यश खेचून आणणारा,सातारी ‘लाड पॅटर्न’!

||अपना टाईम आएगा|| मालिकेचा पहिला भाग

“मी आठवीत जाईपर्यंत घरी साधं वीजेचं कनेक्शनही नव्हतं, आजूबाजूला झोपडपट्टीचा परिसर. जसजसं कळायला लागलं तसतसं काम करतच आपल्याला शिकायचं आहे, आई- वडिलांवर आपला भार होऊ द्यायचा नाही, ही समज आपोआपच आली. घरोघरी पहाटे पेपर टाकण्यापासून, हॉटेलातला वेटर आणि पोऱ्या म्हणून काम करण्यापासून, ते जुनी घरं पाडून त्याचा मलबा पाटीत वाहण्याचंही काम मी वडील आणि भावांसोबत केलेलं आहे.  अगदी लहानपणीची वर्षं वगळता असं शाळा- क़ॉलेजचं असं एकही वर्ष नसेल ज्या वर्षी मी फक्त अभ्यास केलाय. दहावीत गेल्यानंतर मी सोडून सगळ्या विद्यार्थ्यांना क्लास होते, मला घरच्या परिस्थितीपायी क्लास लावणं शक्य नव्हतं, पण मला कुठंच कमी पडायचं नव्हतं. घराशेजारी एक आचारी राहत होते, त्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत महिनाभर महाबळेश्वरला हाताखाली काम करायला येशील का, असं विचारलं. क्लासचे पैसे जमवण्यासाठी मी आणि वडील तिकडे गेलोही, आणि दहावीचा क्लासही माझ्या कमाईतून लावला. ” पुण्यातल्या प्रसिद्ध लाड रेस्टॉरंटचे मालक सनी शिवाजी लाड, त्यांच्या लहानपणीच्या संघर्षाविषयी सांगत होते.

त्याही आधीच्या आठवणी सांगताना सनी म्हणाले, “माझा जन्म दिल्ली ते फरिदाबाद ट्रेनमध्ये प्रवासात झाला. आई- वडील महाराष्ट्रातलेच. बालपण सगळं साताऱ्यातल्या यादव गोपाळ पेठ झोपडपट्टीत गेलं. आई पालेकर बेकरीत कामाला जायची, वडील मोलमजुरी करायचे. घरी आणखी एक मोठ्ठा भाऊ. वस्तीत आजूबाजूला व्यसनांचं, गरिबीचं, अशिक्षितपणाचं वातावरण. त्यातून वडिलांनाही काही काळ दुर्दैवानं दारूचं व्यसन लागलं. त्यातून ते बाहेरही आले, पण या सगळ्या कारणांनी आपण या वातावरणात राहायचं नाही, चांगलं शिकूयात- चांगलं काहीतरी करूयात ही खूणगाठ मी फार लहानपणीच बांधली होती. त्याला मुख्य कारण होतं, माझी आई- पद्मा लाड. अत्यंत मानी- स्वाभिमानी बाई, घरची परिस्थिती गरिबीची असली तरी कष्टाने चार घास प्रामाणिकपणेच कमवून खायचे, कुणापुढे कधीही हात पसरायचे नाहीत आणि कुठल्याच कामाला लाजायचं नाही, हे तिनं स्वत:च्या वागणुकीतूनच माझ्या मनावर ठसवलं होतं. आम्ही भावंडांनी शिकावं, चांगला अभ्यास करावा यावर तिचं विशेष लक्ष होतं. आणि मलाही अभ्यास करायला आवडायचं, आठवीपर्यंतचं शिक्षण नगरपालिकेच्या शाळेतच झालं, तोपर्यंत पहिल्या तीनांतला नंबर कधी सोडला नाही मी. नंतर सेमी इंग्लिश माध्यमाच्या एका शाळेत मी प्रवेश घेतला. कारण मला पुढे पुण्याला शिकायला जायचं हे मी ठरवून टाकलं होतं, आपण कुठं कमी पडायला नको असं वाटायचं. मला शिकायचं होतं, खूप प्रगती करायची होती, ती प्रामुख्याने माझ्या आईसाठीच!”

