भारतीय भाषांच्या जोडीनेच एखादी परकीय भाषा शिकण्याचं प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहे, पण त्यामागे त्या भाषेवरच्या प्रेमापेक्षा नोकरीची गरज हेच महत्वाचं कारण असतं. परभणीतील हडको भागातील रहिवासी कीर्तिमालिनी जावळे यांनी मात्र मातृभाषा मराठी असूनही पहिली ते पीएचडीपर्यंत उर्दू भाषेतून शिक्षण घेतलं आहे.
कीर्तिमालिनी जावळे या प्राध्यापिकेची ही गोष्ट. त्यांचे वडील हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं सहशिक्षक होते. आजोबांना फारसी, मोडी अवगत होत्या. वडिलांना उर्दू शिकायची इच्छा झाली. त्यांना ती शिकायला मिळालीही. विशेष म्हणजे पुढे जवळपास 14 वर्ष त्यांनी उर्दू शिकवायचं कामही केलं. वडिलांच्या अंगाखांद्यावर खेळताना उर्दू बडबड गीतांमधून कीर्तिमालिनी यांच्यापर्यंत पोचली. नंतर रितसर शाळेत प्रवेश घेतला. मातृभाषा मराठी असूनही शाळेत उर्दू शिकताना ही भाषा आपली नाही असं कधी त्यांना वाटलंच नाही.
भाषेकडे बघण्याची निरागसता कशी आणि किती असावी हे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर समजतं. लहानपणीचं शिक्षण मशिदीत झालं कारण वर्ग तिथं भरत असत. वडिलांना दाढी होती. पण आई नऊवारी साडी नेसायची, मोठ्ठं कुंकू लावायची. कुणाला काही चुकीचं वाटत नव्हतं. जेव्हा आखाडा बाळापूरहून ते हिंगोली शहरात राहायला आले तेव्हा काही बदल जाणवू लागले. कुणी म्हणायचे ‘अरे ये हिंदवानी है’. हिंगोलीमध्ये शाळेत मुलीं नमाज अदा करायच्या तेव्हा कीर्तिमालिनी तिथंच ताटकळत उभ्या राहायच्या. तेव्हा त्यांना खूप एकटं वाटायचं. पुढे त्या हिंगोली जिल्ह्यात शिक्षक म्हणून नोकरीला लागल्या. तेव्हा त्यांच्याकडून उर्दू शिकणार्या मुलींच्या आई-बाबांनाही काही वेगळं वाटले नाही. शिक्षक असताना त्यांनी उर्दू शाळेत राखी पौर्णिमा साजरी केली, कोणी विरोध केला नाही. उलट संक्रांतीचा तिळगुळ -लाडू सगळ्याजणी मिळून खायच्या. ईदला निमंत्रण मिळायचं. तिथंही त्या जायच्या. पुढे या भाषेची नजाकत त्यांना कळली. त्यांनी नेटची परीक्षा उत्तीर्ण केली पण टिकलीवाली एक बाई उर्दू कशी शिकवते? असा प्रश्न विचारला गेला. बीडमध्ये बलभीम महाविद्यालयात उर्दूसाठी पंधरा विद्यार्थी मिळवताना त्यांना बराच संघर्ष करावा लागला. ही भाषा कोणी शिकवावी यावरून अधून-मधून वादही निर्माण केले जात असत. पण भाषा आणि धर्माचा संबंध नसतो हे रुजविण्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागले. याकामी खूप जणांनी सहकार्य केल्याचं त्या आवर्जून सांगतात. परभणीतील श्री शिवाजी महाविद्यालयात उर्दूतून शिक्षण घेतल्यानंतर याच भाषेत करियर करण्याची संधी मिळाली. प्रा.तुराबअली यांनी कीर्तिमालिनी यांनी उर्दूतूनच उच्च शिक्षण घ्यावं यासाठी केलेला आग्रह त्या आवर्जून नोंदवतात. तसे अनेक प्रसंग कसोटीचे आले. डी.एड.कॉलेजच्या एका प्राचार्यांनी बुरखा सक्तीचा आहे असं सांगितलं होतं. त्यावर किर्तिमालिनी यांचे वडील प्राचार्यांकडे गेले आणि म्हणाले, ‘माझी मुलगी भाषा शिकते आहे याचा अर्थ तिने धर्माचरण करावे असे नाही’. पुढे त्या प्राचार्यांनी परवानगी दिली. असे अनेक प्रसंग त्या सांगतात.
नेट, सेट आणि पीएचडी या सर्वच परीक्षा त्यांनी उर्दूतून दिल्या आहेत. औरंगाबाद इथं मराठवाडा विद्यापीठाच्या उर्दू विभागात कीर्तिमालिनी शिकवतात. त्यांनी ‘प्रेमचंदच्या लघुकथांमधील मागासवर्गाचे प्रश्न’ यावर शोधनिबंध लिहिला आहे. त्यांच्या कादंबर्यातील मागासप्रवर्गाचे हाताळलेले प्रश्न यावर संशोधनही केलं आहे. प्रेमचंद यांच्या 12 कादंबर्या आणि 312 उर्दूतील लघुकथा हा त्यांच्या अभ्यासाचा व अध्यापनाचा भाग आहे. भाषा शिकण्यासाठी नव्या जाणिवा विकसित करणारी मराठी मुलगी आज उर्दूतील तज्ञ बनली आहे.
– बाळासाहेब काळे, परभणी