माणुसकी जपणारा डॉक्टर

सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागातला दत्त नगर परिसर. इथं डॉ. मोहन तंबाके यांचं हॉस्पिटल अाहे. याच भागात ते १९९५ वैद्यकीय व्यवसाय करतात. दाट लोकवस्तीच्या या परिसरातील बहुसंख्य लोक हे विडी कामगार आहेत. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने पैसा नाही. यातच लोकांना विविध अाजाराने घेरलं अाहे. लोकांकडे या उपचारासाठी दमडीदेखील नाही. अश्यातच रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांची असहाय फरफट, पैशाची जुळवाजुळव करताना त्यांचे होणारे हाल पाहून डॉ. तंबाके यांनी दोन महिन्यांपासून रुग्णांना मोफत उपचार देणं सुरू केलं आहे.

ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी , मलमपट्टी, अापल्याकडे उपलब्ध असलेल्या औषध गोळ्या देणे या सुविधा ते देत अाहेत. सकाळी अकरा ते दोन यावेळेत भद्रावती पेठ, दाजी पेठ कुचननगर, बालाजी मंदिर परिसर, दत्तनगर या परिसरातील लोक या सेवेचा लाभ घेत अाहेत. डॉ. तंबाके कोरोनाच्या संकटकाळात मोठे कौतुकास्पद काम करीत आहेत. पूर्वीप्रमाणे सर्व सुविधा सुरळीत होईपर्यंत ही सेवा देणार असल्याचं तंबाके यांनी सांगितलं.

डॉक्टर उपचारासाठी पैसे घेत नाहीत हे कळल्यावर रुग्णांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. डॉक्टरांना आशीर्वाद देऊन हे रुग्ण हॉस्पिटलमधून घरी जातात. डॉक्टरांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे उदाहरण दिसून येते.

डॉ. तंबाके म्हणाले की, सरकारने पीपीई किट उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवता येईल. त्यामुळे डॉक्टरांना सरकारी पाठबळाची आवश्यकता आहे. एक चांगलं काम केल्याने दुसऱ्या चांगल्या कामाची सुरुवात होत असल्याचं डॉ. तंबाके याचं म्हणणं आहे.
– अमोल सीताफळे, सोलापूर

Leave a Reply