लाड रेस्टॉरंटचे सनी लाड खासदार डॉ. अमोल कोल्हेंसमवेत

“लहानपणी वस्तीत मला वाईट वळण लागू नये, म्हणून आई काळजी घ्यायची. घराजवळ मंदिर होतं, रामकृष्णआश्रमाचे लोक तिथं यायचे, तिथं मी रोज एकदातरी जायचो. श्लोक, अभ्यास कसा सुरू आहे वगैरे अश्या चौकश्या व्हायच्या. या लोकांना माझ्या धडपडीचं कौतुक होतं, काम करत मी अभ्यास करतोय आणि उत्तम गुण मिळवतोय, त्याबद्दल हे लोक प्रोत्साहन द्यायचे. खरंतर दहावीत चांगले मार्क मिळाले होते म्हणून मला इंजिनिअरिंगला जायची इच्छा होती, पण फी वगैरे भरायला तेवढे पैसे साठवणं शक्य नसल्याने, मी कॉमर्स साईडला प्रवेश घेतला. एकतर आपण सीए करूयात किंवा स्पर्धा परीक्षा देऊयात, आणि लवकर चांगल्या नोकरीला लागूयात हे डोक्यात होतं. रामकृष्णआश्रमात येणाऱ्या शशिकांत चव्हाण सरांनी, तू स्पर्धा परिक्षेत उत्तम गुणांनी पास होशील असा विश्वास मला दिला. कॉलेज शिकत शिकत सुद्धा मी वेटर म्हणून हॉटेलात काम करतच होतो, कॉलेजातल्या समवयीन मित्रांना मात्र मी हे असलं काम करतो, हे कधीच कळू नये असं वाटायचं. त्यांना मी कधी घरीही बोलवायचो नाही. तरीही त्यातल्या काही मोजक्या दोस्तांना माझी परिस्थिती माहिती होती, पण खऱ्या मित्रांना तुमची घरची परिस्थिती कशी आहे, त्यानुसार काहीच फरक पडत नाही म्हणतात, तिथं फक्त मैत्री महत्त्वाची असते हे लवकरच कळलं” सनी पुढं बोलत होते.

पुढं स्पर्धा परीक्षेचं शिक्षण घेण्यासाठी सनी लाड पुण्यात आले. साठवलेल्या पैश्यातून चाणक्य मंडळचा क्लास लावला. पैसे वाचवण्यासाठी सुरूवातीला पर्वती ते नवी पेठ चालत यायचे, दोनदा जेवण्याऐवजी एकदा वडापाव खाऊन भागवायचे. अभ्यास जोमाने सुरू केला, पण कधी कधी भूक आपलं अस्तित्त्व दाखवून द्यायचीच. सनी सांगतात, “पुढे मी नवी पेठेतच राहायला आलो. सकाळी खरंतर मी वडापाव खायचो, पण त्या दिवशी मेसमध्ये स्वीटसह पूर्ण थाळी खाण्याची इच्छा झाली. ती संडे स्पेशल थाळी ६५ रूपयांना होती आणि माझ्या खिशात ६० रूपयेच होते. डोळ्यासमोर चपाती, भाजी, वरण- भात आणि गोडासह पूर्ण जेवण नाचायला लागलं, आज जेवायचंच असं मी ठरवलं. मेससमोरच्या रांगेत माझ्यासारखाच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारा एक अनोळखी विद्यार्थी होता, त्याला म्हणलं ‘दादा, मला पाच रूपये देतोस का, जेवायचं आहे रे, पाच रू. कमी पडतायेत’ त्यावेळी त्या मुलाने ‘ए चल निघ इथून, पैसे कसले मागतोस!’ असं हेटाळत मला जवळपास झटकूनच टाकलं. त्याचं बोलणं मला इतकं जिव्हारी लागलं की डोळे आपोआप पाण्याने भरून आले. आपल्याला साधं मनासारखं पोटभर खाता येत नाही, आणि पाच रूपयेही कुणाकडून हक्काने मागावेत, एवढीही आपली पत नाही, याचा भयंकर त्रास झाला. आयुष्यात असला अपमान नको असेल, तर पैसा महत्त्वाचा आहेच, ही खूणगाठ परत एकदा मनाने बांधली ”

दुर्दैवाने एका प्रयत्नात सनी लाड स्पर्धा परिक्षेत यशस्वी होऊ शकले नाहीत. आपल्याला क्लास लावूनही यश मिळालं नाही, याचा त्यांना खूप त्रास झाला. गावी परत गेल्यावर लोकांनी तू पुण्यात पैसे उडवले, मजा केली, पास कसा झाला नाहीस असे वाट्टेल ते आरोप केले. या सगळ्याचा परिणाम म्हणून ते डिप्रेशनमध्ये गेले. स्पर्धा परिक्षा हे मोहजाल आहे आणि काहीसं मानसिक- आर्थिक स्थैर्य लाभल्याशिवाय त्यात आपल्याला यश मिळणं शक्य नाही हे त्यांना कळून चुकलं होतं. पुन्हा कमाईसाठी पुण्यात आले, पुन्हा एका हॉटेलात काही महिने काम केलं, काही महिने अक्सिस बँकेतही नोकरी केली. पण फक्त नोकरी करणं इतकं लिमिटेड ध्येय कधीच नसल्याने त्यात ते रमले नाहीत. हॉटेल इंडस्ट्रीत लहानपणापासून काम केल्याने त्यांना त्यातले खाचखळगे माहीत होते. आणि पुण्यात खवय्यांची कमी नाही, हे जाणून असल्याने त्यांनी स्वत:चे सातारी चवीचे नॉनव्हेजचे रेस्टॉरंट सुरू करायचं ठरवलं.

