पोलीस म्हटलं की, नजरेसमोर पुरूषच येतो. धिप्पाड शरीरयष्टी, पिळदार मिशा असले रांगडेपण म्हणजे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी असतो. अर्थातच त्यामुळे या विभागात महिला असूनही त्यांचं स्थान कायम दुय्यम. साहेबांच्या आदेशांची अंमलबजावणी करत राहायची. कुठल्याही प्रकरणात साहेबांच्या परवानगीशिवाय लक्ष घालायचं नाही, असे महिला पोलिसांसाठी जणू अलिखित नियमच आहेत. पुरूष आणि महिला पोलिसांमधली ही दरी मिटविण्यासाठी राज्य पोलीस दलाने स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी शहरातील लोहारा पोलीस ठाण्याची संपूर्ण धुरा महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर सोपविली आहे. लोहारा हे जिल्ह्यातील पहिलेच महिला पोलीस ठाणे ठरले आहे.
पोलीस खातं अत्यंत व्यस्त, धावपळीचं आणि गुन्हेगारांवर वचक ठेवणारं आहे. खात्यातील महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वास वाव देऊन यवतमाळच्या पोलीस दलाने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पाऊल टाकले. पोलीस दलात महिला सक्षमीकरणाला बळ दिले जात आहे. त्यातूनच महिला पोलिस ठाण्याचा प्रयोग हाती घेण्यात आला. केवळ महिला अधिकारी व कर्मचारी या ठाण्याचा कारभार सांभाळत आहेत. इतर क्षेत्राप्रमाणे पोलीस खात्यातील कार्यरत महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अधिक सक्षमीकरण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एका पोलीस ठाण्यात महिला अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्याचे ओदश होते. त्याचाच एक भाग म्हणून महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लोहारा पोलीस ठाण्याची धुरा देण्यात आली. येथे ठाणेदारपासून ते शिपायापर्यंतची सर्व पदे महिलाच सांभाळत आहेत. एक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक आणि ५७ पोलीस कर्मचारी अशा एकूण ६० महिला कर्मचाऱ्यांना या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे.
विशेष महिला ही जबाबदारी कशी सांभाळतील, अशी शंका कोणीही उपस्थित केली नाही. त्यामुळे एकही पुरूष कर्मचारी या ठाण्यात कार्यरत नाही. अटक, पंचनामा, शवविच्छेदन, तपास, प्रतिबंधात्मक कारवाई, बिट अंमलदार, पेट्रोलिंग आदी सर्व कामे महिला कर्मचारीच करीत आहेत. महिला ठाणेदार म्हणून दीपमाला भेंडे यांच्याकडे प्रभार आहे. लोहारा हे यवतमाळातील गुन्ह्यांच्या बाबतीत अत्यंत व्यस्त पोलीस ठाणे आहे. या ठाण्यांतर्गत यवतमाळमधील औद्योगिक वसाहतीचा मोठा भाग येतो. मात्र महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही जबाबदारी लिलया पेलली आहे. पूर्वी प्रत्येक कामात पुरूष सहकाऱ्याची मदत व्हायची. ती कामे आता पुढाकार घेऊन जबाबदारीने पार पाडावी लागतात. स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्यास संधी मिळाल्याने एक वेगळेच समाधान येथील महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळते. पोलीस ठाण्याची जबाबदारी सांभाळत असताना कुटूंब आणि घराची जबाबदारीही तेवढ्याच सक्षमपणे ‘मॅडम-सर’ सांभाळत आहेत. ठाण्याची संपूर्ण जबाबदारी आली म्हणून घरातील जबाबदाऱ्या कमी झाल्या नाहीत. ते रूटीने पूर्वप्रमाणेच सुरू असल्याचे येथील काही जणींनी सांगितले. शिवाय महिला पोलिसांकरीता शासनाने आता आठ तासांच्या ड्युटीचा नियम केला आहे. त्यामुळे या निर्णयाने महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना व्यस्त कामकाजातून जरा दिलासा मिळणार आहे.
यासंदर्भात लोहारा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक दीपमाला भेंडे यांना विचारले असता, एखाद्या पोलीस ठाण्यात सर्वच अधिकारी व कर्मचारी महिला असणे हे आव्हानात्मक काम आहे. या निर्णयामुळे महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे काम करण्यास वाव मिळाला आहे. त्यामुळे निश्चितच जबाबदारी वाढली आहे. हे आव्हानात्मक काम करताना आनंदही होत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ‘मॅडम-सर’च्या युनिटला कडक सॅल्युट तर बनतोच!
नितीन पखाले, यवतमाळ