मुलांचं वही – पेनाशी नातं तुटू नये म्हणून
लॉकडाऊनने तरुणाईचे अनेक मार्ग बंद केले. हा काळ खूप तरुणांसाठी त्रासदायक होता. ऐन उमेदीच्या दिवसांत घरात बसून राहणं काय असतं हे सर्वच तरुणांनी अनुभवलं. अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक जण निराश झाले. पण, या काळातही बऱ्याच तरुणांनी खूप वेगवेगळ्या क्षेत्रांत उंच भराऱ्या घेतल्या. अनेक नवे मार्ग शोधले. प्रफुल्ल शशिकांत, आकाश भोर आणि ऋतुजा जेवे या तिघांनाही याच काळात आपला मार्ग गवसला.
सामाजिक क्षेत्रांत काम करणारे धडपडे तरुण. लोकांसाठी काहीतरी करायचं, या विचारातून त्यांनी साधारण अडीच वर्षांपूर्वी ‘वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन’(वोपा) या नावाने सामाजिक संस्था सुरू केली. खरं तर, या तिघा इंजिनिअर्सची गडचिरोलीतल्या डॉ. अभय बंग यांच्या ‘निर्माण’ या युवकांसाठीच्या शिबिरातून ओळख झालेली.
वोपा सुरू करण्याआधी प्रफुल्ल आणि आकाशने ‘निर्माण’च्या को – ऑर्डीनेशन टीममध्ये, तर ऋतुजाने चीफ मिनिस्टर फेलो म्हणून औरंगाबादमध्ये काम केलं होतं. पण, नंतर त्यांचे विचार आणि कामाच्या पद्धती जुळत गेल्या आणि नवं काम उभं राहत गेलं. त्यांना शिक्षण क्षेत्रात काम करायचं होतं, पण, त्यासाठी स्वतःची संस्था काढणं हा त्यांचा उद्देश कधीच नव्हता. इतर मोठ्या संस्था, सामाजिक क्षेत्रातल्या नावाजलेल्या लोकांसोबत काम करावं, या विचाराने ते हात पाय मारत होते. पण, आपल्याला हवं तसं, काम करण्याचं स्वातंत्र्य हवं असेल, तर स्वतःची संस्था काढण्यावाचून पर्याय नाही, हे त्यांना लक्षात येत गेलं आणि त्यातूनच ‘वोपा’ची कायदेशीर स्थापना झाली. मराठवाड्यातल्या शिक्षणावर काम करायचं, या विचारातून त्यावेळी सुरू झालेलं ‘वोपा’चं काम आता महाराष्ट्रभर पोहचलं आहे. सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं, यासाठी चांगले शिक्षक असायला हवे, म्हणून ‘वोपा’ने आधी शिक्षकांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. नगरचं स्नेहालय, बीडची सोनदरा गुरुकुल अशा निवासी शाळांमधल्या शिक्षकांचं प्रशिक्षण वोपाकडून सुरू होतं. पण, लॉकडाऊन लागलं आणि वेग घेत असलेलं काम ठप्प झालं.
पूर्वापार चालत आलेलं शिक्षणाचं समीकरण कोरोनाने अवघ्या काही दिवसांत बदलून टाकलं आणि ऑनलाईन शिक्षण सुरूही झालं. त्यासाठी आपले शिक्षक, विद्यार्थी, पालक, तंत्रज्ञान तयार आहे की नाही, हे समजण्याच्याही आधी शिक्षण ऑनलाईन झालं होतं आणि आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं, यापलीकडे कोणालाच काही पर्याय उरला नव्हता. शाळा ऑनलाईन भरू लागल्या, तास ऑनलाईन होऊ लागले, अभ्याससुद्धा ऑनलाईनच सुरू झाला. पण, हळूहळू या सगळ्या व्यवस्थेतल्या अडचणी समोर यायला लागल्या. व्हिडीओ बघणं म्हणजे अभ्यास का? तासाभराचा अभ्यासाचा व्हिडीओ विद्यार्थी न कंटाळता बघू शकतील का? दर्जेदार ऑनलाईन अभ्यासच उपलब्ध नाही. जो आहे, तोही इंग्रजी किंवा हिंदीत आहे, तर स्थानिक माध्यमाच्या मुलांचं काय? फक्त व्हिडीओ बघण्यात आणि व्हिडीओ शोधण्यात जाणाऱ्या डेटाचं आणि वेळेचं गणित कसं जुळवायचं? ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या साईट्स, चॅनेल्सला पैसा भरणं सर्व स्तरातल्या पालकांना शक्य होणार आहे का? असे अनेक प्रश्न पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबत या तिघांनाही पडले होते.