लाड रेस्टॉरंटमध्ये लागणारा मसाला ते स्वत:च तयार करतात

“या सगळ्यासाठी पैश्यांची जुळवाजुळव सुरू केली. अडीच लाखांचं माझं सेव्हिंग झालं होतं, त्यात 20-30 हजार रू. महिना भाडं असलेली जागा बघूया आणि हळूहळू सेटअप करूयात असा विचार केला. पिंपरी- चिंचवड परिसरात जागा बघायला लागलो, पण माझा अंदाज आणि जागांची भाडी- डिपॉझिट यात जमीन अस्मानचा फरक होता. वाकडमध्ये एक जागा फार आवडली, पण १,१०,००० रू. भाडं आणि दहा लाख रू. डिपॉझिटच होतं. एवढा पैसाच आपल्याकडे नव्हता. त्यावेळी माझं लग्नही ठरत होतं, माझ्या पत्नीनं प्राचीनं माझ्यावर विश्वास टाकला. ती स्वत: आयटी इंजिनिअर आहे, तिनं पाच लाख रूपयाचीं मदत केली, तिच्या ताईने श्वेता शेलार यांनी पाचेक लाख रूपयांची आणि त्यांच्या एका सहकाऱ्यानेही पाचेक लाख रूपयांची मदत केली. आणि सनी, तुम आगे बढो असा विश्वास दिला.”

लाड रेस्टॉरंटची प्रसिद्ध नॉनव्हेज थाळी

२०१८ मध्ये वाकड परिसरात मांसाहारी खवय्यांसाठी लाड रेस्टॉरंट सुरू झालं खरं, पण त्याआधी सनी यांच्या भावाचे अचानक अपघाती निधन झालं. हा सेटबॅकही मोठ्ठा होता, पण आता काही झालं तरी खचायचं नाही या ध्येयाने त्यांनी रेस्टॉरंटचे उद्घाटन केलं. ते करताना फार सेव्हिंग्जही शिल्लक राहिली नव्हती. तरीही बेस्ट चव, दर्जेदार पदार्थ आणि उत्तम आदरातिथ्य या जोरावर आपण उत्तम व्यवसाय करू हा विश्वास सनी लाड यांना होता. आणि तो १०० टक्के खरा ठरला. अस्सल सातारी चवीचा मटण चिकन ठेचा, आळणी भात, आणि स्पेशल मटण- चिकन थाळी यासाठी लाड रेस्टॉरंटचं नाव पुण्यात गाजतंय. त्यांनी नीट नियोजन करून व्यवसाय केल्याने अगदी लॉकडाऊनच्या अवघड काळातही ते तरून निघाले.

“पूर्वी खोलीचं २७०० रू. भाडं कसं भरायचं अशी चिंता मला सतावायचीं, आज आई- वडिलांच्या आशीर्वादाने, पत्नी आणि मित्रांच्या उत्तम साथीने व्यवसाय तर चांगला सुरूच आहे, शिवाय सरकारला १०-१२ लाखांचा नुसता जीएसटी देऊ शकतोय. आज लाड रेस्टॉरंटमध्ये ४२ जणांचा स्टाफ नोकरीवर आहे, त्यांची कुटुंबं आपल्यावर आहेत आणि आई पद्मा लाडचे अत्यंत सचोटीने व्यवहार करायचे संस्कार आहेत. अडचणी सगळ्यांनाच येतात, पण मी सांगू इच्छितोय की- कुठलंही काम करायला लाजू नकात आणि जे काम कराल त्यात सर्वोच्च यश मिळविण्याचा १०० टक्के प्रयत्न करा- मग तुम्ही एक मेकॅनिक का असेनात?  मेहनत केलीत तर एक दिवस स्वत:चं टिपटॉप गॅरेज होणंही अशक्य नाही. माझाही प्रवास मी थांबवलेला नाही, पुढं आणखी बरंच काही करायचंय” सनी लाड समाधानाने सांगत होते

लेखन: स्नेहल बनसोडे- शेलुडकर, संपर्क- नवी उमेद, पुणे

#ApnaTimeAaega

#अपनाटाईमआएगा

#सनीलाड

#लाडरेस्टॉरंट

#पुणे

#सातारा

#स्वयंरोजगार

 

Leave a Reply