जागरूक, मेहनती गावकरी, एनजीओ आणि शासन यांनी मिळून केलेले प्रयत्न कामी आले मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या पायविहीर गावात्ले तरूण यंदा पहिल्यांदाच सीताफळं घेऊन मुंबईला आले होते. “100रुपयाला एक बाॅक्स. एका बॉक्समध्ये 24 सीताफळं. याप्रमाणे पाच तासात आमचे 180बाॅक्स विकले गेले.” आदिवासी विकास महामंडळाचे वाहनचालक श्रीधर काळे मुलांना मदत करताना सांगत होते. “सामूहिक वनहक्क कायद्यामुळे आम्हा तरुणांना गावातच रोजगार निर्माण झालाय. वनाचं नियोजन, रखवाली आम्हीच करतो. यासाठीचं प्रशिक्षण आम्हाला वनखात्याकडून मिळालं आहे.” पायविहीरचे रवी येवले सांगतात. या सगळ्यात ‘खोज’ या संस्थेचा सिंहाचा वाटा आहे”, असंही ते सांगतात. जागरूक, मेहनती गावकरी, एनजीओ आणि शासन यांनी मिळून केलेले प्रयत्न कामी आले आहेत.
मेळघाटाच्या पायथ्याशी वसलेलं पायविहीर गाव. वनहक्क कायद्यांतर्गत 2012मध्ये 192 हेक्टर जमीन या गावाला मिळाली. तेव्हापासून या जमिनीवर आवळा, सीताफळ, जांभूळ, कडुलिंब, बांबू या्सारखी दोन लाखांहून अधिक झाडं लावण्यात आली. पायविहीरपासून कुंभीवाघोली, खतिजापूर आणि उपत्खेडा या गावांनीही प्रेरणा घेतली. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातली ही चार पाचशे लोकसंख्येची गावं.
या चारही गावातले तरुण आता वनहक्क आणि सामूहिक ग्राम वननियम अंतर्गत आवळा आणि सीताफळांची राज्यातल्या विविध शहरात जाऊन विक्री करतात. ‘खोज’नं या परिसरात वनहक्क कायद्याबाबत जागृती केली. ग्रामसभांना दावा मिळाला खरा पण जंगलाचं नुकसान झालं होतं. जमीन उजाड झाली होती. जंगलाचं पुनरुज्जीवन करण्याचं आव्हान गावकऱ्यांनी आव्हान पेललं. उजाड झालेल्या 192 हेक्टर वनजमिनीचं जंगलात रूपांतर केल्याबद्दल पायविहीरला ‘खोज’संस्थेसह 2014 चा यूएनडीपी पुरस्कार; तर खतिजापूरला संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत 2015 ला दुसरा पुरस्कार मिळाला. जंगलव्यवस्थापन, शासनयोजना याची माहिती ‘खोज’ने दिली. वृक्षलागवड, मृदा संवर्धन, सिंचन अशी कामं ‘मनरेगा’मधून करण्यात आली. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचं साहाय्य लाभलं. सामूहिक वनहक्क कायद्यांतर्गत पिकवलेला माल बाहेरगावी घेऊन जाण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाच्या वाहनाची व्यवस्था होतीच.
“चार वर्षात मुलं आता चांगली तयार झाली आहेत. संस्था आणि मुलं चर्चा करतात, प्लॅनिंग करतात. आता बहुतांश काम मुलंच करतात.” खोजच्या पूर्णिमा उपाध्याय म्हणाल्या. मेळघाटच्या पायथ्यापाशी समृद्धीची चाहूल लागली आहे.
– सोनाली काकडे.