यबुद्धी असा सर्वसामान्य समज. पण आमच्या बाबतीत उलटं आहे. मी भावनिकपणे सगळं हाताळतो. अमनला माझ्या वात्सल्याची अधिक सवय आहे. आणि तोही मला नेमकं ओळखतो. मला वैचारिक पुस्तकांची भेट त्यानं अनेकदा दिली आहे. मी त्याचं सगळं सहजपणे करू शकलो कारण माझ्या आईनं बहिणींच्या बरोबरीनं मलाही घरकाम शिकवलं होतं. सगळ्यांना सगळी कामं यावीत, असं तिचं म्हणणं. त्याचं फळ मला पालकत्व एंजॉय करताना मिळालं.
एकल पालकत्व वाट्याला आलं तेव्हा मात्र कमावत्या पालकाची उरलेली ५० टक्के भूमिकाही करावी लागली. पूर्णवेळ काम करून ती निभावण्याचा प्रयत्न करत आहे. अमनला गरजेपुरता स्वयंपाक येतो. प्रशिक्षणासाठी देशापरदेशात महिना महिना राहायचं तर कपडे धुणं, घराची स्वच्छता या बाबतीत तो परावलंबी नाही. हे सगळं शिकताना आमच्यात खटके असे कधी उडाले नाहीत.
२०१६मध्ये चंदीगढ इथं त्यानं नॅशनल चॅम्पियनशिप पटकावली. ठाणे डिस्ट्रिक्ट टूर्नामेंटमध्ये तर अंडर १७ फायनल, अंडर १९ फायनल जिंकण्याबरोबर मेन्स ओपनमध्येही त्यानं चमक दाखवली आहे. त्याच्या यशाबरोबर माझ्यासमोरचं आव्हानही मोठं होत आहे.

प्रवास पालकत्वाचा: संजय लोखंडे

शब्दांकन : सुलेखा नलिनी नागेश