माझ्या मुलींच्या वाढीच्या टप्प्यांत मी त्यांच्यासोबत असावं, असं वाटायचं. मुलांना पाळणाघरात ठेवून नोकरीला जाणाऱ्या मैत्रिणींच्या अनुभवांवरून मुलींना आपणच मोठं करणं महत्त्वाचं वाटलं. आता मुली आठ वर्षांच्या झाल्यात, त्या माझ्यावर अवलंबून नाहीत. तानाजीनं तसं सुचवूनदेखील नोकरी-व्यवसाय करण्याचा सध्या तरी माझा विचार नाही. अद्वैता आणि अनन्या जुळ्या असल्या, तरी त्यांचे स्वभाव, चेहरामोहरा, आवडीनिवडी सगळं वेगळं आहे. अद्वैता फक्त एक मिनिट आधी जन्मली म्हणून ती मोठी. खरोखरच ती जबाबदारीची भूमिका निभावते. बहिणीनं मारलं, तर तिला मोठ्या मनानं माफ करणं आणि पुढं भांडण न वाढवणं… एखाद्या गोष्टीसाठी बहिणीनं हट्ट धरला, तर समजूतदारपणे ती वस्तू तिला देऊन टाकणं, असं चालतं.
दोघी अगदी छोट्या होत्या, तेव्हा त्यांना वाढवताना तारांबळ उडायची. प्रवासाला किंवा दवाखान्यात जाताना आई जरी सोबत असली तरी आणखी एक तिसरं माणूस मदतीला लागायचं. पण दोन्ही बाळांची प्रत्येक गोष्ट आपण स्वत: करायची, असं ठरवलेलंच होतं. कान टोचायला नेलं, तेव्हा अद्वैताचे कान टोचले. पण रडण्याचा धुमाकूळ दोघींचा. दुसऱ्या बाळाला कान टोचायला पुढे केलं. सोनार म्हणाला, ‘अरे, या बाळाचे तर कान टोचलेले दिसतात.’ आधीच रडायला सुरुवात केल्यामुळे अनन्याचे कान टोचलेत, असंच वाटलं होतं! असे काही किस्से वगळता, बाकी मूल वाढत असताना ज्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, त्याच गोष्टी मलाही कराव्या लागल्या होत्या. मी, तानाजी दोघंच घरात असल्यामुळे बाळांची रात्रीची जागरणं, दुखणी काढताना कसरत व्हायची. एकीला शांत केलं की दुसरीला मांडीवर घ्यायचं.
चालायला, बोलायला शिकताना बाळाला आईचं सगळं लक्ष आपल्याकडेच असावं, असं वाटत असतं. त्यात त्यांना वाटेकरी नको असतो. परंतु आमच्या मुलींनी बहिणीला वाटेकरी म्हणून पाहिलं नाही. त्या अजाण वयात एकमेकींचा दुस्वास केला नाही. अन्यथा ते दिवस परीक्षा बघणारेच ठरले असते.
जुळ्या मुलींचं पालकत्व विशेषत्वानं जाणवलं, ते मुली शाळेत गेल्यावर. दोघींच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्या तरी एकीला नाचाचा क्लास लावला की दुसरीलाही त्याच क्लासला जायचं असतं. त्यांना ‘दोघी’ म्हणून राहण्याची इतकी सवय झाली होती की त्यांना बाकी कुठल्या मित्रांची गरज वाटत नव्हती. त्यांनी समवयस्कांमध्ये मिसळावं म्हणून प्रयत्न करावे लागले.
शाळेत विद्यार्थ्यांच्या तुकड्या दर वर्षी बदलण्याची पद्धत आहे. पण जुळी भावंडं असली की ती एकमेकांना सोडण्यास राजी नसतात. ती दोघांसाठी एकच तुकडी मागतात. मुली ज्युनिअर केजी मधून सिनिअर केजीमध्ये गेल्या तेव्हा त्यांची तुकडी बदलणार होती. शाळेनं आम्हाला बोलावून तसं सांगितलं. या दोघींच्या तुकड्या आता बदलणार. तुम्ही म्हणालात तर दोघींना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करू. मात्र आम्ही विचार केला, एक वर्ष दोघींना वेगळ्या तुकडीत बसवून बघायला काय हरकत आहे? पुढे याचे परिणाम चांगले झाले. दोघींचं फ्रेंड सर्कल वेगळं आहे. शिक्षिकाही वेगळ्या वेगळ्या असल्यामुळे आम्हाला शिकवण्याच्या विविध पद्धती माहीत होतात. सहलीला गेल्या तेव्हाही दोघी आपापल्या वर्गसोबत्यांबरोबर होत्या. एकमेकींना भेटल्याही नव्हत्या. अशा प्रकारे दोघी स्वतंत्रपणे अनुभव घेतात आणि घरी आल्यावर ते शेअर होतात त्यामुळे प्रत्येकीला अधिक अनुभव मिळतो. टीव्हीचा रिमोट हा दोघींमधल्या भांडणाचा विषय सध्या तरी नाही. कार्यक्रम किंवा चॅनल यांबाबत दोघींचा चॉइस आज तरी समान आहे. एकमेकींसाठी जीव टाकणं हे इतर कोणत्याही घरामधल्या दोन भावंडांसारखंच आहे.
आसावरी तानाजी पाटील
– सुलेखा नलिनी नागेश