भरतला जे जमले ते इतर पुरुषांनाही जमू दे

बालपणीच आलेल्या अंधत्वामुळे डगमगून न जाता अनेक आव्हानांवर मात करणारी आपली मैत्रीण अनुजा संखे. तिचा जोडीदार भरतही अंधत्वामुळे येणारी आव्हानं पेलणारा. कौटुंबिक रूढीपरंपरांच्या बाबतीत बायकोच्या बाजूनं भूमिका कुटुंबात स्पष्ट भूमिका घेणं सगळ्याच नवऱ्यांना जमत नाही. ते भरतला जमलं. त्यानं ते केलं.     #मासिक_पाळी_व्यवस्थापन_दिन_विशेष_साप्ताहिक_पोस्ट मालिकेत आज अनुजाचा अनुभव तिच्याच शब्दात –

पहिल्या पाळीची आठवण शाळेशी निगडित आहे. शाळेतच वसतिगृह असल्याने त्या वयातल्या सर्वात महत्त्वाच्या क्षणात शाळा आहेच. मी तेव्हा १३ वर्षांची असेन. नुकतंच, एका कार्यशाळेत आम्हा मुलींना पाळी म्हणजे काय आणि ती आल्यावर घाबरून न जाता स्वच्छता कशी राखायची वगैरे समजावलं होतं. तेव्हा, ऐकायला सोपं वाटलं असलं तरी पहिल्या वेळी उडायचा तो गोंधळ उडलाच!

आम्ही मुली सतत एकत्र असायचो. अगदी शूलाही सोबत जायचो. शूला बसले आणि घाबरलेच. जाडसर स्त्रावाने निकर कडक झाली होती. कार्यशाळेत सांगतल्यामुळे मला कळलं पाळी आल्याचं. शंकेनेही काय करू नि काय नको असं झालं. मैत्रिणीला तसं सांगितलंही. तर, ती तर रडायलाच लागली. तिलाही शंका होती पाळी आल्याची. तिला कार्यशाळेत सांगितल्याप्रमाणे समजावलं आणि मेट्रन ज्योतीताईंना भेटायला जायचं ठरवलं. चिमटीत फ्रॉक धरून, तो मागे चिकटू न देता आम्ही निघालो. आधी डायनिंग हॉल, मग, त्यांची खोली, मग, पालक ज्या हॉलमध्ये मुलींची वाट बघत बसायचे तिथे आणि त्या भेटल्या. त्यांना घाबरत, लाजत काय ते सांगितलं. “हूं, पाळीपण एकत्रच आली का?” असं अगदी दणदणित आवाजात त्यांनी आपल्या अस्सल गुजराथी उच्चारात विचारलं.  आमचा फ्रॉक वर करून तपासलं. आम्हांला त्यांनी डायनिंग हॉलच्या वऱ्हांड्यात एका बाकावर बराच वेळ बसवलं. त्या वेळात मैत्रिणीचा फ्रॉकही खराब झाला होता. मग, तुळसाबाईंना बोलावून आम्हाला त्यांच्या ताब्यात दिलं. त्यांनी गरम पाण्याने अंघोळ घातली. आपली चड्डी हातात घ्यायला सांगून त्यावर गरम पाणी ओतलं. हातात साबण देऊन तो भरपूर फेस येईपर्यंत लावायला सांगितला. मग, ती चड्डी त्यांनी धुतली. माज्या हातात रुमालाच्या घडीएवढी लहान तर मैत्रिणीला मोठी घडी दिली.

त्यानंतर, २-३ वर्षांनी मला नियमित पाळी यायला लागली. मला आठवतं त्याप्रमाणे तेव्हा मी काकाच्या घरी होते. काकूने ड्रेसवर डाग पाहिला आणि मग, बहिणीने घडी घ्यायला वगैरे शिकवलं. शाळेतून नियमितपणे माहिती मिळत असल्याने पाळी हा नैसर्गिक प्रकार आहे, त्याचा पवित्र-अपवित्र अशा संकल्पनांशी काहीच संबंध नसतो, ज्यातून एक बाळ तयार होतो ती पाळी वाईट कशी असेल असं मनावर बिंबलं होतं. त्यामुळे पाळीत पोट दुखतं या कारणापलिकडे मनातून ती नकोशी वाटली नाही कधीच.

तरी, शाळेतलं वातावरण दुटप्पी म्हणावं असं असायचं. पाळी ही अत्यंत नैसर्गिक क्रिया आहे हे शाळेच्या वेळात समजवायचे. पण, कुठल्याही पुजेत, सणसमारंभात, भोंडल्यांच्या गाण्यातही पाळी आल्यावर बसू देत नसत. असं का? हा प्रश्न तेव्हाही छळायचा. याचं उत्तर म्हणजे मी असं काही मानायचंच नाही हा ठामपणे घेतलेला निर्णय. जो मी आजही पाळते. पण, यामुळे पुढे संघर्ष करावा लागेल अशी पुसटशी कल्पनाही मला नव्हती.

