मुख्यमंत्र्यांनी विचारलं, कोमलताई करू शकतात ते बाकीचे सरपंच का नाही?

 

‘पूर्णवेळ राहू घरी कोरोनावर करू मात’, ही मोहीम राबवत कोमलताईंनी त्यांचं गाव कोरोनामुक्त केलं. रविवारी जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे विशेष कौतुक केलं. ऋतुराज देशमुख आणि कोमल करपे या दोन सरपंचांप्रमाणे राज्यातल्या सगळ्या सरपंचांपुढे आपलं गाव कोरोनमुक्त ठेवण्याचं आव्हान ठेवलं आहे.
२१ वर्षांच्या कोमलताईंनी नेमकं काय केलं? अंत्रोळी हे त्यांचं गाव कसं कोरोनामुक्त केलं?
अंत्रोळी, दक्षिण सोलापूर तालुक्यातलं गाव. लोकसंख्या २,२९८. पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेत कोरोनाचा संसर्ग गावात वाढत होता. दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यात रुग्ण वाढायला लागले. मार्चपासून एप्रिलपर्यंत ८८ जणांना कोरोनाची लागण झाली.


सरपंच कोमलताईंनी पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतला. जनजागृती, रुग्णांचा शोध, तपासणी, लसीकरण, नियमांचं काटेकोरपणे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ही पंचसूत्री. ग्रामसुरक्षा दल आणि ग्रामदक्षता या दोन समितीची स्थापना केली. त्यात युवकांचा समावेश. या दोन्ही समित्या तसंच आशा-आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका यांना मोहिमेत घेतलं. गावकरीही ग्रामपंचायतीचे नियम काटेकोर पाळू लागले.
ग्रामपंचायतीनं सॅनिटायझर, मास्क वाटले. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना १०० रुपयांचा दंड. विनापरवानगी दुकान उघडणार्‍या दुकानदारांवर ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. गावाबाहेरून विक्रीस येणार्‍या विक्रेत्यांना बंदी. गावातील दूध विक्रेत्याची चाचणी अनिवार्य. न करणार्‍या विक्रेत्याकडून दूध न घेण्याच्या सूचना ग्रामस्थांना दिल्या.
तसेच जे लोक कोरोना चाचणी करणार नाहीत त्यांना शिधा न देण्याच्या सूचनाही दुकानदाराला दिल्या होत्या. मात्र ही वेळ आलीच नाही. त्याआधीच सर्वच ग्रामस्थांनी चाचणी करून घेतली.
गाव कोरोनामुक्त झालं असलं तरी लढाई अजून संपली नाही. गावात आता कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी काळजी घेत असल्याचं कोमलताईंनी सांगितलं. लवकरात लवकर गावातील सर्वांचे लसीकरण करून घेणार असल्याचंही त्या म्हणाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळेत दहा खाटांचं कोविड सेंटर उभारायचं आहे.
तीन महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोमलताई सरपंच झाल्या. दयानंद महाविद्यालयातून बीएससी (बॉटनी) शिक्षण त्यांनी घेतलं. कुठलाही राजकीय वारसा नसताना त्या सरपंच झाल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कौतुकामुळे त्या भारावून गेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कौतुकाने गावाच्या विकासासाठी काम करण्यास बळ मिळाल्याचं कोमलताई सांगतात.

-विनोद चव्हाण, ता. द. सोलापूर, जि. सोलापूर

Leave a Reply