बोंढारची शाळा

नांदेड तालुक्यातलं नेरली कुष्ठधाम. इथून जवळच बोंढार इथं जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा. २०१० पासून नांदेड जिल्ह्यातल्या ११ शाळा ब्रिटीश कौन्सिलशी जोडल्या गेल्या. विशेष म्हणजे, बोंढारमधल्या या शाळेने राज्यातील ४२ शाळांशी स्पर्धा करीत, ‘ब्रिटीश कौन्सिल इंटरनॅशनल अवार्ड (२०१०) मिळविलं. याचं श्रेय आहे, मुख्याध्यापक राजाराम राठोड, सहकारी अश्विनी कौरवार, केशवराव अरसुळे, सरपंच देऊबाई बैकरे, शिक्षक आणि ग्रामस्थांना. पहिली ते पाचवीपर्यंतची ही शाळा. विद्यार्थी आहेत केवळ ४२. एक मुख्याध्यापक, दोन शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देतात. ज्ञानरचनावादावर आधारित इथली शिक्षणपद्धती. गाणी, चित्रकला आणि खेळातून इथली मुलं शिकतात. बालाजी कछवे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘ब्रेनजिम’ अर्थात मेंदूच्या व्यायामशाळेत मुलं अनेक भाषा शिकत आहेत. अगदी १५० पर्यंतचे पाढेही तयार करतात. उलटी सुलटी उजळणी इथल्या मुलांना मुखोद्गत आहे. सुटीच्या दिवशी, शाळा सुटल्यावर मुले गटागटाने अभ्यास करतात. मोठी मुले लहान मुलांचा अभ्यास घेतात. एकत्र मिळून खेळतात, असे शालेय समितीचे अध्यक्ष चंदू बागल सांगत होते.

ब्रिटीश कौन्सिलच्या इंटरनॅशनल स्कुल अवार्डच्या तयारीविषयी शाळेचे माजी-आजी मुख्याध्यापक गोविंद उपासे आणि राजाराम राठोड यांनी समजावून सांगितले. या अवार्डची नामांकन फी २० हजार रुपये आहे. ही फी राठोड सरांनी भरली.  युकेमधील मँचेस्टर शहरापासून ६५ किलोमीटरवरील लिव्हरपूल येथील ‘हाटन हिल प्रायमरी स्कुल’ आणि बोंढार येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळा यांच्यात विविध ऍक्टिव्हिटी संदर्भात सतत मेल, पोस्ट, भेटीगाठीद्वारे व ऑन लाईन आंतरक्रिया सुरु असते. तसंच वर्षभर विद्यार्थी, शिक्षक, पालक, अधिकारी यांच्यात देखील या प्रकल्पाचे उद्दिष्टानुरूप तारखेनुसार नियोजन, अंमलबजावणी, अधिकारी, पालक यांच्या भेटी, परीक्षण, तपासण्या असा भरगच्च कार्यक्रम असतो.
विद्यार्थ्यांत पर्यावरण विषयक जाणीवजागृतीसाठी आंतरराष्ट्रीय निकष आहेत. त्यानुसार वृक्षारोपणापूर्वी, विद्यार्थ्यांना जवळच्या जंगलात नेतात. झाडांचे महत्त्व निरीक्षणातून, चर्चेतून, नेट सर्चिंग, भाषण, निबंध, चित्रकला आणि फोटोच्या स्पर्धा घेऊन पटविले जाते. नंतर झाडे लावणे, रोपे दत्तक घेणे, ती जोपासणे वनस्पती व विविध वृक्षांचा अभ्यास, भारतातील व यू केमधील वृक्ष, फुले,फळे, पाने, हवामान, आदींचा तुलनात्मक अभ्यास, यावर लेखी-तोंडी परीक्षा, प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतल्या जातात. परितोषिकेही दिली जातात. म्हणूच बोंढार शाळेत, परिसरात, गावात लावलेली सुमारे हजार झाडे जगली आहेत. विद्यार्थ्यांचे हे प्रकल्प यु केच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना व त्यांचे प्रकल्प येथील विद्यार्थ्यांना मेल, पोस्ट यांच्याद्वारे पाठविले जातात. 

बालचित्रकलेची प्रदर्शने दोन्हीकडे भारतात. स्पोर्ट्स, लाईफ स्टाइल, ऐतिहासिक वारसा, रुढी परंपरा, सण उत्सव, सांस्कृतिक जीवन, भविष्यातील गरजा असे विविध उपक्रम चालतात.  राठोड सर आणि दिलीप बनसोडे (सध्या मनपाचे शिक्षणाधिकारी), अश्विनी कौरवार यांनी यु केच्या हाटन हिल प्रायमरी शाळेला भेट दिली आहे. प्रत्येक वर्गात मुलांनी तयार केलेली शैक्षणिक साधने, प्रोजेक्टर एल सी डी संगणक, फरशीवर काढलेले रंगीत खेळ याद्वारे शास्र, कला, भाषा, गणित, भूगोल विषय हे विद्यार्थी शिकत असतात.
शिक्षण फक्त शाळेपुरतं मर्यादित राहिलं नाही. मुलांनी गावही बदलून टाकलं आहे. बोंढार गावात आणि रस्त्याच्या दुतर्फा १६०० झाडे लावली आहेत. विद्यार्थी, शिक्षक व गावकऱ्यांनी एकत्र येत आसना नदीवर जिल्ह्यातील सर्वात मोठा चाळीस फुटांचा वनराई बंधारा बांधला आहे. त्यामुळे बोंढार गाव टॅंकर मुक्त झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही शेती पिकू लागली आहे.
या शाळेला २००८-२००९ मध्ये जिल्हा परिषदेचा सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार, २०११ मध्ये सानेगुरुजी स्वच्छता शाळा पुरस्कार मिळाला आहे. ग्रामपंचायतीला मिळालेला सौरऊर्जेवर चालणारा विद्युतपंप शाळेला दिल्याने ही शाळा ग्रीन स्पॉट बनली आहे.

– सुरेश कुलकर्णी, नांदेड