मौदात बदल घडवतंय उद्धार फाऊंडेशन

 

वैनगंगा नदीचं मुख असलेल्या कन्हान नदीच्या काठावर वसलेलं मौदा. नागपूर जिल्ह्याच्या वेशीवर असलेले हे शहर तसं मागासलेलंच. तालुक्यात एनटीपीसी,विशाखासारख्या दोन तीन कंपन्या असूनही विकासापासून दूरच. या कंपन्यांमध्येही स्थानिकांचा फायदा जास्त. तालुक्यातला ग्रामीण भाग बहुतांशकरून अशिक्षित आणि रूढीपरंपरांचा वरचष्मा असलेला.
परिस्थितीत सुधारणा घडवण्यासाठी काही युवक एकत्र आले. २० ते २७ वर्षांचे हे युवक. दीड वर्षांपूर्वी त्यांनी उद्धार फाऊंडेशनची स्थापना केली. आष्टी गावात स्मशानभूमीजवळ १५ एकर जागेत ३५० झाडं लावून संस्थेचं काम सुरू झालं.
संस्थेचे अध्यक्ष राम वाडीभस्मे. राम यूपीएससीचा अभ्यास करत आहेत. इतर सदस्यांपैकी काही नोकरी करणारे तर काही शिकणारे. गाव तिथे वाचनालय, शिक्षणाचं महत्त्व , पर्यावरण संवर्धन यासाठी ही मंडळी काम करत आहेत.


सध्या कोरोनामुळे प्रत्यक्षात भेटता येत नाही पण फेसबूक पेजच्या माध्यमातून जनजागृती सूरू आहेत.सुरुवातीला गावकऱ्यांचा प्रतिसाद शून्य होता. पण वारंवार भेटी दिल्यानंतर आता ७०% लोक त्यांचं म्हणणं ऐकतात.
नुकत्याच आलेल्या पुरामुळे कन्हान नदीनं रौद्ररूप धारण केलं होतं. मौदा तालुक्यातल्या १३ गावातलं जनजीवन विस्कळीत झालं. पिकं,अन्नधान्य,कपडे, जनावरांसह त्यांच्यासाठी साठवून ठेवलेला चारासुद्धा वाहून गेला. .कित्येकांची कुटुंबं उघड्यावर पडली. महिना उलटूनही पूरग्रस्तांचे अश्रू थांबले नाहीत.
उध्दार फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नोंदी घेतल्या. करूणा फाउंडेशन आणि इतर दात्यांच्या मदतीनं अन्नधान्य , कपडे वाटले. प्रशासनानं नुकसानीची अधिक योग्य दखल घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
अध्यक्ष राम वाडीभस्मे,शेखर घाटोळे,राहुल घरडे ,उमेश कोर्राम,दिपक मेश्राम ,प्रितम मेश्राम या युवकांची धडपड बघता त्यांच्या कार्याला नक्कीच यश मिळेल या खात्रीसह पुढील वाटचालीस शुभेच्छा..!!

-निता सोनवणे, ता. मौदा, जि. नागपूर

Leave a Reply