मेळघाट मधील आदिवासींची ‘नवी उमेद’

सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेला मेळघाट हा खरा निसर्गरम्य परिसर. पण, मेळघाट म्हटलं बालमृत्यू आणि मातामृत्यु एवढी एकच गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते. मेळघाट नैसर्गिकरित्या कितीही संपन्न असला तरी कुपोषण हे या मेळघाटासाठी एकप्रकारे अभिशाप ठरले आहे. पावसाळा म्हटलं की, ही समस्या अधिकच गंभीर होते.

मार्च २०१६ पर्यंत मेळघाट मधे ४४६ बालमृत्युंची नोंद झाली आहे तर एप्रिल ते जून या कालावधीत १० मातामृत्यु झाल्याचे समोर आले आहे. या समस्येवर काम करण्यासाठी अनेक जण पुढे येत असतात. त्यातलंच एक महत्त्वाच नाव म्हणजे कोल्हे दाम्पत्य. आदिवासी, कुपोषण व मातांच्या आरोग्यासाठी अविरत काम करणारे डॉक्टर रवी कोल्हे व त्यांच्या पत्नी डॉक्टर स्मिता कोल्हे हे दाम्पत्य इथल्या गरिब आदिवासी समाजासाठी आशेचा किरण ठरले आहेत. मागील ३० वर्षापासून त्याचं इथं काम सुरु आहे. दाजीसाहेब पटवर्धन यांच्या कार्यातून प्रेरणा घेउन १९८५ साली रवी कोल्हे यांनी धारणी तालुक्यातील बैरागड़ हे गाव गाठलं. त्या काळात डॉक्टरपेक्षा बुवाबाजी वर लोकांचा फार विश्वास होता. त्यातच दळणवळणाच्या सोयी, रस्ते, वीज नाही, अशा प्रतिकूल परिस्थितीमधे रवी कोल्हे यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. पुढे लग्न झाल्यानंतर पत्नी स्मिता यांच्या साथीने रवी कोल्हे यांनी पूर्णवेळ वैद्यकीय सेवा सुरू केली. मेळघाट मधील सर्व परिस्थितिचा डॉक्टरांनी अभ्यास केला व जोपर्यंत या लोकांना पुरेसे अन्न प्राप्त होणार नाही तोपर्यंत ही परिस्थिति सुधारणार नाही असा निष्कर्ष त्यांनी काढला. त्यानंतर डॉक्टर रवी हे शेतकरी झाले. त्या भागात हरितक्रांती घडून आली. त्यांनी आदिवासींना शेतीचे उपजत ज्ञान प्राप्त करून दिले. शासनाच्या विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोचवली. गावातील युवकांचे शिबिर घेउन त्यातून त्यांना सर्व योजनांची माहिती, शिक्षणाचे महत्व, रोग्यांना लागणाऱ्या प्राथमिक उपचारांची माहिती या युवकांना दिली, आज मेळघाटमधे एकही शेतकरी आत्महत्या नाही हे रवी यांच्या शेतीमधील योगदानाच फलित.
पूर्ण मेळघाटमधे युवा कार्यकर्त्यांची फ़ौज निर्माण केली. अन याच युवकांच्या माध्यमातून आता मेळघाट कुपोषण मुक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. या कामासाठी त्यांनी आपली कोल्हापूर येथे असलेली शेतजमीन दान करून एक सुसज्ज असे हॉस्पिटल उभारले.
डॉक्टर रवी कोल्हे व स्मिता कोल्हे यांच्या या कार्याची दखल समाजातील सर्वच स्तरातून घेतली गेली आहे. आदिवासी कल्याण कार्यासाठी राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार कोल्हे दाम्पत्याला दिले गेले आहेत.
आता मेळघाटमधील गावांमधे वीज उपलब्ध व्हावी यासाठी रवी कोल्हे यांचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या वीज असली तरीही ती पुरेशी नाही.
मेळघाटमधील आदिवासी बांधवांसाठी डॉक्टर रवी कोल्हे व स्मिता कोल्हे हे एक ‘नवी उमेद’ ठरले आहेत.
– अमोल देशमुख.