मासिक पाळीविषयीच्या जागृतीत आता आमचा जिल्हा मागे राहणार नाही
देशात, स्त्रियांना गर्भाशयाचा कर्करोग होऊन झालेल्या मृत्यूंपैकी दोन तृतीयांश मृत्यू हे, मासिक पाळीतील निष्काळजीपणा, त्याविषयीचे गैरसमज यामुळे होत असल्याचं दिसून आलं आहे. महाराष्ट्रातही  ग्रामीण  भागातल्या केवळ १७. ३० टक्के स्त्रियांपर्यंत सॅनिटरी नॅपकिन पोहोचलं आहे. यामागचं कारण प्रामुख्यानं जागरुकतेचा अभाव आणि खरेदीतल्या अडचणी !
आमचा रत्नागिरी जिल्हा एरवी सुधारणांचा पुरस्कर्ता, शिक्षण, स्त्री शिक्षणात जिल्हा राज्यात अग्रेसर. पण मासिक पाळीबाबत इथल्याही ग्रामीण भागात आजही अनेक गैरसमज आहेत. मात्र आता आमचा जिल्हा मासिक पाळीविषयीच्या जागृतीत मागे राहणार नाही.
 यासाठी पुढाकार घेतला आहे  रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ इंदुराणी जाखड यांनी. मॅडम स्वतः एमबीबीएस. वर्षभराचं  नियोजनच मॅडमच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमनं  तयार केलं  आहे. मासिक पाळी व्यवस्थापन दिवशी या उपक्रमाची सुरुवात झाली.   जिल्हा परिषदेच्या  १ हजारहून अधिक शाळांचा उपक्रमात समावेश आहे.  दर महिन्याला प्रत्येक शाळेतील २ मुली प्रेरक म्हणून निवडण्यात येणार आहे.  त्यानंतर या मुली  शिक्षक, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीनं   गावातील घरोघरी जाऊन मासिक पाळीविषयी जनजागृती करणार आहेत.
मुलींचा  आहार आणि मासिक पाळी याविषयी मार्गदर्शन वर्ग होणार आहेत, हिमोग्लोबिन तपासणी शिबिरं होणार आहेत, तशा  सूचना जिल्हयातील सर्व माध्यमिक शाळांना करण्यात आल्या आहेत.
प्रत्येक शाळेमध्ये चेंजिंग रुमची संकल्पना , मासिक पाळी आल्यामुळे मुलींची शाळा सुटणं , थांबवण्यासाठीही प्रयत्न होतील,असं  डॉ इंदुराणी जाखड यांनी सांगितले.
अपंगत्वामुळे मासिक पाळीचं  सुयोग्य व्यवस्थापन करु न शकणाऱ्या मुली व महिलांना, त्यांच्या काळजी वाहकांना  प्रशिक्षण,  अपंग मुली व महिलांच्या आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशिक्षणासोबतच सॅनिटरी नॅपकीनचे वाटप,  त्यांना मासिक पाळीविषयी माहिती, त्यांच्या गरजा  यावर संवाद साधणं  याचं  नियोजनही मॅडमनी  तयार करून दिलं  आहे.योजनेचं सहामाही आणि वार्षिक मूल्यमापन होणार आहे.
अशा प्रकारे  मासिक पाळी व्यवस्थापन प्रभावी अंमलबजावणी करणारा रत्नागिरी पहिला जिल्हा आहे. यासाठी युनिसेफचीही साथ लाभली आहे.
 मासिक पाळी व्यवस्थापन रत्नागिरी प्रकल्प येत्या वर्षभरात यशस्वी झाल्यास  संपूर्ण राज्यासाठी रोल मॉडेल ठरणार आहे..
– काशी विनोद, रत्नागिरी

Leave a Reply