मधमाशी ज्या झाडावर जगते ते झाड जगलं पाहिजे…

प्रसाद कुलकर्णी. मूळचा विश्रामबाग सांगली येथील. आयआयटी मुंबई इथून २०११ साली त्याने एनर्जी सायन्समध्ये एम. टेक पदवी मिळवली.
ऊर्जा क्षेत्रात काम करण्याच्या आवडीमुळे सोलार वॉटर हिटर, बायो गॅस निर्मितीचा उद्योग त्याने सुरू केला. त्यानंतर चार वर्षं वालचंद कॉलेजात प्राध्यापकांची नोकरी केली. नोकरी करत असताना, मधुमक्षिकापालना संदर्भात माहिती मिळाली. आजूबाजूला अनेक ठिकाणी मधमाशीपालन करता येते हे जाणवलं. परंतु मकरंदावर जगणाऱ्या मधमाशीसाठी शेतात येणारी मोहरी, ओवा फुले तसेच जांभूळ, कडुलिंब, बाभूळ अशी झाडे सुध्दा गरजेची असतात. शेतातील पिकांवर रसायनाचा मारा असल्याने मकरंदासाठी मधमाशा झाडांकडे जातात. परंतु जांभूळ, कडुलिंब अशा झाडातून आर्थिक फायदा मिळत नसल्याने शेतकरी झाडे कापून लाकड विकून टाकतात. झाडे जगावी, शेतकऱ्याला पैसे मिळावे आणि मधमाशी जगावी म्हणून जांभळा पासून जांभुळ पोळी, जांभुळ बी पावडर, जांभुळ पल्प आणि मध अशी उत्पादने घ्यायला त्याने सुरुवात केली. मागील वर्षी साधारण १.५ टन जांभळाची पोळी बनवली त्यातून शेतकऱ्यांना पैसे मिळाले, झाडे जगली. ही सगळी कामे प्रसाद एकटा करतो. जांभुळ पल्प सुकविण्यासाठी त्याने स्वतः बांबूपासून सोलार ड्रायर तयार केले आहेत. सध्या मधमाश्या संवर्धन हा ध्यास घेवून प्रसादने संवर्धनाला उद्योगाची जोड दिली आहे.
शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुकवलेली फणस भाजी, आवळा कॅन्डी अशी उत्पादने प्रसाद घेत आहे. प्रसाद म्हणतो, ‘मधमाशी ज्या झाडावर जगते ते झाड वाचलं पाहिजे.’

– संतोष बोबडे, सांगली
#नवीउमेद #सांगली