मन मैं है विश्वास…

विशी बाविशीतले ५-६ मित्र यवतमाळ शहरातील लोकांच्या घरी, कार्यालयात, सार्वजनिक ठिकाणी लोकांना जाऊन भेटतात.. हातात विनंती करणारे पत्रक आणि संदर्भासाठी वृत्तपत्रातील काही बातम्या दाखवतात.. आपल्या मित्राच्या आजाराबद्दल माहिती देतात.. आर्थिक परिस्थितीने इलाज घेऊ शकत नसलेल्या मित्रासाठी आम्ही निधी गोळा करत आहोत, त्याला मदत करण्यासाठी नम्र आवाहन करतात… यवतमाळकरांना सध्या येत असलेला हा अनुभव. यवतमाळमधल्या हर्षल चव्हाण, विवेक काळे, कुणाल पांडेन, रुपेश वासनिक, अभिषेक पांडे, अंकेश जाधव, प्रशांत चौधरी अमित लभणे या मित्रांची हकीकत आहे. ही इतकी धडपड कुणासाठी?
भूषण क्षीरसागर हा २२ वर्षांचा नृत्यात प्रवीण असलेला मुलगा या मुलांचा मित्र आहे. पण तो आता नृत्य शकत नाही, कारण त्याला एका अत्यंत दुर्धर आजाराने ग्रासलेलं आहे. या आजाराचं नाव आहे Abascular Nucrosis (A.V.N) गेल्या चार वर्षांपासून तो अंथरुणाला खिळून आहे. त्याला कमरेखाली चेतना तर आहे पण तो चालू शकत नाही. कोणे एके काळी विजेसारखी त्याची पावले रंगमंचावर थिरकायची. सध्या मात्र तो पुन्हा नीट उभा होईल की नाही ही चिंता त्याच्या कुटुंबातील सर्वांना आहे. त्याला उपचारासाठी गरज आहे ती सहा लाख रुपयांची. मोलमजुरी करून जगणाऱ्या त्याच्या आई वडिलांना इतका पैसा उभा करणं अशक्य आहे. त्याच्यासाठी ५-६ मित्र यवतमाळ शहरात घरोघरी जात आहेत. आपल्या मित्राच्या आजाराबद्दल माहिती देत आहेत आणि कळकळीने त्याला मदत करण्याची विनंती करत आहेत. कुणी मदत करतं, कुणी हेटाळत, तर बरेच दारातून हाकलून देतात आहेत. तरीही यांची जिद्द आहे आपल्या मित्रासाठी आपण ६ लक्ष रुपये उभे करूच. त्यासाठी ते जीवाचं रान करून प्रत्येक दारात जाऊन विनंती करत आहेत..
आपल्या मित्रासाठी आर्थिक मदत उभारणाऱ्या या मित्रांची घराची परिस्थितीही बेताचीच आहे. कुणाचे पालक वाहन चालक आहे, कुणाचे पालक दुकानात खासगी नोकर. त्यामुळे त्यांच्याकडूनही इतकी मदत होणं शक्य नाही. दुसरीकडे आपण या आजारातून बरे होणार नाही, याची निराशा भूषणच्या मनात घर करून आहे. मृत्यूचं आपल्याला सुटका देईल असं त्याला वाटतं. पण भूषण या अवस्थेतून बाहेर येईल आणि बरा होईल हा विश्वास मनात घेऊन पोरं भेटेल त्या माणसाला आपल्या मित्राला मदत करण्यासाठी विनवणी करत आहेत. आजवर त्यांनी ४ लाख रुपये गोळा केले आहे. अजून ३ लाख रुपये गोळा करायचे आहे.
(हर्षल चव्हाण- 7499321882) (विवेक काळे) (कुणाल पांडेन-7083311956), (रुपेश वासनिक-7666832110), (अभिषेक पांडे-), अंकेश जाधव, (प्रशांत चौधरी-7420037188), (अमित लभणे-9158138812)
– निखिल परोपटे, यवतमाळ
#नवीउमेद #यवतमाळ
@Nikheil Paropate