मी जिंकणारच..

“आम्ही फक्त किडनी, ह्रदय किंवा कर्करोग – अर्थात ज्यामुळे मरण येईल, अशाच आजारांसाठी – आर्थिक मदत करतो. त्यामुळे तुम्हाला मदत करू शकत नाही. – मदतीच्या अपेक्षेत असताना हे वाक्य कानावर आलं आणि अपूर्वाचा जन्मापासूनचा प्रवास आठवला. जी व्यक्ती यंत्राशिवाय ऐकू – बोलू शकत नाही तिचं जगणं म्हणजे मरणच नाही का?” भाग्यश्री पाटील यांचा सवाल अस्वस्थ करणारा.  अपूर्वा ही नाशिकच्या भाग्यश्री पाटील यांची गोड लेक. जन्मतःच कर्णबधीरत्व, ह्रदयाला छिद्र. चिमुकल्या देहाने अवघ्या ११ वर्षात अपेंडीक्स आणि ऐकू येण्यासाठी केलेल्या शस्त्रक्रिया सोसलेल्या. अपूर्वा पाच वर्षांची होती. आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत हिच्या हातातलं पिस्तुल पाहून तिच्या मनात कुतूहल जागं झालं. आज तिने राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व करण्याचा टप्पा गाठला आहे. जन्माने आणि परिस्थितीने दिलेल्या प्रतिकूलतेवर जिद्द आणि चिकाटीने मात करत अपूर्वा नेमबाजीप्रशिक्षण पूर्ण करत आहे. भाग्यश्री सांगतात, “अपूर्वा विशेष मुलगी असल्याने सुरूवातीपासूनच सासरच्या मंडळीनी तिला चांगली वागणूक दिली नाही. दुसर्याल अपत्याचा विचार कर, असा सल्ला नातेवाईक देत राहिले. अपूर्वासाठी एवढा मोठा वैद्यकीय खर्च कशासाठी करायचा, हा नातलगांच्या नजरेतला टोकदार प्रश्न घायाळ करायचा. शाळेतही, ती विशेष मुलगी असल्याने होणारी हेळसांड पाहता तिला भोसला शिशु विहारमध्ये घातलं. याच काळात तिला सहज ऐकता यावं, यासाठी श्रवणयंत्र बसविण्याची शस्त्रक्रिया झाली. ऎकू येण्यातले अडथळे कमी झाले. शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे शिकण्याची, जिंकण्याची, काही करण्याची ऊर्मी निर्माण झाली. नकळत्या वयात अपूर्वाला लेखनाचा छंदही जडला. तिची नेमबाजी शिकण्याची ओढ पाहून सातपूर क्लब हाऊसच्या मोनाली गोर्हे यांना प्रशिक्षणासाठी विचारलं. त्यांनी अपूर्वाला विनामूल्य शिकवायचं ठरवलं. मोनाली यांचे प्रयत्न, डॉ. घाटगे यांचं मार्गदर्शन, यामुळे अपूर्वा विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करू लागली. तिला चार सुवर्ण पदकांसह अनेक सन्मान मिळाले आहेत.”

अपूर्वा म्हणते, “मला ऑलिंपिकमधल्या अपंगासाठी असलेल्या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व करायचं आहे. माझं आजारपण निभावताना आई-बाबांची दमछाक होते, हे समजतं मला. पण त्यांचे कष्ट मला प्रेरणा देतात. आणि मला विश्वास आहे – मी जिंकणारच..” भाग्यश्री सांगतात, “अपूर्वा खूपच समजुतदार आहे. तिचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मी केवळ भार वाहणारी आहे. मात्र, त्यासाठी आमच्या आर्थिक विवंचना संपल्या पाहिजेत.”
अपूर्वाच्या उपचारांवरच्या खर्चासाठी सुरूवातीला काही सामाजिक संघटनांनी, नातेवाईकांनी मदत केली. पण नंतर अनेकांनी पाठ फिरवली. वर्षाकाठी ५० ते ६० हजार रु उपचारांनाच लागतात. त्याखेरीज नेमबाजीप्रशिक्षण, पोहणं आणि अन्य उपक्रम असतात. खर्च कुठून करायचा?
अशाही स्थितीत अपूर्वा जून महिन्यात होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्यासाठी सर्व निकषांवर ती पात्र ठरली आहे. फक्त स्वतःचं पिस्तुल या एका गोष्टीसाठी अडलं आहे. सध्या भाग्यश्री पाटील या खर्चासाठी पैसे उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रवास पालकत्वाचा – भाग्यश्री पाटील