मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला 51 वडापाव ‘मोफत’

 

 

अजय अशोक अवचारे सोलापूर शहरातील कुमठा नाका परिसरात राहतात. वय वर्ष ४०. डिप्लोमा इन अॅटोमोबाईलचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी घराजवळ दुकान सुरू केलं. हे दुकान सुरू असताना त्यांच्या चुलत भावाने त्यांना वडापावची गाडी सुरू करण्याची भन्नाट आयडिया सुचवली. कुमठा नाका परिसरात श्रमजीवी कामगार लोक जास्त आहेत. कमी पैशात लोकांचं पोट भरता यावं म्हणून अजयनी २०११ मध्ये वडापावची गाडी सुरू केली.

दहा रुपयात चार वडापाव. त्यामुळे पाहता पाहता वडापावची महती सर्वदूर पोहचली. खमंग वडापावची मागणी वाढली. हा वडापाव खाण्यासाठी कुंभारी, मुळेगाव, अक्कलकोट, दोड्डी, दनाळी या शहरानजीकच्या अनेक गावातील लोक येऊ लागले. या वडापावमुळे लोकांची भूक तर भागली, पण समाजासाठी आणखी काहीतरी करण्याची इच्छा आता अजयच्या मनात मूळ धरू लागली होती. दरम्यान, मुलींचा जन्मदर कमी होत असल्याने कानावर पडत असल्याने बेटी बचावसाठी काम करायचं त्यांनी ठरवलं.

अवचारे यांनी त्यांच्या वडापाव दुकानात ‘बेटी बचाव’ या संदेशाचा फलक लावला. हा फलक ग्राहकाचं लक्ष वेधून घेतो. एकाच मुलीवर कुटुंब नियोजन केलेल्या दाम्पत्याच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला 51 वडापाव मोफत तर दोन मुलींवर कुटुंब नियोजन करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवशी एक वडापाव वर एक वडापाव मोफत, अशी योजना सुरू केली. गेल्या सहा वर्षात आतापर्यंत १०५८ जणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

‘बेटी बचाव’ या अभिनव योजनेला समाजातील सर्व स्तरातून पाठिंबा आणि कौतुक होत आहे. सद्यस्थितीत लक्ष्मी पुणेरी वडापावची हा गाडी दिवसभर सुरू असते. या कामात त्यांच्या घरातील सर्व सदस्य तसंच आठ कामगारही काम करत असतात.

प्रत्येक दिवशी ४ हजारपेक्षा जास्त वडापाव विकले जातात. वडापावसाठी लागणारे बेसन पीठ आणि पाव हे घरीच तयार केलं जातं. तसंच फिल्टर केलेलं पाणी सर्व प्रक्रियेत वापरलं जातं. कोरोनामुळे महागाई वाढल्याने सध्या दहा रुपयात तीन वडापाव विकले जातात.

अवचारे यांना वीणा नावाची एकुलती एक मुलगी आहे. एकाच अपत्यानंतर अवचारे यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन ‘बेटी बचाव’ या योजनेची अंमलबजावणी स्वतःपासून केली आहे. श्री अवचारे यांचे वडील अशोक हे भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील सेवा निवृत्त कर्मचारी आहेत. तर आई सुनंदा या निवृत्त शिक्षिका आहेत. पत्नी वैशाली अध्यापनाचे कार्य करतात. तर त्यांचा लहान भाऊ अलकेश मुख्याध्यापक आहे.

अजय अवचारे सांगतात, “आज स्त्रियांच्या जन्मप्रमाणात कृत्रिम रित्या घट होत आहे. त्यामुळे जीवनचक्र ढासळल्याचं दिसून येतं. भारत देशाचा एक जागरूक नागरिक या नात्याने या देशातील प्रत्येक मुलगी वाचविणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी बनली आहे. ‘बेटी बचाव’ या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. समाजाने आपली सामाजिक बांधिलकी जपल्यास स्त्री हत्या हद्दपार होण्यास विलंब लागणार नाही.”

– विनोद चव्हाण, सोलापूर

Leave a Reply