मुक्काम पोस्ट मुणगे व्हाया मुंबई व्हाया पुणे !


३१ ऑक्टोबरला जेव्हा वाढदिवसाच्या दिवशी जयश्रीच्या हाती स्मार्ट फोन आला तेव्हा वाढदिवसाच्या भेटीपेक्षा आता आपलं शिक्षणं थांबणार नाही, याचा आंनद तिच्या चेहऱ्यावर झळकला. आई-वडील शेतमजुर, दररोज काम मिळण्याची खात्री नाही, कच्चं घर, त्यात जयश्री सह तिचे आई-बाबा, दोन भावंडं आणि काका राहातात. सिंधुदुर्ग, तालुका देवगड येथील मुणगे गावांतल्या जिल्हा परिषद शाळेची जयश्री विद्यार्थिनी. दहावीला ८९% मिळवून पास झाली आणि अकरावीसाठी वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला. गावात कोविडरुग्ण वाढल्यामुळे संचारबंदी. ऑनलाईन वर्ग सुरु होणार असल्याचं कळलं. शिकण्याची जिद्द असली, तरी साधनांशिवाय काय करणार?


नवी उमेदच्या एक लेखिका मुंबईच्या मेघना धर्मेश या मदत हवी असलेले आणि मदत करू इच्छिणारे यांच्यातला पूल बनतात, मध्यस्थाची भूमिका नेहमीच करत असतात. मुणग्याच्या जयश्रीला एका मोबाइल फोनची गरज आहे, हे मेघनाला कळल्यावर मदत देणारी व्यक्ती शोधायला तिने सुरूवात केली. सोशल मिडिया असतोच सोबतीला. जयश्रीला मदत हवीये, हे मेधा कुळकर्णींपर्यंत पोचलं होतं. त्याच दरम्यान फेसबुक फ्रेंड पुण्याचे हृषिकेश साळवेकर यांनी मदत हवी असलेल्या एखाद्या व्यक्तीचं नाव सुचवाल का अशी विचारणा मेधाताईंकडे केली. हृषिकेशच्या मित्राच्या आई उज्वलाताई जोशी ह्यांना गरजू विद्यार्ध्याला मदत करायची होती. मेधाताईंनी जयश्रीचं नाव सुचवलं. तिच्यासाठी फोन घ्यायचं ठरलं. लॉकडाउन काळ, प्रवासावर मर्यादा. तर फोन जयश्रीपर्यंत पोचवायचा कसा? मुबंईच्या एक निवृत्त शिक्षिका शरयू घाडी मुणग्याला जाणार असल्याचं कळलं. सगळ्यांचा एकमेकांशी संपर्क झाला. आणि मुक्काम पोस्ट मुणगे इथे व्हाया मुंबई – पुणे असा जयश्रीच्या हाती नवा कोरा स्मार्ट फोन पोचता झाला.


अभ्यासासोबत वाचन, पेटीवादन, गायन, चित्रकला या कलांची आवड जपणाऱ्या जयश्रीला भविष्यात CA करायचं आहे.
मोबाइल फोनच्या सुविधेमुळे तिच्या शैक्षणिक प्रवासाला नीट सुरूवात होत आहे. फोन मिळाल्या मिळाल्या तिने कृतज्ञता व्यक्त करणारं पत्रच पाठवलं. नवी उमेदच्या नेटवर्कमधून हे घडलं याचं आम्हाला समाधान. अशा समजूतदार जयश्रीला पुढच्या वाटचालीसाठी टीम नवी उमेदकडून शुभेच्छा !
– नवी उमेद प्रतिनिधी

Leave a Reply