मनोवृत्तीच महत्वाची!

ऑफीससाठी स्टाफ देणे, हे माझी संस्था ‘सक्सेस मंत्र’चे काम आहे.  दादरच्या एका क्लाससाठी कार्यालयीन सहाय्यकाची गरज होती. सर्व माहिती मिळाल्यानंतर मी कामाला लागले. माझ्याकडे नोंदणी केलेल्या इच्छुक उमेदवारांपैकी या कामासाठी योग्य असणार्यांाना कामाच्या स्वरूपाविषयीची तपशीलवार मेल पाठवली. मी पाठवलेल्या उमेदवारांच्या यादीचा आढावा घेऊन क्लासेसच्या संचालकांनी दोघांना मुलाखतीसाठी बोलवले. मुलाखती झाल्यावर त्यांनी मुलाखती झाल्यमुंबईत सायनला राहाणार्याब मीताला निवडले.
मीताला संचालकांनी रूजू होण्यास सांगितले. काम सुरु करण्यापूर्वी दोन दिवस आधी बोलावून तिला तिथल्या मॅडमने सर्व काम व्यवस्थित समजावून सांगितले. दोन दिवसांनी रूजू होण्याचे पक्के केले. मीतानेही पक्का होकार दिला. ज्या दिवशी मीताला कामावर रूजू व्हायचे होते, ती गेलीच नाही. ना तिने मला कळवले ना संचालकांना! मीताचा फोन बंद! पर्यायी संपर्क क्रमांकही नव्हते. मीताने तिथे काम सुरू करण्याचे नक्की केले असल्याने मी निर्धास्त होते. पण आता नवीन व्यक्ती लवकरात लवकर देणे जरुरी होते. माझ्यामुळे त्यांचे काम अडायला नको होते.
चला, परत नव्याने सुरु करा कामाला असे म्हणत मी सुरवात केली. एकदम आठवले, काही महिन्यांपूर्वी नोकरीसाठी स्वतःच्या माहिती अर्जाचे लेखन स्वतआणि व्यक्तिमत्व विकास असे प्रशिक्षणसत्र घेतले होते. त्यातल्या प्रशिक्षणार्थींनाही नोकरी मिळवण्यासाठी मदत करायची होती. मी त्या मुला-मुलींशी संपर्क केला. नीता बोरीवलीला राहते. म्हणाली, “मी जाते मुलाखतीसाठी.” नीताचा होकार होता. पण तिच्या आईचे हो-नाही चालले होते. म्हणाल्या, “जरा जवळ बघा…पगार जरा जास्त नाही का मिळणार?” मी म्हणाले, “नीताची तयारी आहे तर तुम्ही तिला पाठिंबा द्या.”
 नीताला सत्राच्या वेळेस भेटलेच होते. अगदी साधी मुलगी. घर आणि कॉलेज इतकेचं तिचे विश्व. बोरीवली ते दादर प्रवासाचीही तिला सवय नव्हती. पण फोनवर नीता म्हणाली, “मॅडम तुम्हीचं सांगितलंय “Break your comfort zone”. तर तुम्ही काळजी करू नका. करेन मी नीट आणि पगार जरी सुरवातीला कमी असला तरी माझ्यासारख्या अननुभवी मुलीसाठी तो जास्तच आहे. मला शिकायला मिळेल. बाहेरच्या जगात भरारी मारायला उत्सुक असणाऱ्या नीताचा चेहरा मला फोनेमधूनसुद्धा स्पष्ट दिसत होता.
नंतर कधीतरी मला कळलं की नोकरीवर रुजूच न झालेल्या मीताला सायन ते दादर अंतर लांब वाटलं आणि देऊ केलेला पगारही कमी वाटला.
 तर मीता आणि नीता. मला जाणवला दोघींच्या वृत्तीतला, विचार करण्यातला फरक. मीताने जबाबदारी घेऊन झटकली. आणि जी कारणं देऊन मीताने संधी नाकारली, त्या कारणांची नीताने फिकीर केली नाही. नीता सकारात्मक विचाराने आलेल्या संधीला सामोरी गेली. “काय होईल ते बघुया”, असे आत्मविश्वासाने म्हणाली.
आता सांगा, भविष्यात कोण यशस्वी होईल? मीता की नीता?

– मेघना धर्मेश