मिनूश्री

 

गरज फाउंडेशन, कोरोना काळात गरजूंच्या अहोरात्र सेवेत असलेली संस्था. या संस्थेची धुरा सांभाळतोय विशी-तिशीतला युवावर्ग. संस्थेची सर्वेसर्वा २४ वर्षांची मिनूश्री रावत.


समाजकार्याचं शिक्षण घेतलेल्या मिनूश्रीने 21 मार्च 2018 ला मित्रांना हाताशी धरून संस्था सुरू केली. दानशूरांचा हातभार तिच्या कार्याला आहे. कोरोना काळात मिनूश्रीची टीम तहानभूक विसरून सेवाकार्यात मग्न आहे. स्थलांतरितांना मदत, गरीब कोरोना पीडितांना मोफत औषध देणे, गरजूंना ऑक्सिजन व बेड उपलब्ध करून देणे, पोलिसांना चहा-नाश्ता व मास्क वाटप करणे, कोरोना रुग्णांना घरपोच मोफत टिफिनसेवा पुरविणे, गरीब निराधार तसेच अपंगांना घरपोच धान्य. आतापर्यंत ७ हजार फुड किट वाटप, १५०० बाधितांना दोनवेळा घरपोच टिफिन सेवा.


मिनूश्रीने नुकतेच एक आजी व तिच्या दोन गरीब नातीकरिता झोपडी आणि शौचालय बांधायला मदत केली. त्या मुलींच्या शिक्षणाची सोयसुद्धा केली. वस्तीतील गरीब व गरजू युवती आणि महिलांना शिलाई मशीन देऊन त्यांना रोजगार मिळवून दिला. वस्तीतल्या विद्यार्थ्यांकरिता मोफत शिकवणी वर्ग गरज फाऊंडेशनचे कार्यकर्ते घेतात.
मध्यरात्री फोन-मेसेज केला तरी मिनूश्री मदतीला धावून जाते. ती एकटीच गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा इथल्या आदिवासी भागात दुचाकीने पोहचून मदत पुरविते.
कोरोना काळात मिनूश्री आणि तिच्या टीममधल्या दोन सदस्यांनाही संसर्ग झाला. पण एकही दिवस आराम न करता त्यांनी गरजूंपर्यंत मदत पोहोचवली. तेही आपल्यामुळे संसर्ग पसरणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत.अपंग निराधार रुग्णांवर औषधोपचार करून त्यांची वृद्धाश्रमात राहण्याची सोय संस्था करते. ज्यांचे कोणी नाही त्यांचा अंतविधीही करतात.
कुटुंबीयांचा विरोध झुगारून मिनूश्री झपाटल्यागत काम करत आहे. लहान वयातच अनेक पुरस्कारांनी तिचा सन्मान झाला आहे. मिनूश्रीच्या भावी वाटचालीस शुभेच्छा!

– नीता सोनवणे, नागपूर

Leave a Reply