राखेतून झेप घेणारा फिनिक्स- नीता सोनवणे

मी मुळची नागपूर जिल्ह्यातील मौदा या तालुक्यातील चिरवा या गावची. जन्म धानला गावात झाला होता, कारण वडील नोकरीमुळे तेव्हा तिथं स्थायिक होते. पण आईच्या मृत्यूनंतर आम्ही मूळगावी चिरवा येथे राहायला गेलो. आई- वडिलांचं सुख आम्हां भावंडांच्या फारसं नशिबातच नव्हतं. मी नऊ वर्षांची असताना आधी माझी आई गेली. भावंडात माझा नंबर पाचवा. घरात खाणारी तोंडं भरपूर, वडिलांना एकट्याने नोकरी करून संसार सांभाळणं अवघड होतं, आणि गावातल्या लोकांनी भरीला घातल्यामुळे वडिलांनी दुसरं लग्न केलं. वडील जिल्हा बँकेत गटसचिव होते, घरी खाऊन- पिऊन बरी परिस्थिती होती. पण दुर्देव असं की आई गेल्यानंतर तीनच वर्षात, वडील आणि दुसरी सावत्र आई एका अपघातात अचानक गेले. हा आयुष्यातला सर्वात मोठ्ठा आघात. माझे वडील ग्रामीण भागात राहूनही प्रगत विचार करणारे, मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे, लाड- कौतुक करणारे होते. वडील गेल्यावर अपघातस्थळी जाऊन पाहणाऱ्यातली भावंडांपैकी मीच पहिली होते. अवघं १२- १३ वर्षांचं वय असेल माझं, पण अपघात होऊनही वडिलांचा शांत- प्रेमळ चेहरा जश्याच्या तसा होता, फक्त डोक्याला मार लागल्याने रक्ताची धार लागलेली. माझ्या वडिलांना आणि आईला कसलीच मदत मिळाली नाही आणि ते ऑन द स्पॉट गेले याचा त्रास मला आजही होतो.

नीताचे दिवंगत आई- वडील

या प्रसंगानंतर आम्ही भावंडं खरोखर अनाथ, पोरकी झालो. याच अपघातात नऊ महिन्यांची आमची सावत्र बहीण मात्र बचावली. आता आमच्या घरात सावत्र बहिणीसह पाच बहिणी आणि दोन भाऊ. आम्ही अक्षरश: एकट्याने वाढलो, घरात वडीलधारं कुणीच नव्हतं, ना कुठल्या नातेवाईकाने आम्हांला सांभाळायला नेलं. आम्ही भावंडं आमचं आम्हांला जमेल तसं जगत गेलो. तेव्हा मोठ्या बहिणीचे लग्न झालेले होते, ती आणि भावजी मात्र अधूनमधून हिंगण्यातून खास आम्हांला भेटायला, आमची काळजी घ्यायला, घरच्या शेतीच्या व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करायला यायचे. ताईच आमची दुसरी आई झाली, पण ती ही पूर्ण वेळ थांबू शकायची नाही तिलाही तिचा संसार होता.

वडिलांच्या जागी मोठा भाऊ कामाला लागला, पण त्याचंही वय केवळ १५ वर्षांचं होते, त्यामुळे त्याला रोजंदारीच्या कामावर लागावं लागलं, १८ वर्षांचा होईपर्यंत. घरची परिस्थितीच बदलून गेली, आर्थिक परिस्थिती फारच खालावली, खाण्यापिण्याचे हाल होऊ लागले. दोन बहिणींचे लग्न झाले होते, घरी असलेल्या आम्ही दोघी बहिणी शेजारपाजारच्या शेतात मजुरीला जायचो. हे भावाला कळू न देता करायचो, कारण त्याला आम्ही असं काम करतोय वगैरे अजिबात आवडायचं नाही. त्यात गावातील लोकांची मानसिकता आईवडील नसणाऱ्या मुलींना  कसं वागायचं ते शिकवणारी. एकंदरीत काय तर सदैव मान खाली घालून चालायचे आणि प्रश्न विचारायचे नाहीत आणि खळखळून हसणे तर विसरूनच जायचे. त्यामुळे सदैव बंधनात राहण्याची सवय लागली. नेमक्या याच मानसिकेतत जगताना मला आजारांनी विळखा घातला.तेव्हा सुरू झालेली डोकेदुखी आजही कायम आहे. कावीळ,टॉईफाईड,मासिक पाळीचा त्रास, डेंग्यू,टीबी आणि छोट्या मोठ्या अपघातामुळे झालेले फ्रँक्चर यामुळे शरीर नेहमीच रोगी..! एकंदरीत काय आयुष्याने दिलेल्या भयंकर तडाख्यांने मी उद्ध्वस्त झाले होते, गोष्टी मनातल्या मनात ठेऊन माझं शरीर आजारांचं माहेरघर झालं होतं. त्यात आई वडील गेले असले तरी त्यांनी दिलेले संस्कार विसरायचे नाहीत, त्यांच्या मानसन्मानाला तडा जाऊ द्यायचा नाही, हे मनात ठेऊनच मी पुढे जात होते.

