लॉकडाऊन सुरू झालं आणि नंतर महिन्याभरातच स्थलांतरीत मजुरांनी आपापल्या गावी जायला सुरूवात केली. नाशिक शहरही या सगळ्याला अपवाद नव्हतं. शासन, स्वयंसेवी संस्थांनी पायपीट करत जाणाऱ्यांसाठी बस वगैरेसारख्या सोयी केल्या, अन्नाचीही सोय केली. पण त्यांच्यासोबत असलेल्या चिमुकल्यांच्या भुकेचा प्रश्न होता.
विशेषतः अंगावर दूध पिणाऱ्या, दोन वर्षाच्या आतील बालकांचे हाल होत होते. याच बालकांना डोळ्यासमोर ठेवत हर्षल गांगुर्डे आणि त्यांचे सहकारी ‘हेल्पींग हॅण्ड’ बनून पुढे आले. एक स्तनदा माता परिसरातील काही लोकांकडे दुधासाठी मदत मागताना दिसली त्यातून ही संकल्पना सुचल्याचं हर्षल सांगतो. यामुळे पायपीट करणाऱ्या मजुरांच्या कडेवरील लहान बाळ असो वा चारचाकी वाहनाच्या खिडकीतून डोकावणारे चिमुकले सगळ्यांसाठी ‘यहाँ बच्चो को मुफ्त में दूध मिलेगा’ असे फलक हाती घेत टोल नाका, मुख्य रस्त्यावर हेल्पींग हॅन्डची टीम उभी राहिली. उन्हामध्ये पायी चालणाऱ्या स्तनदा मातेच्या शरीरातील पाणी कमी झाल्याने बाळाला दूध कुठून येणार. बाळाची भूक बाहेरच्या अन्नावर भागणारी नाही. अशावेळी हे दूध त्यांच्यासाठी संजीवनी ठरते.
हेल्पींग हॅन्डमधील कोणाकडेही दुधाची विचारणा केली तर जीवनसत्वे व प्रोटीनयुक्त दुधाची बाटली त्या तान्हुल्यांच्या हातात सोपवली जाते. अन्य काही सामाजिक संस्थांनीही यात सहभाग घेत लहान मुलांसाठी दूध संकलनास सुरूवात केली आणि दुधाच्या किटल्या हेल्पिंगकडे सुपूर्द केल्या. आत्ता पर्यंत शेकडो लीटर दूध बालकांना देण्यात आलं आहे. मुंबई आग्रा महामार्ग, टोल नाका, चांदवड शहरात प्रवेश करेपर्यंत ही सेवा अखंड सुरू असल्याचं हर्षलने सांगितलं.
– प्राची उन्मेष, नाशिक