नाशिक शहराच्या अगदी शेवटच्या टोकाचं गंगापूर गाव. जवळ विस्तीर्ण भागात वसलेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. इथं दररोज शेकडो प्राध्यापक, कर्मचारी शहराच्या विविध भागातून येतात. त्यात महिलांची संख्या लक्षणीय. शिवाय विद्यापीठात विविध कामानिमित्त येणाऱ्या विद्यार्थिनी, महिला यांचीही संख्या भरपूर. एवढ्या मोठ्या विद्यापीठाची स्वच्छता ठेवायची म्हणजे सफाई कर्मचारी आलेच. अनेक वर्षांपासून येथे मोठ्या संख्येने महिला सफाई कर्मचारी कार्यरत आहेत.
माजी कुलगुरू डॉ. इ. वायुनंदन यांच्या मार्गदर्शनाखाली 3 वर्षांपूर्वी या महिलांसाठी विश्रांती कक्ष सुरू झाला. 3 वर्षांपासून इथल्या 50 च्या आसपास असणाऱ्या महिला सफाई कर्मचारी यांना आणि त्यांच्या कुटुंबातील महिलांनादेखील मोफत सॅनिटरी पॅड मिळतं. रजिस्टरवर केवळ नाव आणि सही, अंगठा देऊन त्याची नोंद ठेवली जाते. विद्यापीठात तात्पुरत्या स्वरूपात काम करण्यास येणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनादेखील ही सोय आहे. एखादीला अंगदुखीचा त्रास होत असेल, पोट दुखत असेल तर अशावेळी विश्रांती कक्षात अल्पकाळ विश्रांती घेण्याची सोयही आहे . या महिलांना आरोग्याची काळजी घेणे कसे महत्वाचे आहे, निष्काळजी पणा केला तर काय परिणाम होऊ शकतात याविषयी वेळोवेळी विद्यापीठाच्या शैक्षणिक संयोजक सोनाली खरापडे मार्गदर्शन करतात. त्यात मासिकपाळी काळात आहारापासून ते वैयक्तिक स्वचछतागृहापर्यंत सर्व त्या सोप्या शब्दात सांगतात. विद्यापीठातल्या काही सफाई कर्मचाऱ्यांची मासिक पाळी निवृत्ती जवळ आली आहे. त्यांच्यासाठी डॉ.प्रतिभा ओंधकर यांचे नुकतेच व्याख्यान ठेवण्यात आले होते. त्यात त्यांनी या काळात स्त्रीच्या शरीरात होणारे बदल, आरोग्याच्या समस्या, आहार, विश्रांती आदी विषयांवर साविस्तर मार्गदर्शन केलं .
विश्रांती कक्षात एक छोटा बेड आहे. भरपूर पाणी असलेलं स्वच्छता गृह, बेसिन आदी सुविधा आहेत. पंखे,दिवे यासह खेळती हवा मिळेल अशा खिडक्या या विश्रांती कक्षात आहेत.
सारिका मौर्य सांगतात ,”मी गेल्या पाच वर्षांपासून मुक्त विद्यापीठात सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत आहे. वेगवेगळ्या पॉइंट वर आमची ड्युटी बदलते. विद्यापीठ शहरापासून दूर असल्याने मासिक पाळी अचानक आली किंवा काही झाले तर लवकर काही मदत मिळण्याची शक्यता नव्हती. पण आता या उपक्रमामुळे खूप दिलासा वाटतो .”
कल्पना जाधव सांगतात,”मी मुक्त विद्यापीठात 5 वर्षांपासून सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करते. मासिक पाळीच्या काळात पूर्वी धाकधूक असायची. आता आमच्याबरोबर कंत्राट योजनेवर येणाऱ्या महिला कर्मचारी, विद्यार्थिनी आणि इतर महिला, मुलींनाही आम्ही या सुविधा देऊ शकतो याचा अभिमान वाटतो.”
सरला मोरे सांगतात,”मी विद्यापीठात सफाई कर्मचारी म्हणून 1994 पासून आहे. या सोयींसोबत विद्यापीठ आमच्यासाठी वेळोवेळी व्याख्यानं ठेवतं, फिल्म दाखवतात, त्यातून खूप महत्वाची माहिती मिळते.”
-भाग्यश्री मुळे, नाशिक