भाजीपाला पिकातून एका एकरात ४० हजारांचा नफा

गोंडपिपरी तालुक्यातील अडेगांव येथे प्रताप झाडे यांची एकूण चार एकर जमीन. आत्तापर्यंत ते पारंपरिक पिकेच घेत होते. गेल्या वर्षी अपुऱ्या पाण्यामुळे सूर्यफुलाचे पीक वाया गेले होते. तसेच मागील वर्षी केवळ ३५ पोते धान झाले होते. यावर्षी मात्र त्यांनी उन्हाळ्यातही पीक घ्यायचे ठरवले. मग एक एकरावर चवळी, काकडी, वांगे, कारले ही भाजीपाला पिके लावली़. आणि चाळीस हजार रुपयांचा निव्वळ नफा कमविला आहे़. ही किमया घडली ती बंधाऱ्याच खोलीकरण केल्यामुळे. बंधाऱ्यातील पाणी पिकासाठी उपलब्ध झाले आणि परिसराचे चित्रच बदलून गेले.

इतकी वर्षे सिंचनाची सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना केवळ एका पिकावरच अवलंबून राहावे लागत होते. खरीपाचे एकच पीक त्यांना घेता येत होते. शेतजमीन असूनही उर्वरित काळ ती पडिक ठेवावी लागत होती. जलयुक्त शिवार योजनेच्या बंधाऱ्यांमुळे मात्र जिल्ह्यातील हे चित्र पालटत असल्याचे दिसून येते आहे़. शेतकऱ्यांमध्ये आर्थिक समृद्धी आणावयाची असल्यास त्यांना हक्काच्या सिंचन सुविधा उपलबध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठीच शासनाने गेल्या वर्षापासून जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. मुबलक पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसोबतच सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. गेल्या दोन वर्षात अभियानाचा हा उद्देश सफल होत असल्याचे दिसून येत आहे. गोंडपिपरी तालुक्यात अडेगाव येथील शेतशिवारात असलेल्या नाल्यावर तीन बंधारे बांधण्यात आले होते. या बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम हाती घेऊन ते पूर्ण करण्यात आले. त्यामुळे या बंधाऱ्यात तीन मीटर खोल व किमान १५०० मीटर लांब इतक्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले. या तीन बंधाऱ्यात जवळपास ४५ टीएमसी इतका पाणी साठा होतो. परिसरातील शेतकऱ्यांनी डिझेल इंजिन लावून पाण्याचा उपसा करत भाजीपाल्याचे उत्पादन घेतले. बंधाऱ्याचे खोलीकरण झाल्यानंतर उन्हाळा असतानाही एक एकर क्षेत्रावर या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक घेतले.
अजूनही भाजीपाला बाजार पेठेत विकला जात असून, उत्पन्नात आणखी वाढ होणार असल्याचे प्रताप झाडे यांनी सांगितले. या वर्षी किमान ६० पोते धान होईल असा अंदाज असल्याचे ते म्हणाले. धानानंतर या वर्षी गहू, सूर्यफुल ही पिकेही ते घेणार असून, उन्हाळ्यात पुन्हा भाजीपाला पिके घेऊ. बंधाऱ्यामुळे हक्काची सिंचन सुविधा उपलब्ध झाल्याने दोन ते तीन पिके घेणे आता सहज शक्य झाले आहे़. बंधाऱ्यामुळे आमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत असल्याचे प्रताप झाडे सांगतात़.

– प्रशांत देवतळे.