राजसी कुलकर्णी-दिवाकरनं डिस्पोजेबल सॅनिटरी पॅडपासून कापडाच्या पॅडपर्यंतचा तिचा प्रवास फक्त तिच्यापुरता मर्यादीत ठेवला नाही. ‘लिक प्रूफ कापडी पॅड’ बनवण्याचं प्रशिक्षण ती देते. अनेक महिलांना यातून रोजगार मिळावा असाही तिचा प्रयत्न असतो. त्यासोबत कापडी पॅड आपल्याकरता आणि निसर्गाकरताही कसे सुरक्षित आहेत याबद्दलही ती जागृती करते. या पुनर्वापर करता येणाऱ्या कापडी पॅडबद्दल तिच्याकडून समजून घेऊयात.
छत्तीसगडमधल्या नक्षल भागात २०१३ मध्ये एका फेलोशीपसाठी मुलींच्या निवासीशाळेत मी वर्षभर राहत होते. तिथं कामाला सुरूवात झाली. तिथं असताना पहिल्यांदा जेव्हा पाळी आली तेव्हा सवयीनं मी डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड वापरलं. पण हे वापरलेलं पॅड फेकायचं कुठं? हा प्रश्न आला. एकतर राहत्या घराच्या मागं झाडात टाकायचं, नाहीतर जाळायचं. पण पावसात ते पॅड नीट जळायचं नाही. मग प्राण्यांच्या तोंडात ते पॅड पाहिल्यावर मला झटकाच बसला. इथं शहरामध्ये डस्टबीनमध्ये पॅड टाकलं की झालं. ते कोणं नेतंय, त्याचं पुढं काय होतं? याच्याशी माझा कुठं संबंध असायचा? बरं, तिथं पॅड सहज उपलब्धही नाहीत. दुकानात जायला बसनं एका बाजूचा प्रवासच तासभर करावा लागायचा. हे सर्व मला खूप डिस्टर्ब करणार होतं. एवढ्या संपन्न निसर्गात आपण घाण का पसरवायची? मी पर्यायाचा शोधू लागले. कॉलेजला असेपर्यंत पाळी दरम्यान पारंपरीक पद्धतीनं कापडच वापरायचे. शिक्षण, कामाकरता बाहेर राहणं वाढू लागलं तसा डिस्पोजेबल सॅनिटरी पॅडचा वापर सुरू झाला तो झालाच. छत्तीसगडमध्ये मी पुन्हा पारंपरीक पद्धतीच्या कापडाकडं वळले. आमची शाळा बांबूची होती. त्याच्या शेजारीच मी राहायचे. त्यामुळं कापड बदलायला पटकन जाता यायचं. तिथं असतानाच एका मैत्रिणीनं त्यावेळी भारतात एकमेव असणाऱ्या ब्रँडेड कापडी पॅडबद्दल मला सांगितलं. मी राहत असणाऱ्या भागात इंटरनेटच्या काड्या फार क्वचित दिसायच्या. मी रेडीमेड कापडी पॅडबद्दल अधिक माहिती मिळवू लागले. शाळेतही मुली आणि शिक्षिकांसोबत पाळी आणि स्वच्छ, शाश्वत पर्यायांबद्दल चर्चा करत राहायचे. मला जुजबी शिवणकाम येत होतं. मग मी तिथंच कापडी पॅड शिवण्याचे प्रयोग करू लागले. तिथं मुलींना, शिक्षिकांना ते वापरायला देऊ लागले. सोबतच पाळी, स्वच्छता आणि आरोग्य याविषयावरही मी तिथं काम करू लागले. २०१६ पर्यंत मी छत्तीसगडमध्ये होते. तिथून मुंबईत परत आल्यावरही मी कापडी पॅडच वापरू लागले. माझ्या कामाची दखल घेतली जाऊ लागली. २०१६ ला ‘ग्रीन द रेड’ची स्थापना केली. तोपर्यंत भारतात कापडी पॅडचे बरेच ब्रँड आले. मी स्वतः खोलात जाऊन अभ्यासाला आणि संशोधनाला सुरूवात केली. महिलांना कापडी पॅड वापरणं नको वाटतं याची मुख्य कारण म्हणजे ते धुवून वाळवा, डागांची भीती, दिवसभर बाहेर असल्यावर काय करायचं? अशी अनेक असतात. पण आपण बाहेर असतानाही हे कापडी पॅड सहज वापरू शकतो. नेहमीसारखंच आपल्यासोबत अतिरिक्त कापडी पॅड ठेवायचं. ह्या कापडी पॅडसोबत एक विशेष पिशवी मिळते. वापरलेलं पॅड यात ठेवायचं. घरी आल्यावर वापरलेलं पॅड धुऊन टाकायचंय.
पॅड कोणतंही असलं तरी 6 तासानं ते बदलायला हवंच. कापडी पॅड बनवण्यासाठी अंतर्वस्त्रांकरता वापरल्या जाणाऱ्या दर्जाचं, मानकाचं कापड वापरण्यात येतं. याकरता वापरले जाणारे रंग बिनविषारी असतात. मोठ्या आयताकृती कापडाची घडी करून तिला पट्टी लावण्यात येते. ज्यामुळं पॅड अंतर्वस्त्रासोबत पक्कं बसत. कापडाच्या घडीच्या शेवटच्या घडीमध्ये एक लीकप्रूफ लेयर लावण्यात येतो. हा लेयरही बिन विषारी रसायनांपासून बनवण्यात येतो. आधी केवळ पाण्यानं मग साबण, पाण्याचा वापर करून हे पॅड धुवून वाळवायचे. हे कापड वाळायला फार वेळही लागत नाही. या कापडावर डागही राहत नाहीत. हे पॅड एक-दीड वर्ष चांगले टिकतात. शहरात ओसंडून वाहणाऱ्या कचराडेपोंवरचा ताण कमी करण्याकरता, ग्रामीण भागातलं पर्यावरण टिकवण्याकरता खारीचा वाटा उचलण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो ना. पुनर्वापर करता येणारी उत्पादनं वापरणं ही काळाची गरज आहे. आपल्या शरीराकरता आणि आरोग्याकरताही कापडी पॅड वापरणं सुरक्षित आहे.
राजसी हे कापडी पॅड बनवण्याचं प्रशिक्षणही घेते. अनेक महिलांना तिनं कापडी पॅड बनवायला शिकवलं आहे. महाराष्ट्र, छत्तीसगडमध्ये तिनं अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. गेले वर्षभर ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातूनही ती मध्यप्रदेशमधल्या महिलांशी जोडली गेली.
– राजसी कुलकर्णी-दिवाकर