मैत्रिणीचा व्हेंटिलेटर बंद करताना!

 

“छाया बहिरे. बीडच्या जिल्हा रुग्णालयातलीच परिचारिका, कोव्हिड वॉर्डला तिने ड्युटी केली होती. दहा वर्षं मी तिच्यासोबत वेगवेगळ्या विभागात काम केलं. तिला कोरोना झाला. दिवसागणिक तिची प्रकृती खालावत गेली, माझ्या या मैत्रिणीने माझ्यासमोर अखेरचा श्वास घेतला. तिचा व्हेंटिलेटर बंद करताना माझा हात थरथरत होता.” छाया यांचा मृत्यू झाला तेव्हा त्या वाॅर्डात ड्युटीवर असलेल्या परिचारिका वैशाली सपकाळ सांगत होत्या.

वैशाली म्हणतात, “कोरोना सुरू झाल्यापासून परिचारिका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. चक्राकार पद्धतीने सर्व परिचारिकांची कोव्हिड वाॅर्डला ड्युटी लावली जाते. तशी जुलैच्या दुस-या आठवड्यात माझी ड्युटी लागली. या वाॅर्डमध्ये काम करण्याची पहिलीच वेळ. पण मी घाबरले नव्हते. मोठ्या उत्साहाने आम्ही चार, पाच परिचारिका ही ड्युटी करायला गेलो होतो. पाच, सात दिवस चांगले गेलेही. रुग्णांना औषधं देणे, काय हवं नको बघणं इतर काम आम्ही उत्साहाने करायचो. पीपीई किटमध्ये ८ तास काम करणं सोपं नाही. पण या त्रासाकडे दुर्लक्ष करून आम्ही काम करायचो. इतरही परिचारिका होत्या. घरी जाता येत नसल्याने सर्वजण होस्टेलला राहायचो.

पाच सहा दिवसांनी छाया बहिरे आमच्याच वॉर्डात दाखल झाल्या. कोव्हिड वॉर्डात ड्युटी केलेल्या या मैत्रिणीला कोरोना झाल्याचं कळल्यावर मात्र आमचा धीर खचला. दिवसागणिक छायाची प्रकृती बिघडत गेली, डॉक्टर, परिचारिका शक्य ते सगळे प्रयत्न करत होते. छायाचे पती तिच्याजवळ कायम बसून होते. पण तिच्या प्रकृतीत सुधारणा झालीच नाही. २१ जुलै रोजी पहाटे तिचा मृत्यू झाला त्या दिवशी मीच ड्युटीवर होते. तिचा मृत्यू झाला आहे, हे डॉक्टरांनी जाहीर केल्यावर मलाच तिचा व्हेंटिलेटर बंद करावा लागला. हे करताना माझा हात थरथरत होता. तिने उठावं असं मनातून तीव्रपणे वाटत होतं. पण ते शक्य नव्हतं.
या घटनेनंतर हसणारी छाया, तिचं कुटुंब, पती, मुलं हे सगळे डोळ्यासमोर येत होते. एक चांगली मैत्रीण, रुग्णसेवेत तत्पर असलेली हुशार परिचारिका आमच्यासमोर कोरोनामुळे शहीद झाली होती. आम्ही तिला वाचवू शकलो नाही.”
ड्युटीला येतानाचा जो उत्साह होता तो या घटनेनंतर पार पळून गेला आणि त्याची जागा सुन्नतेने घेतली. याच सुन्नतेत आम्ही सगळ्यांचीच ड्युटीचे राहिलेले दिवस पूर्ण केले, वैशाली म्हणाल्या. यापुढे पुन्हा कोव्हिड वाॅर्डला ड्युटी लागेल तेव्हा छाया आठवत राहील.

– अमोल मुळे, बीड

Leave a Reply