भाळवणीचं कोविड सेंटर तिथं आमदार दिवसरात्र हजर

 

”कामाला 24 तास पुरत नाहीत. दिवस 48 तासांचा केला तरी वेळ कमी पडेल. मला काही तरी होईल म्हणून घरात बसलो, तर मला संधी दिलेल्यांकडे कोण पाहील”, आमदार निलेश लंके सांगत होते. पारनेर तालुक्यातल्या भाळवणी इथं लोकसहभागातून त्यांनी शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर सुरू केलं आहे. विशेष म्हणजे लंके स्वतः दिवसरात्र सेंटरमध्ये असतात.
1 हजार 100 बेडच्या या सेंटरमध्ये 100 ऑक्सिजन बेड. नगर, बीड, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील लोक इथं उपचारासाठी येतात. त्यात बहुतांश ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, कष्टकऱी. यावर्षी इथून आतापर्यत सुमारे चार हजार बरे होऊन गेले आहेत. गेल्या महिन्यात तर दररोज 200 ते 300 बाधित दाखल व्हायचे. रुग्णांना मोफत जेवण आणि औषधोपचार. यासाठी दररोजचा खर्च साधारण तीन लाख.


अनेक सामाजिक संस्था, कार्यकर्ते, दानशुरांच्या मदतीतून सेंटर उभं राहिलं. पुढाकार आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचा. लोकसहभागातून आतापर्यंत सुमारे एक कोटींहून अधिक निधी जमा. सेंटरसाठी भुजबळ कुटुंबानं दहा एकराचं मंगल कार्यालय विनामोबदला दिलं. पंधरा ट्रक अन्नधान्न, पंधरा ट्रक भाजीपाला आणि इतर साहित्य लोकसहभागातून. शुद्ध पाण्यासाठी पुण्यातील एका व्यक्तीनं दोन लाख रुपये खर्च करून प शुद्धीकरण यंत्रणा बसवली. रुग्णांना आणण्यासाठी तीन वाहनं. सेंटरमध्ये एक कार्डियाक अँब्युलन्स. शरद पवार यांनी लंके प्रतिष्ठानला भेट दिलेली. लंके यांनी गेल्या वर्षी कर्जुले इथं उभारलेल्या कोविड सेंटरमधून साडेपाच हजार लोक बरे झाले. त्याबद्दल कौतुक म्हणून दिलेली.
लंके प्रतिष्ठानचे शंभरापेक्षा अधिक स्वयंसेवक विनामोबदला अविरत काम करत आहेत. बारा तासासाठी प्रत्येकी पन्नास स्वयंसेवकांना कामं नेमून दिली आहेत असं प्रतिष्ठानचे सचिव राहुल झावरे यांनी सांगितलं.

-सूर्यकांत नेटके, ता. पारनेर, जि. अहमदनगर

Leave a Reply