माझी कॉलनी माझी जबाबदारी‘

 

‘माझी कॉलनी माझी जबाबदारी‘ या जाणिवेतून लोढा भवन परिसराच्या कुंपणाचं रूप पालटलं. गेल्या महिन्याभरापासून इथं सेल्फी काढणाऱ्यांची गर्दी होत आहे.
लोढा भवन परिसर, नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमधला. उच्चभ्रू लोकांच्या वस्तीचा भाग म्हणून हा परिसर ओळखला जातो.


या वस्तीच्या एका बाजूला लागून असलेल्या रस्त्याच्या पलीकडे सटाणा रोड रुग्णालयाचे कुंपण. या रुग्णालयाच्या इमारतीत आता राज्य शासनाचं महिला आणि बालरुग्णालय आहे. मूळच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयाची ही इमारत आणि कुंपण बांधून आता बरीच वर्षे उलटली आहेत. बांधल्यापासून कधीच या भिंतीला रंगरंगोटी झाली नव्हती. पावसामुळे सादळलेल्या या भिंतीवर शेवाळ, जागोजागी उगवलेले गवत. तंबाखू-गुटख्याच्या पिचकाऱ्या.
एका बाजूला टोलेजंग इमारतींमधील उच्चभ्रूंचा रहिवास आणि वस्तीला लागून असलेल्या तीनशे मीटर लांब आणि दोन मीटर उंचीच्या या भिंतीची दुर्दशा. कुणालाही खटकावी अशीच बाब.. स्थानिकांनी वेळोवेळी तक्रार केली. पण रुग्णालय प्रशासन, महापालिकेकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.


आपणच आता काही केलं पाहिजे हे स्थानिकांना उमगू लागलं. आर्किटेक्ट स्नेहा लोढा,सिध्दार्थ लोढा,चार्टर्ड अकाउटंट भूषण छाजेड आणि प्रयाग नहार यांनी मांडलेली संकल्पना सर्वांनाच आवडली.
जवळपास पंचवीस तरुण-तरुणींनी आवडीनं श्रमदान सुरू केलं. सकाळी सहा ते अकरा आणि सायंकाळी पाच ते सात असं दहा दिवस हे काम चाललं. सुरुवातीला भिंत स्वच्छ धुऊन , घासून घेण्यात आली. त्यानंतर रंगरंगोटी. मग भिंतींवर जागोजागी सौंदर्य खुलवणारी, प्रबोधनात्मक निरनिराळी बोलकी चित्रं. सप्तरंगाच्या आकर्षक छटांचा मिलाफ. रंग आणि इतर साहित्यासाठी लागलेला सुमारे पंचाहत्तर हजारांचा खर्च स्थानिकांनी लोकवर्गणीतून भागवला. तरुण-तरुणींच्या रोजच्या चहा-नाश्त्याची सोय कॉलनीतल्या रहिवाशांनी केली.
‘माझी कॉलनी माझी जबाबदारी‘ या जाणिवेतून सर्वच स्थानिक यात सहभागी झाले. ज्येष्ठांनी मार्गदर्शन केलं.
प्रत्येक गोष्टीबद्दल शासकीय यंत्रणांवर विसंबून राहिल्यास पदरी निराशा पडण्याचा किंवा बहुप्रतिक्षा झेलावी लागण्याचा अनुभव नित्याचा. पण स्थानिकांनीच एकत्र येत पुढाकार घेतला तर काम किती पटकन आणि छान होऊ शकतं याची साक्ष लोढा भवन परिसराचं हे कुंपण देतं.
-प्राची उन्मेष, ता. मालेगाव, जि नाशिक

Leave a Reply