‘मी तीनदा आजारातून बाहेर पडले, तुम्हीही पडू शकता’

 

गेल्या दहा वर्षात तीन वेळा झालेला तीन वेगवेगळ्या प्रकारचा कर्करोग . त्यासाठी घेतलेल्या २० केमो, दीड महिन्याचे रेडिएशन आणि तीन शस्त्रक्रिया. केमोचे दुष्परिणाम मोजता येऊ नये असे. इतके असूनही, ”कर्करोग हा मात्रा मित्र आहे” हे वाक्य जेव्हा समोरचा उच्चारतो तेव्हा ऐकणाऱ्याचे कान आणि भुवया उंचावतात. कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा बाऊ न करता नाशिकमधल्या ज्येष्ठ पत्रकार वंदना अत्रे त्यांचा दहा वर्षातील कर्करोगाचा प्रवास सहज उलगडतात. वंदना मॅडम पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनाही शिकवतात.


सेवानिवृत्त झाल्यावर राहून गेलेली बकेट लिस्ट पूर्ण करायची असं ठरवलं असतानाच २००८ मध्ये त्यांना बीजांडाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं. त्यावेळी उपचारादरम्यान बेचव होत जाणारी जीभ आणि काहीही न मानवणाऱ्या पोटाचा आहार कसा असावा, असह्य वेदना कशा सहन करायच्या याविषयी माहिती नव्हती.
विचारांच्या गर्तेत असतानाच भीष्मराज बाम यांचं मार्गदर्शन लाभलं. सकारात्मक विचार करायचा म्हणजे काय, कसा याचं अत्यंत मोलाचं उत्तर बाम सरांनी दिलं. ”मनातल्या अनेक विचारांपैकी एका विचाराची निवड करण्याचे स्वातंत्र्य तुला आहे. कोणता विचार स्वीकारायचा ते तू ठरव. त्यानुसार शरीरातील पेशी वागतील.” सरांच्या या सूत्राचा अंगीकार करत आजाराशी मैत्री करण्याचं वंदना मॅडमनी ठरवलं. . योग्य आहारविहार आणि उपचार यामुळे त्यांनी या आजारावर मात केली खरी पण लागोपठ त्यांना आतड्याचा आणि अन्य एका ठिकाणचा कर्करोग झाला. या अनपेक्षित वादळावरही मॅडमनी सकारात्मक विचार ठेवत मात केली. परिस्थिती स्वीकारत त्यावर मात करण्यासाठी आपण काय करू शकतो यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. . या वेळेस योग्य आहारासोबत मनाला उभारी देणारा पण झेपेल इतका व्यायाम, प्राणायाम आणि संगीत याची निवड त्यांनी केली.
दहा वर्षाच्या या प्रवासात त्यांची दहा पुस्तकं प्रसिध्द झाली. त्यांना काही पुरस्कार मिळाले. ” या आजारानं माझ्या मनातील शक्तीची ओळख करून दिली”, मॅडम सांगतात.
या अनुभवाची शिदोरी अन्य कर्करोगग्रस्त रुग्णांपर्यंत पोहचावी, यासाठी त्यांनी सर्पोट ग्रुप सुरू केला. हेतू हाच की, ”मी आजारातून बाहेर पडले, तुम्हीही बाहेर पडू शकता”, हा विश्वाास मनात निर्माण करणं. आजारातून बाहेर पडण्यासाठी सकारात्मक विचार, आहार, विहार याची माहिती त्या देतात.

– वंदना अत्रे

-प्राची उन्मेष, नाशिक

Leave a Reply