मुलांच्या लॅपटॉपसाठी धडपडणारे शिक्षक आणि ग्रामपंचायत

नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातलं जऊळके दिंडोरी. जिल्हा मुख्यालयापासून साधारण २५ किमीवर असलेलं सुमारे ५९० कुटुंबांचं हे गाव. इथं जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेत १ ली ते ७ वीचे २१० विद्यार्थी. इथले शिक्षक प्रयोगशील. शाळेचे ५ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेले. नवोन्मेष उपक्रमांतर्गत प्रयोगशाळेत ५२० प्रकारचं प्रयोगसाहित्य. कोरोना काळात मुलांचं शिकणं थांबू यासाठी इथले सर्व शिक्षक प्रयत्नशील. समाज सहभागातून मोबाईल, एफएम रेडिओ विद्यार्थ्यांना देण्यात आले.


गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, विस्ताराधिकारी सुनीता आहिरे, केंद्रप्रमुख शरद कोठावदे यांच्या मार्गदर्शनाखाली नालंदा प्रकल्पाअंतर्गत तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना ४० टॅबच्या माध्यमातून शिक्षण. त्यामुळे मुलांचा शिकण्यातला आनंद वाढला.
शाळेच्या यशात ग्रामपंचायतीचा मोलाचा वाटा आहे. ग्रामपंचायत आणि महिंद्रा कंपनीमुळे शाळेची इमारत आकर्षक झाली आहे.


आता या शाळेत २५ लॅपटॉपची लॅब साकारली जात आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ही खरेदी झाली आहे. जिल्ह्यातली परिषदेच्या शाळेतली अशा प्रकारची ही पहिलीच प्रयोगशाळा. ग्रामपंचायत सदस्य तुकाराम जोंधळे यांनी यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. मुलांना आजचं तंत्रज्ञान कळावं, त्याचा त्यांना सहजतेनं वापर करता यावा, शिकणं सोपं व्हावं, हा यामागचा उद्देश. सरपंच भारती जोंधळे सांगतात, ”स्पर्धेच्या युगात आमची मुलं कुठे मागे राहता कामा नयेत, प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्त्यांनीही प्रगत व्हावं यासाठीआमची धडपड. ”
शाळेत लॅपटॉप यायला सुरुवात झाली असून सध्या मुलांचं प्रशिक्षण सुरू आहे.
प्रयोगशाळेच्या दर्शनी भागातील भिंतीवर संगणकाच्या की बोर्ड ची थ्री डी प्रतिमा साकारण्यात आली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दोन -अडीच महिन्यांपूर्वी शाळेला भेट देऊन कौतुक केलं. दिंडोरीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांनीही भेट देऊन पाहणी केली.

-प्राची उन्मेष, नाशिक

Leave a Reply