मॅट्रीमोनी आजोबा
बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यातलं ब्रह्मपुरी. इथले शंकरराव सदाशिव म्हस्के. वय ८०. रुबाबदार आणि नामांकित व्यक्तिमत्त्व.
शेतकरी असलेल्या शंकररावांनी गेल्या पाच दशकात ५०० हून अधिक सोयरिकी जुळविल्या आहेत. त्यासाठी पदरमोड करून त्यांनी गावोगावी भटकंती केली आहे. तेही विनामूल्य. सामाजिक बांधिलकी म्हणून या वयातही त्यांनी हे काम सुरू ठेवलं आहे. जिल्ह्याबाहेरही विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही त्यांनी सोयरिकी जुळवल्या आहेत. गावकऱ्यांचा त्यांच्यावर मोठा विश्वास आहे.
शंकररावांचा जनसंपर्क दांडगा. एखाद्या स्थळाबाबत त्यांच्याकडे विचारणा केली तर मुलामुलीच्या घर, मामेकुळासह सर्व नातेवाईकांची नावेगावे ते तोंडपाठ सांगतात. त्यांच्याकडची माहिती तंतोतंत असते. याचा अनुभव गावकऱ्यांना आलेला आहे. गावातल्या एका वाण्याच्या मुलीला एका मुलाचं स्थळ आलं होतं. त्याबद्दल कौतुक ऐकून मुलीकडचे भाळले. शंकररावांनी सांगितलं, ‘मुलाला दारूचं व्यसन आहे. त्याच्या कुटुंबाची गावात दहशत आहे, सन्मान नाही. सोयरीक करू नका.’मात्र मुलीकडच्यांनी त्यांचा सल्ला मानला नाही. लग्न झालं. थोड्याच दिवसात सासरी होणाऱ्या छळामुळे मुलीला परत आणण्यात आलं.
शंकरराव म्हणतात, ”मुला-मुलींसाठी स्थळ पाहणे आणि ते स्थळ चांगले निघेल किंवा नाही, याची आईवडिलांना मोठी काळजी असते. आईवडिलांचे पैसे , श्रम , वेळ वाचवण्यासाठी , त्यांची चिंता दूर करण्यासाठी मी हातभार लावतो. त्यासाठी कायम काम करत राहण्याची इच्छा आहे.
-दिनेश मुडे,बुलडाणा

Leave a Reply