या साऱ्यात विद्यार्थी अभ्यास कसा करेल? यासाठी आपण काही करू शकतो का, या प्रश्नांवर उत्तर मिळवण्यासाठी शेवटी त्यांच्यातला इंजिनिअरच जागा झाला, आणि त्यातून ‘व्ही – स्कूल’ या ऑनलाईन व्यासपीठाची सुरुवात झाली. बीड जिल्ह्यातून सुरू करण्यात आलेलं हे व्यासपीठ विद्यार्थ्यांना दर्जेदार ऑनलाईन शिक्षण मराठीत मिळावं, या उद्देशाने आधी फक्त दहावीसाठी सुरू करण्यात आलं होतं. ‘व्ही स्कूल’वरच्या अभ्यासाचं वैशिष्ट्य म्हणजे, यावर फक्त व्हिडीओचा भडीमार नसून ऑनलाईन अभ्यासाच्या काळातही मुलांचं वही – पेनाशी नातं तुटू नये, या विचारातून ‘व्ही स्कूल’ची रचना करण्यात आली आहे. या आगळ्या पॅटर्नने राज्यभरातल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू झाला.
त्यानंतर, पहिली ते नववीसाठीही असा अभ्यासक्रम असावा अशी मागणी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी केली. मग या तरुणांनी हे शिवधनुष्यही पेलायचं ठरवलं. पण, सॉफ्टवेअरसाठी लागणारा खर्च प्रचंड होता. त्यामुळे सुरुवातीला ‘व्ही स्कूल’ मोफत ठेवावं की नाही, असा एक पेच उभा राहिला. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून नाममात्र पैसे घ्यावे, असाही विचार यांनी केला होता, पण मन मानत नव्हतं. करू पैसे उभे, पण विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत देऊ, या निर्णयावर हे सारे आले आणि ‘व्ही स्कूल’ पहिली ते दहावीसाठी मोफत खुलं ठेवलं गेलं. ज्या दिवसापासून ‘व्ही स्कूल’ मोफत ठेवलं, त्याच्या दुसऱ्याच दिवशी साईट क्रॅश व्हावी, इतका उदंड प्रतिसाद मिळाला. गेल्या ६ महिन्यांत आलेले ८० लाखांवर पेज व्ह्यूज आणि १० लाखांहून अधिक वापरकर्ते पाहिल्यावर या तरुणांनी नक्की काय उभं केलंय याची जाणीव होते.
आता ‘वोपा’ ही फक्त या तीन तरुणांची संस्था राहिली नसून आणखी ६ असेच उत्साही तरुण या टीमचा भाग आहेत. अनेक तरुण स्वयंसेवक आणि शिक्षक कोणत्याही मोबदल्याशिवाय ‘व्ही स्कूल’वरील अभ्यास तयार करायला सज्ज आहेत. लाईव्ह सेशन, स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक व्यासपीठ ‘व्ही – स्कूल’ मार्फत उभं राहिलं आहे. युवांच्या मेहनतीनं आणि कल्पकतेनं समाजात नक्की काय बदल होऊ शकतात, आणि किती वेगाने होऊ शकतात याचा तर हा फक्त छोटासा ट्रेलर आहे!
– अदिती अत्रे

Leave a Reply