मिल्खासिंगची मराठी वारसदार!

नाव पूनम. तरीही जीवनात काळोख दाटलेला! जन्मत:च दृष्टीहिन असलेली पूनम खेळाच्या कसोटीत उतरली, जिंकली. दिल्लीला नुकत्याच पार पडलेल्या विकलांगांच्या राष्ट्रीय स्पर्धेत जखमी अवस्थेतही पुनम भीमराव ईटकरे हिने २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत देशातून पहिला क्रमांक आणि राष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले. पहिल्या दिवशी १०० मीटर स्पर्धेत धावताना पडल्याने तिच्या गुडघ्यांना चांगलाच मार लागला. पण आता स्पर्धा जिंकायचीच या जिद्दीने ती उठली. १०० मीटरनंतर २०० मीटर धावण्याच्या शर्यतीचा तिने जखमी अवस्थेत कसून सराव केला. दुसऱ्या दिवशी गुडघ्याची जखम घेऊन ती हिरीरीने सहभागी झाली. जिद्दीने धावली आणि सोबतच्या अनेक स्पर्धकांना मागे टाकत पहिली आली. पूनम लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान. डोळ्यांमध्ये जन्मत:च मोतीबिंदू नसल्याने तिच्या दृष्टीहीनतेवर उपचार होऊ शकले नाहीत, असे भीमरावांनी सांगितले. तिचे शालेय शिक्षण पोफाळी गावातील वसंतराव नाईक अपंग शाळेत झाले. ८वी ते १२वी पर्यंतचे शिक्षण पोफाळीच्याच श्री शिवाजी विद्यालयात झाले.  बारावीत ८६ टक्के गुण घेऊन तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली. सध्या ती नागपूरच्या वानाडोंगरी येथील ज्ञानज्योती अध्यापक विद्यालयात डीएड करीत आहे. यापूर्वी राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेत तिचा पहिला क्रमांक आला होता. पूनम आपल्या यशाचे श्रेय आई,वडील व शिक्षकांना देते. ती म्हणते,”मला खेळातच करिअर करायचे आहे. आंतरराष्ट्रीय खेळात देशाचे नाव सातासमुद्रापार न्यायाचे आहे.भविष्यात अंधांची काठी होण्यासोबतच आयएएस अधिकारी व्हायचे स्वप्न आहे. ” 

छोट्या मार्लेगावातून (ता उमरखेड, जि यवतमाळ) ती थेट राजधानी दिल्लीत पोहोचली. प्रवास सोपा नव्हताच. वडील भीमराव ईटकरे यांची शेती असूनही उत्पन्न नाही. म्हणून ते आणि तिची आई निर्मला रोजंदारीने काम करतात. पूनमच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. धाकटा भाऊ शुभम शेगाव येथे अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिकत आहे.  तिचे वडील म्हणतात, “समाज पुनमला नेहमी आंधळी म्हणून हिणवायचा. त्यामुळे आम्ही व्यथित व्हायचो. पण आज आमच्या याच आंधळ्या पूनमने राष्ट्रीय धाव स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करून आंधळ्या समाजाला दिव्यांगांकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिला. हिणवणारा समाज आता तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतो आहे. एका बापाला यापेक्षा आणखी काय हवे?” पूनमचा मोबाईल क्रमांक ९१३०७०२५६० / भीमराव इटकरे – ९१६८२०००६५/ ९६८९०६७७४२
– नितीन पखाले