मुलांनी अभ्यासाव्यतिरिक्तही काही करावं.

”आताच्या तरुण पिढीला वाटतं की आपल्या मुलांनी अभ्यासाव्यतिरिक्तही काही करावं. त्यांचा सहभाग,सजगता आणि उत्साह यामुळे खेळाला आता पुरेसं महत्व मिळताना दिसतं”, जागतिक स्तरावर भारतीय नेमबाजीच्या सुवर्णयुगाचा पाया रचणाऱ्या अंजली भागवत सांगत होत्या.  त्यांच्याकडे येणाऱ्या प्रशिक्षणार्थींमध्ये वय वर्षं १२ पासून ४२ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींचा समावेश आहे . त्यांचं प्रशिक्षण हेही एक प्रकारे पालकत्वच. “नेमबाजी हा मेंटल गेम जास्त आहे. यात सायकॉलॉजी खूप महत्वाची आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या स्वभावाप्रमाणे, वयाप्रमाणे हाताळणं, समजावणं, प्रेरित करणं, निकोप स्पर्धा ठेवणं आव्हानात्मक असतं”, अंजली म्हणतात. प्रशिक्षण देताना, काही वेळेस आपल्याला पूर्वी न पडलेल्या शंका विद्यार्थी विचारतात. त्यातून स्वतःलाही खूप शिकायला मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

“लहान मुलांना इगो खूप असतो. तो न दुखावता त्यांना कुठलीही गोष्ट कशी शिकवायची, त्यांच्या कलानं कसं घ्यायचं हे आव्हानात्मक असतं. खुद्द माझ्या सहा वर्षांच्या मुलाकडून, आराध्यकडून खूप शिकायला मिळतं. माझ्या माहेरी वेदपाठकांकडे, मोठं एकत्र कुटुंब होतं. त्यामुळे भावंडाना सांभाळायचा मला अनुभव होता. तो आराध्यसाठी उपयोगी पडला”, अंजली भागवत यांनी सांगितलं.  लहान मुलांचं विश्वच आई असतं. सर्वाधिक तक्रारीही आईबाबतच असतात आणि सर्वाधिक प्रेमही आईवरच असतं, असं त्या म्हणतात. “आराध्य साडे तीन महिन्यांचा असल्यापासूनच मी पुन्हा खेळायला सुरुवात केली. मी जिथे जात होते तिथे त्याला बरोबर नेत असल्यामुळे तो लहानपणापासून खूप माणसांमध्ये वावरला आहे.

तरी त्याला खूप गर्दी, खूप आवाज आवडत नाही. घरातली माणसं, मावशी ,आत्या, भावंडं वगळता तो इतरांशी फारसा बोलत नाही.” त्यावर तुम्ही कशा प्रकारे व्यक्त होता? या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, “तो त्याचा स्वभाव आहे. त्याबद्दल माझी अजिबात तक्रार नाही. त्याचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न मी करत नाही. पण त्याला माणसांमध्ये नेण्याचंही सोडत नाही,” अंजली सांगतात.  “आराध्य स्वतःच्या वस्तू खूप छान सांभाळतो. त्याला गाड्या खूप आवडतात. विशेष म्हणजे त्याच्या संग्रहातली एकही गाडी त्याच्याकडून मोडलेली नाही. त्याला अभ्यास आवडत नाही आणि त्यासाठी त्याच्यावर जबरदस्ती करत नाही. पण जेवढया किमान गोष्टी आवश्यक आहेत तेवढया त्याच्याकडून खेळीमेळीने करून घेते, खास त्याच्यासाठी दिवसभारातला दीड तास राखून ठेवते. सायकल चालवणं, झाडावर चढणं यासारखे मैदानी खेळ त्याला खूप आवडतात. तो भरपूर खेळतो.” अंजली सांगतात. स्वतःचं बालपण जसं खेळामुळे समृद्ध झालं, तसाच खेळाचा मनमुराद आनंद आराध्य घेत असल्याबद्दल अंजली भागवत आनंद व्यक्त करतात. अंजली भागवत, जागतिक कीर्तीच्या नेमबाजपटू

– सोनाली काकडे – कुळकर्णी