माणुसकी जपणारे ‘प्रवीण’

 

धुळे शहरातील देवपूर स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना जाळण्याला स्थानिकांनी प्रचंड विरोध केला होता. कोरोनामुळे आधीच तिरस्काराचा सामना करीत असलेल्या जिल्ह्यातील रुग्णांना मृत्यूनंतरही प्रचंड हेटाळणीचा सामान करावा लागत होता. वारंवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. तासनतास या मृतदेहाला कुठे न्यावे यावर चर्चा केली जात होती. त्या सर्व चर्चा स्थानिकांच्या विरोधामुळे निष्फळ ठरत होत्या. अखेर मृतदेहांची होणारी अवहेलना थांबविण्यासाठी प्रवीण अग्रवाल आणि प्रवीण पवार या भाजपच्या नेत्यांनी पुढे येत आपल्या मालकीची दहा एकर जागा कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कारसाठी दिली. जोवर कोरोना आहे तोवर या त्यांच्या खासगी जागेवर या रुग्णांचे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. प्रवीण यांच्या पत्नी सारिका अग्रवाल या भाजपच्या नगरसेविका आहेत तर प्रवीण पवार हे सरपंच आहेत. त्यांच्या या दातृत्वामुळे कोरोना रुग्णांची मेल्यानंतरची परवड अखेर थांबली आहे. कोरोना मृतांच्या देहाची होणारी हेटाळणी पाहवत नसल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे प्रवीण अग्रवाल सांगतात. त्यांच्याच पुढाकाराने धुळे शहरात कोरोना काळात प्रवासी निवारा केंद्रासाठी अग्रवाल भवन देण्यात आलं आहे.

या दोघांनी दिलेल्या जागेवर दोन कोरोना बाधितांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही जागा ज्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयांत कोरोना रुग्णांवर उपचार घेत आहेत तिथून अवघ्या ७०० मीटरवर अंतरावर आहे. निर्मनुष्य जागा असल्याने याठिकाणी कुणाचा विरोधही झालेला नाही. तब्बल १० कोटी रुपये बाजारमूल्य असलेली खासगी जागा या दोघांनी माणुसकीच्या नात्याने कोरोना मयताच्या अंत्यसंस्कारासाठी दिली आहे. या निर्णयामुळे महापालिका, आरोग्य विभाग आणि पोलिसांवरील मोठा ताण कमी झाला आहे. कोरोना विरोधात लढताना माणुसकी जिवंत ठेवावी लागेल. माणसाला माणूस म्हणून वागवावे लागेल हा विचार मनात ठेवून शेकडो प्रवासी मजुरांना जेऊ-खाऊ घातले. त्यातच अंत्यविधीवरून येणाऱ्या बातम्यांमुळे व्यथित होऊन आम्ही दोघांनी जागा देण्याचा निर्णय घेतला, असं प्रवीण पवार सांगतात.

कोरोनामुळे मयत रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबाना जो सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत होता त्यातून त्यांची सुटका झाली आहे. कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी झाला आहे. सोबतच मृतदेहांची हेळसांड थांबलेली आहे. माणुसकी धर्म जोपासणाऱ्या या दोघा प्रवीण यांचं कार्य दिशादर्शक आहे

– कावेरी राजपूत, धुळे

Leave a Reply