नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वैजाली. इथली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा. गोपाळ गावित आणि राजू मोरे हे इथले उपक्रमशील शिक्षक. मुलांना शाळेत आनंददायी शिक्षणाबरोबरच नावीन्यपूर्ण पद्धतीने शिकायला मिळावं, त्यांच्यात जिज्ञासा निर्माण व्हावी, शिक्षणातील गोडी वाढावी म्हणून हे दोघं सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतात. यावेळी त्यांनी चक्क सूर्यमालाच मुलांच्या हातावर उतरवली आहे. प्रत्यक्ष सूर्य, बुध, शुक्र, पृथ्वी, शनि आणि मंगळही हातावर उतरलेला पाहून मुलं हरखून गेली आहेत. हे कसं घडलं? गावित आणि मोरे या दोन्ही शिक्षकांनी यासाठीी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे. एक्सप्लोअरर फॉर मर्ज क्युब अॅप्लिकेशनच्या त्यांनी वापर केला.

प्रत्यक्ष सूर्यमाला विद्यार्थ्यांना पाहता येत नसली तरी त्याची हुबेहुब त्रिमितीय रचना बनवून विद्यार्थ्यांना प्रत्येक ग्रह शिक्षकांनी समजावून सांगितला. मोबाईलवरील तंत्रज्ञानाचा अविष्कार पाहून मुलेही हरखून गेली. दररोज नजरेस येणारे सूर्यमालेतील ग्रह, उपग्रह, लघुग्रह जवळून पाहण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टीकोन वाढण्यास व त्यांच्यात विज्ञानाची वेेगळी आवड निर्माण होण्यास मदत होऊ शकते. या उपक्रमासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन केल्यास विद्यार्थ्यांना विविध संकल्पना सहज समजावण्यात मदत होते. त्याचबरोबर अध्यापन आनंददायी होते. यापुढेही असे वेगवेगळे प्रयोग करून विद्यार्थ्यांची अध्ययनातील गोडी वाढविण्याचा प्रयत्न आम्ही करू असं हे शिक्षक सांगतात.

अशी सूर्यमाला पाहणं आपल्यालाही शक्य असल्याचं सर सांगतात, “सूर्यमालेचा थ्रीडी अनुभव घेण्यासाठी गुगल प्ले स्टोरवरून एक्सप्लोरर फोर मर्ज क्यूब अॅप डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर त्याची मार्कर इमेज असणाऱ्या मजकुराची प्रिंट स्कॅन करून घेता येईल. यातून प्रत्यक्ष सूर्यमाला पाहायला मिळते. ग्रहमालेतील एखाद्या ग्रहाला स्पर्श केल्यानंतर त्याचा आकार देखील मोठा होईल. त्यामुळे या ग्रहांचे संपूर्ण निरीक्षण करता येणे सोपे होईल.”
– रूपेश जाधव, नंदूरबार
Related