बैलगाड्यांनी हाकला भटू-भारतीच्या संसाराचा गाडा
धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातलं साधारण १७५० घरांचं कासारे गाव. तालुक्यापासून साधारण १० किमी अंतरावरचं हे गाव.  इथे राहणारे भटू आणि भारती. शेतीवर त्यांचा चरितार्थ चालत असे.
 मात्र कोरोना सुरू झाला आणि शेतीची गणितं  बदलून गेली. घराबाहेर पडणं मुश्किल झाल्यानं  आणि शेतीवर चरितार्थ चालवणं  कठीण होत असल्यानं, या दांपत्यानं  उत्पन्नाचं नवं  साधन शोधण्याचा निर्णय केला. साक्री तालुक्यासारख्या आदिवासीबहुल भागातील कासारे गावात काय उद्योग करता येईल? असा प्रश्न दोघांना पडला. जो काही उद्योग करायचा तोनाविन्यपूर्ण हवा  आणि स्थानिक पातळीवरती त्यासाठी कच्चामाल उपलब्ध झाला पाहिजे असा विचार करत असतानाच, भटू आणि भारतीला लाकडी बैलगाड्या  करण्याचा विचार सुचला.  शोभेच्या वस्तू म्हणून भेट देता येतील आणि सहज हाताळता येतील अशा आकाराच्या बैलगाडी आणि त्यासोबत लाकडाची बैलजोडी तयार करायला या दांपत्यानं  सुरुवात केली.
भटू आणि भारतीनं  सुरुवातीला एक बैलगाडी तयार केली.  तिला रंगरंगोटी करायलाही त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते.  तरीही ती इतकी सुंदर होती की  एका स्थानिक व्यक्तीनं  ती तात्काळ विकत घेतली. पहिली बैलजोडी लगोलग विकली गेल्यानं  या दांपत्याचा हुरूप वाढला. त्यांनी आणखी  तीन लाकडाच्या शोभेच्या बैलगाडी बनवल्या.  कासारे जवळच्या  महामार्गावर ते त्या  विक्रीसाठी घेऊन गेले. काही मिनिटांमध्ये त्या तीनही बैलगाड्या विकल्या गेल्या. त्यानंतर भटू-भारतीनं  मागे वळून पाहिलं नाही.
गेल्या दोन वर्षांमध्ये या दाम्पत्यानं ३०० पेक्षा अधिक बैलजोड्या व बैलगाड्या  विकल्या आहेत. महिन्याकाठी १५ ते २० बैलगाड्या  ते करतात. यासाठी पडीक घराचं लाकूड ते विकत घेतात.  टाकाऊपासून  टिकाऊ वस्तू  घडवणारं हे जोडपं  सध्या साक्री परिसरात चांगलंच परिचीत आहे. एक गाडी साधारण ५ हजाराला विकली जात असल्यानं हे काम आता त्यांना पूर्णवेळ रोजगार देत आहे.
 बैलगाडी आकर्षक बनवण्यासाठी भारती  रंगरंगोटी आणि नाजूक कलाकुसर  करण्याचं शिवधनुष्य पेलतात. भारती यांनी अत्यंत नजाकतीने केलेले नक्षीकाम आणि रंगकाम यामुळे या बैलजोड्या जिवंत वाटतात. बैल म्हणजे शेतकऱ्याचा जीवाभावाचा  मित्र. कोरोनाच्या कठीण काळात भटू आणि भारतीच्या संसाराचा गाडा हाकला तो  या शोभेच्या बैलांनीच ! कठीण काळात हिंमत न हरता, हुशारीनं अंगच्या कलागुणांचा उपयोग केला तर परिस्थितीवर नक्की मात करता येते, ही उमेद भटू आणि भारतीची गोष्ट देते.
— कावेरी परदेशी, ता.साक्री,जि.  धुळे

Leave a Reply