मुक्काम नागपूर रेल्वे स्टेशन

आलटून पालटून एकाच वेळी दोन फोनवर बोलणं, सतत काही ना काही विचारायला येणाऱ्यांना अटेंड करणं आणि त्याचबरोबर प्रवाशांना वाटण्याच्या सामग्रीचं काम हे सगळं ती अत्यंत लीलयेने जुळवून आणत असते.
तिचं नाव वृंदन बावनकर. प्रथमसाठी ती काम करते. ‘दे हात फाऊंडेशन’ ची ती संस्थापिका आणि ग्राम विकास संस्थेची कार्यकारी संचालिका आहे.

परराज्यातल्या मजुरांना आपल्या राज्यात सोडण्यासाठी नागपुरातून रोज १५-२० रेल्वेगाड्या जातात. या गाड्यातून जाणारे मजूर उपाशी राहू नयेत यासाठी वृंदन आणि तिच्या टीममधले १६ जण अहोरात्र काम करत आहे. देशभरातल्या विविध ठिकाणी विविध ठिकाणांहून जाणाऱ्या या गाड्या. यातल्या किती जणांना मदत करायची आहे त्याची यादी रेल्वे देते.

पाण्याच्या बाटल्या, जेवण, बिस्कीट, ताक दूध, इतकेच नाही तर नुकतीच प्रसूती झालेल्या बाळंतिणींसाठी विशेष आहार, बाळांसाठी विशेष आहार, सॅनिटरी नॅपकिन्स याची सोयही वृंदनची टीम अत्यंत नियोजनबद्धरित्या करत आहे.
वृंदन सांगते, ”सुरुवातीला आयआरसीटीच जेवण देणार आणि आम्ही दूध, लहान मुलांसाठी खाऊ असं ठरलं होतं. पण हळूहळू लक्षात आलं की एवढ्या जणांची सोय करणं रेल्वेला कठीण पडत आहे. मग आम्ही इतर आहार द्यायलाही सुरुवात केली.” आता आणखी दोन टीम त्यांच्या सोबत आल्या आहेत. नागपुरातून सध्या ५० हजार फूड पॅकेट्स दिली जात आहेत. त्यापैकी १० हजार पॅकेट्सची सोय वृंदनची टीम करत आहे.
सुरक्षेच्या नियमांचं पालन करून वृंदन आणि तिच्या टीमला संपूर्ण गाडीत २० मिनिटात सामग्री पोहोचवायची असते. सुरुवातीला केवळ किड्स मिल पुरवत असताना मधेच एखाद्या मजुराकडे काहीच नसल्याचं लक्षात यायच, मग रेल्वे स्टाफला गाडी थांबवायची विनंती करून त्याला अन्नपाणी पुरवलं जातं.
हे सगळं ४७ अंश सेल्सिअस तापमानात. स्टेशनमधल्या बाकांवर बसणंही अशक्यप्राय. मोबाईल पॉवरबँकला जोडला तर येतं, इट्स टू हॉट.
त्यांचं काम पाहून अनेक जणांची साथही यात मिळू लागली आहे.
त्यापैकी काही म्हणजे – DrPriyadarsh Monk @Shinidhi Datar, @Maitreyi Shrikant Jichkar @Sukhada Chaudhary @Avinash Nebhani #SantNirankariCharitableTrust @Ghanshyamgupta Ghanshyamgupta @Cyrus K Watchmaker @Khushroo Poacha #SEVAKITCHEN @Shalini Chhabriya Bose
”काही जण सांगतात आम्ही तुमच्यासोबत येऊ शकत नाही पण आम्ही खिचडीची सोय करू शकतो, पैसे देऊ शकतो, आम्ही दूध देऊ शकतो. ” वृंदन सांगते. ”रेल्वेनं फक्त आवाहन करावं, नागपुरातून एकही माणूस उपाशी जाणार नाही, एवढी सोय नक्कीच होऊ शकते.”
– सोनाली काकडे

Leave a Reply