या वर्षी माडिया आदिवासी समाजाला मिळाली आपल्या समाजातली पहिली महिला डॉक्टर

 

गडचिरोली जिल्ह्यातल्या घनदाट अरण्यात राहणारा माडिया आदिवासी समाज. मूलभूत सुविधांपासून वंचित हा समाज. त्यांच्या लेखी सर्वात मोठं गाव सिरोंचा. याच वर्षी या समाजाला आपल्या समाजातली पहिली महिला डॉक्टर मिळाली आहे. तिचं नाव कोमल श्यामला कासा मडावी.
कोमल सिरोंचा तालुक्यातल्या झिंगानूर गावची. ”झिंगानूरच्या प्राथमिक शाळेत शिकताना या जंगलापलीकडे आयुष्य असेल असं कधी वाटलं नव्हतं.” कोमल सांगते. वैद्यकीय सुविधांअभावी आदिवासींचे होणारे हाल तिनं लहानपणापासून पाहिले आहेत. आई श्यामला आरोग्यसेविका. आदिवासींच्या आरोग्याबाबत आईची तळमळ तिने पाहिली होती. वडील कासा मडावी अल्पशिक्षित शेतकरी. आपल्या दोन्ही मुलींनी खूप शिकावं अशी या आईवडिलांची इच्छा. त्यांच्या प्रेरणेतूनच वैद्यकीय शिक्षणाची वाट गवसल्याचं कोमल सांगते.


आईची सिरोंचाला बदली झाल्यानंतर कोमलचं चौथी ते दहावीपर्यंतचं शिक्षण सिरोंचाला झालं. मग पुढचं शिक्षण नागपूरला घेण्याचा वडिलांचा आग्रह. तिथे वसतिगृहात राहून बारावीपर्यंतचं शिक्षण. वैद्यकीय प्रवेश पूर्वपरीक्षेत पहिल्या प्रयत्नात यश मिळालं नाही. मग एक वर्ष घरीच अभ्यास करून दुसऱ्या प्रयत्नात कोमल उत्तम गुणांनी ही परीक्षा उत्तीर्ण झाली. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तिला प्रवेश मिळाला.
सिरोंचा, नागपूर, यवतमाळ या प्रवासात भाषेपासून, आहार, वेषभूषेपर्यंत अनेक अडचणी होत्या. पण मित्रमैत्रिणींची सोबत आणि प्राध्यापकांचं मार्गदर्शन यामुळे सगळ्या अडचणींवर मात करता आली, असं कोमल सांगते. ”अतिदुर्गम भागातले आहोत, दुर्लक्षित समाजातले आहोत, याची जाणीव शिक्षणाच्या आड कधीच आली नाही.”
आता यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आंतरवासिता म्हणून ती शिक्षणक्रम पूर्ण करणार आहे. त्यानंतर पुढे याच क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण. ते झाल्यावर झिंगानूर, सिरोंचा भागात आदिवासी बांधवांना ती सेवा देणार आहे. माडिया आदिवासी मुख्य प्रवाहात यावा, त्याच्या समस्या दूर व्हाव्या यासाठी कोमलला प्रयत्न करायचे आहेत. कन्ना मडावी हे माडिया समाजातले पहिले डॉक्टर. अहेरीला ते रुग्णसेवा करतात. त्यांची भेट बळ देणारी ठरल्याचं कोमल आवर्जून सांगते.
विशेष म्हणजे तिच्या बहिणीने पायलनेही तिच्यापासून प्रेरणा घेतली आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला पायल शिकत आहे.

– नितीन पखाले, यवतमाळ

Leave a Reply