धुळ्यातल्या शिंदखेडा तालुक्यातले मालपूर गाव. गाव तसं छोटंसं, मात्र आपल्या एका वैशिष्ट्याने महाराष्ट्रात लौकिक मिळवलेलं. मालपूर प्रसिद्ध आहे ते मेंढीच्या लोकरीपासून बनवल्या जाणाऱ्या घोंगड्या, दुलया, भोजन पट्टी, आसनं अश्या उत्पादनासाठी. गावात हा उद्योग जिवंत ठेवण्याचे काम करतायत, ते मालपूरमधल्या महिला. पुरूषांपेक्षा जास्त मेहनत करीत, या महिलांनी ‘उत्तम दर्जाच्या घोंगडीचे गाव’ असा नावलौकिक मालपूरला मिळवून दिलाय.
मालपूरमध्ये धनगर समाज बांधवांची वस्ती मोठी आहे. गावातली पन्नासहून अधिक कुटुंबं ही मेंढीची लोकर विणून त्यातून वेगवेगळ्या वस्तू तयार करतात. या कामात घरातील सर्व वयोगटाच्या महिला मुख्य कामाची जबाबदारी उचलतात. पुरूष मंडळी कच्चामाल आणून देणं, अवजड सामानाची ने आण अशी मदत करतात, मात्र मेंढीच्या लोकरीपासून दर्जेदार वस्तू बनवण्याचे सर्व काम ग्रामस्थ महिलाच करतात. मालपूरचे वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया न करता इथं, मेंढीच्या लोकरीपासून पूर्ण नैसर्गिक स्वरूपात उपयुक्त वस्तू तयार केल्या जातात. त्यात ‘योगा मॅट’ ही सध्या सर्वाधिक विकली जाते. नैसर्गिक रंगांचा, तसेच पारंपरिक पद्धतीने हाताने विणून या घोंगड्या, चटई आणि भोजन पट्टी तयार केल्या जातात. त्यामुळे त्यांच्या वापराचा, त्यांच्या नैसर्गिक उबदार स्पर्शाचा आनंदच वेगळा असतो.


मायेची उब देणाऱ्या या घोंगड्या आरोग्यवर्धक देखील असतात. मानवी शरीरासाठी मेंढीच्या लोकरीपासून नैसर्गिकरीत्या तयार केलेल्या वस्तू या जास्त लाभदायक असतात. सांधेदुखी, पाठदुखी पासून आराम देण्याचं काम या घोंगडी अथवा चटईच्या माध्यमातून होत असल्याचं, आबा धनगर सांगतात. गावातील विणकाम करणाऱ्या या महिला सक्षमीकरणासाठी सदाशिव भलकार हे स्थानिक शिक्षक मदत करत असतात. घर दार सांभाळून आपली कमाई होत असल्याने महिला आनंदात आहेत.
मेंढीच्या लोकरीपासून बनवली जाणारी ही घोंगडी बनवण्याची पद्धतदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. उन्हाळ्यात मेंढ्यांची लोकर काढली जाते. ती लोकर स्वच्छ केली जाते. त्यानंतर चरख्याच्या सहाय्याने त्या लोकरीचा धागा तयार केला जातो, मग हा धागा विविध नैसर्गिक रंगांचा वापर करून रंगीत केला जातो, आणि नंतर त्याला हातानं गुंफलं जातं. हाताने गुंफून बनवल्या गेल्याने या घोंगड्या पाहता क्षणी आपल्याला प्रेमात पडतात.
चारशे रूपयांपासून ते दोन हजार रूपयांपर्यंतच्या मेंढीच्या लोकरीपासून बनविलेल्या या वेगवेगळ्या वस्तूंची विक्री केली जाते. प्रामुख्याने धुळे आणि आजूबाजूच्या स्थानिक बाजारपेठेत या लोकरीच्या उत्पादनांची विक्री होते. आता मात्र या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळावी म्हणून योगा मॅट, घोंगड्या आणि तत्सम उत्पादनांची विक्री एका वेबसाईटवरूनही सुरू करण्यात आली आहे.
https://chhyakart.com/
लेखन: कावेरी परदेशी, धुळे
हे त्या वेबसाईटचं नाव, घोंगड्यांसोबतच स्थानिक कलाकारांनी आणि व्यावसायिकांनी तयार केलेली इतर अनेक उत्पादनं इथं ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत.