6 डिसेंबर- महापरिनिर्वाण दिन. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून वेगवेगळ्या स्तरातले लोक या दिवशी दादरच्या शिवाजी पार्कवर आणि चैत्यभूमीवर गर्दी करतात. कोट्यवधी रूपयांची पुस्तकविक्री, भीमगीतांचे जलसे, वैचारिक कार्यक्रम मुंबई होतात. मात्र या वर्षीची परिस्थिती निराळी आहे. कोविड- 19 च्या हाहाकारामुळे यंदा लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र जमणं धोक्याचं आहे, म्हणूनच महाराष्ट्र सरकारने परिपत्रक जाहीर करून यंदा मुंबईत, शिवाजी पार्कमध्ये न जमता घरूनच डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्याचं आवाहन केलं आहे.
गेली 15 हून अनेक वर्षे चैत्यभूमीवर नियमित येणाऱ्यांमधील एकजण आहेत डॉ.रेवत कानिंदें. चैत्यभूमीवरच्या आरोग्य शिबिरात दरवर्षी ते सहभागी होतात. मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉ. रेवत कानिंदेंशी या वर्षीच्या कोरोनाछायेतल्या महापरिनिर्वाण दिनाविषयी बोलायचं ठरविलं. जे जे हॉस्पिटलच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन या संघटनेतर्फे आरोग्यसेवा देतातच, पण त्यासोबत गेल्या तीन वर्षांपासून डॉ. रेवत, वैभव छाया, दिगंबर सुरलता, डॉ. खोब्रागडे अशी तरूण मित्रमंडळी चैत्यभूमीवर येणाऱ्या बालकांना, वैज्ञानिक दृष्टिकोन जागविणाऱ्या रंजक पुस्तकांचे मोफत वाटपही करतात.
डॉ. रेवत म्हणाले,”यावर्षीचा काळ सर्वच दृष्टीने वेगळा आहे. कोविड 19 वरची लस अजून प्रत्यक्षात आलेली नाही, संसर्ग काहीसा कमी झालेला दिसत असला तरी अश्या वेळेला मोठ्या गर्दीने जमून संकटाला आमंत्रण देणं बरं नाही. त्यामुळे शासनाने सांगितलेल्या सूचनांचे आम्ही पालन करणार आहोतच, इतर भीमप्रेमी जनताही सरकारला नक्कीच साथ देईल. मुळात आंबेडकरांचे अनुयायी धार्मिक सोहळा अथवा नवस वगैरे फेडायला अश्या कारणांसाठी चैत्यभूमीवर येत नाहीत. महापरिनिर्वाण हा दु:खाचाच दिवस आहे, पण डॉ.आंबेडकरांप्रति आपुलकी, आदर व्यक्त करायला देशभरातून लोक इथं येतात. यावेळी चैत्यभूमीचे लाईव्ह प्रसारण दूरदर्शनवरून सुरू राहणार आहे, त्यामुळे घरबसल्या आपण आंबेडकरांचे दर्शन घेऊ शकतो, घरच्याघरी फोटोला हार- फुलं वाहू शकतो. शेवटी धम्मपदातही हेच सांगितलंय, ‘आरोग्य परमा लाभा’!- चांगल्या आरोग्यासारखा दुसरा लाभ नाही, लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि यंदा घरूनच महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करावे.”
गेली तीनेक वर्षे बालकांचे कुतुहूल शमविणाऱ्या उदा. दही कसं लागतं?, बायोडिझेल म्हणजे काय?, अड्रॉईड फोन काय करतो, जीपीएस कसं काम करतं? तारा तुटतो तेव्हा काय होतं? समुद्राखालची जीवसृष्टी कशी असते? अमुक शोध कुणी लावला, कसा लावला अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं देणारी, पर्यावरण भान वाढविणारी, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला लावणारी अनेक पुस्तकं डॉ. रेवत आणि त्यांची मित्रमंडळी चैत्यभूमीवर येणाऱ्या बालकांना मोफत देतात. यासाठी ते सोशल मीडियावरून पुस्तकमदतीचे आवाहन करतात, मदत करू इच्छिणारे लोक ती पुस्तकं त्यांना पाठवितात किंवा दादरजवळच्या मॅजेस्टिक, आयडियलमध्ये ऑनलाईन पेमेंट करून पुस्तकं बाजूला ठेवायला सांगतात आणि यांची टीम ती पुस्तकं शिवाजी पार्कवर आणते. आलेल्या मुलांशी संवाद साधून, त्यांच्या मनातल्या शंका जाणून घेत, छोटे- छोटे प्रयोग करून देत ही पुस्तकं मुलांना भेट दिली जातात.