लग्नाच्या ३ दिवस आधी मला पाळी आली. लग्नात देवकार्य खूप म्हणून त्या दिवसांत मला रोज सकाळ संध्याकाळ डोक्यावरून अंघोळ करावी लागे. लग्न करून गृह प्रवेश करताना मला निव्वळ चोथा दिवस होता णि मी त्या दिवशी सकाळी केसांवरून अंघोळ केली होती म्हणून घरात घेतलं होतं हे नंतर समजलं.

पुढे, लग्नानंतरची पहिली पाळी मला आली आणि मी अपमान या शब्दाचा अनुभव घेतला. सासूबाईंनी ताट वाढलं. किचनमधून मला हाक मारली. मी बेडरूमच्या दारात जात नाही तोच, “एय, थांब तिथच” म्हणून अंगावर ओरडल्या. रोज नीट बोलणाऱ्या आई आज असं का बोलतात हा प्रश्न मनावर उमटण्यापूर्वीच त्यांनी जेवणाचं ताट बेडरूमच्या दाराकडे ढकललं.

मी ताट तिथेच टाकून दार रागाने आपटलं. भरतला फोन लावला. अत्यंत रागाने डोळ्यातून अश्रू येत होते. तशाच थरथरत्या, रडवेल्या आवाजात भरतला प्रश्न केला, “मी काय कुत्रा आहे असं जेवायला द्यायला?” भरत ऑफिसमध्ये असल्याने पुढचा माझा थयथयाट त्याने शांतपणे ऐकून घेतला आणि “मी घरी ल्यावर पाहू” एवढं म्हणून फोन ठेवला.

संध्याकाळी भरत आला तेव्हा आल्या आल्या माझ्या वागण्याची उजळणी झाली. त्याला रात्री एकट्याला बेडवर झोपायला सांगितलं. माझ्या कानावर हे आल्यावर कसलीच भीड न बाळगता मी शांतपणे  म्हटलं, “माझ्या माहेराहून हा पलंग आणि गादी मला लग्नात मिळाली आहे. तुला माझ्यासोबत झोपायचं नसेल तर तू खाली झोपायचं मी वरच झोपणार.”

पुढे कोणीच कोणाशी बोललं नाही. पण, रात्रीचं जेवण बाकी होतं. पोट दुखत असूनही दुपारी जेवले नसल्याने खूपच त्रास होत होता. वाटणारा एकटेपणा शब्दात मांडणं शक्य नाही. जेवायच्या वेळी संघर्ष अटळ होता. भरत आईकडे गेला आणि जेवण वाढायला सांगितलं. त्याचं ताट त्याच्याकडे दिल्यावर त्याने माझ्यासाठीही ताट तयार करून मागितलं. कोणाशीही काहीही न बोलता तो बेडरूममध्ये आला आणि माझ्यासोबत जेवायला बसला. त्याची ही कृती त्याच्यासाठी तेवढी महत्त्वाची वा मोठी नसेलही पण, माझ्यासाठी ती कायमचा आधार देणारी ठरली. माझ्या पाळीच्या संदर्भातल्या संघर्षात तो बरोबरीने सहभागी झाला. त्याने माझ्या संघर्षात टाकलेलं पाऊल हे आम्हां दोघांनाही सासरच्या मंडळींपासून परकं करणारं ठरलं. पण, आम्ही आमचा संघर्ष थांबवला नाही. ते आमच्याकडे आल्यावर आम्ही राहतो तसं राहतात. आता ते माझ्या पाळीत मी शिजवलेलं अन्नही खातात. माझ्या पुतण्यांनाही आम्ही पाळी म्हणजे काय, त्याचा देवाधर्माशी मुद्दाम जोडलेला संबंध यांबाबत सांगतो. आम्ही सांगितलेल्या गोष्टींवर पडणारे प्रश्न नुकत्याच वयात येऊ लागलेल्या त्या बिनधास्तपणे विचारतात. त्यांच्याशी या विषयावर संवाद साधता येणं हेच महत्त्वाचं वाटतं या घडीला.

आमच्या शाळेत या सर्व प्रकाराकडे मानसिक, भावनिक पद्दतीने पाहण्यापेक्षा  वैज्ञानिक पद्धतीने पाहण्याची एक संधी दिली. जे मनाला पटलं ते स्वतंत्रपणे विचार करून स्वीकारलं. आजही मी पाळीला माझ्या स्त्रीत्वाशी जोडून पाहते. देवधर्म मुळातच फार करत नाही. त्यातही, कुठल्याही मंदिरात वा धार्मिक स्थळी पाळी आहे म्हणून जायचं नाही हा प्रकार करत नाही. पाळी असताना कोणी पुजेचं आमंत्रण आलंच तर त्यांना स्पष्टपणे सांगते की, मला पाळी आहे पण, पुजेला यायला आवडेल. चालेल का? काही माझ्या मैत्रिणी आहेत ज्या म्हणतात, “अगं, मला दुसराच दिवस आहे आणि मीच पुजेला बसणारे.”

Leave a Reply