डॉ. रेवत सांगतात, “मोठ्यांसाठी तर शिवाजी पार्कवर पुस्तकांची रेलचेलच असते. पण ती सगळी सामाजिक चळवळींची, महापुरूषांची पुस्तकं असतात. लहानमुलांना वाचायला आवडेल, समजेल त्यांच्या ज्ञानात भर पडेल आणि मुख्य म्हणजे या संस्कारक्षम वयात विज्ञानाचे, लॉजिकचे संस्कार मुलांवर व्हावेत म्हणून हा उपक्रम सुरू केला. गेल्यावर्षी सुमारे 50 हजार रूपयांची डॉ. बाळ फोंडके, माधुरी शानभाग, अरविंद गुप्ता इ. ची पुस्तकं आम्ही वाटली. यावर्षी मात्र चैत्यभूमीवर हा कार्यक्रम नसला तरी मुंबईतील माझ्या परिचित वस्त्यांमध्ये, जे जे हॉस्पिटलच्या हॉस्टेलच्या परिसरात मी लहान मुलांना पुस्तकांचे वाटप करणार आहेच. त्याचवेळी नागपुरात डॉ. रावसाहेब खंदारे आणि औरंगाबादेत प्रवीण डाळिंबकर (अभिनेता, शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला ) हे सुद्धा त्यांच्या स्तरावर फिजिकल डिस्टन्सिंग पाळून पुस्तकवाटप करणार आहेत.”
याशिवाय दरवर्षी डॉ. रेवत आणि मित्रमंडळी चैत्यभूमीवर मुलांसाठी पोषण आहाराचे वाटप करतात, ज्यात जिलबी अथवा तत्सम गोड पदार्थांपेक्षा आरोग्यवर्धक अशी मोड आलेली कडधान्ये, उकडलेली अंडी, फळं वगैरे असतं, तिथं मासिकपाळीबद्दलच्या अंधश्रद्धांचे निराकरण केलं जातं, महिला आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन होते. यावर्षी या पोषण, माता- बालआरोग्य, मासिक पाळी व्यवस्थापन, शासकीय आरोग्यलाभ योजना अश्या वेगवेगळ्या विषयांवर डॉ. रेवत कानिंदे त्यांच्या वैयक्तिक फेसबुक अकाऊंटवरून तसेच ‘सारं काही समष्टीसाठी’ या पेजवरून देखील मार्गदर्शन करणार आहेत.
‘सारं काही समष्टीसाठी’ हा दलित साहित्य आणि कलेला व्यासपीठ देणारा कार्यक्रमही यावर्षी कोरोनामुळे होऊ शकला नाही, त्यामुळे या कार्यक्रमात आमंत्रित केलेल्या काही मान्यवरांची ऑनलाईन भाषणं, कला सादरीकरण, शॉर्ट फिल्म हे सर्व महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन दाखविण्याचा विचार आहे, असं या कार्यक्रमाचे आयोजक वैभव छाया यांनी सांगितलं. याखेरीजही व्याख्यानं आणि भीमगीतांच्या जलशांचे अनेक कार्यक्रम यावर्षी ऑनलाईन होणार आहेत.
याशिवाय भारतीय बौद्ध महासंघाने यंदा चैत्यभूमीवर दर्शनाला येण्यापेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहून व्यक्त व्हा आणि ते पत्र दादर, चैत्यभूमीच्या पत्त्यावर पाठवा, असं आवाहन केलंय.
– स्नेहल बनसोडे- शेलुडकर
#नवीउमेद
@Snehal Bansode Sheludkar