पण मला वडील आठवतात ते ग्रामीण टिपिकल विचारसरणीपेक्षा कायम पुढारलेल्या विचारसरणीचे, गरज पडेल त्याच्या मदतीला धावून जाणारे, उदार मनाचे. त्यांचा तो वारसा नकळत माझ्यातही उतरला आहे. मला आठवतंय मी अकरावीत असताना गावातल्या एका घराला आग लागली होती. आग पसरायला लागली, दोन घरं त्या आगीच्या विळख्यात सापडली. गावकऱ्यांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली होती, मला मात्र ते बघवले नाही. मी हातात पाण्याची बाटली घेतली आणि मिळेल ते पाणी अक्षरश: गटारातलं पाणी सुद्धा टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. हे करताना कित्येकदा घसरून पडले. बघे मात्र माझी फजिती बघत हसत होते. आग विझवणाऱ्यांची संख्या तोकडी होती, त्यामुळे न राहवून मी हसणाऱ्यांना  सुनावलंच. तरीही निर्दयी पुरूष काही पुढे आले नाहीत, मात्र माझं पाहून काही मुली पुढे सरसावल्या. आग विझली तर नाहीच, मात्र मी षंढ बनून बघत बसले नाही, याचं समाधान वाटलं. घरी मात्र बहीण भावांना माझा हा ‘आगाऊपणा’ अजिबात आवडला नाही, त्यांनी मला चांगलंच रागावलं.त्याकाळी अश्या ठिकाणांहून आलेल्या लोकांना घरात घेतलं जायचं नाही, माझीही आंघोळ घराबाहेर झाली. त्यानंतर मला ताप चढला, आठवडाभर, ताप अंगदुखी आणि गटाराचा वास आठवत, भावा- बहिणीची बोलणी खात पलंगावर पडूनच होते.

क्राईम बीटमध्ये ओळख निर्माण करणारी नीता

मला अन्याय दिसला की गप्प बसवत नाही. १७ वर्षांची असताना मी पुढाकार घेऊन चिरवा गावात दारूबंदीही केलीये. गावात दारूची दुकानं वाढत चालली होती, बायकांचे हाल, दारूड्यांचा त्रास  आणि पोलिसांचे मात्र दुर्लक्ष. एकदा आमच्या गावात मंत्रीसाहेब आले होते, त्यांची भाषणबाजी सुरू झाली तसा माझाही पारा चढत होता. मंत्री महोदयांचे भाषण संपताच मी पुढे जाऊन, “मला बोलायचंय” म्हणत माईक हाती घेतला. आणि मग मागचापुढचा विचार न करता मंत्री साहेबांसमोरच गावची खरी परिस्थिती, दारूच्या दुकानांमुळे होणारी दुरावस्था, पोलिस कसं दुर्लक्ष करतात तेही सांगितले. मग काय दुसऱ्या दिवशीच पोलिसांनी कारवाई करणं भागच होतं, गावातील दारूची दुकानं ताबडतोब बंद झाली. त्यात आमच्या नातेवाईकाचेही दुकान होतं. जवळपास चारेक महिने ही दारूबंदी राहिली. त्यानंतर कॉलेजला असताना मी अनधिकृत  झोपड्या सुद्धा हटवल्यात. या मोबदल्यात मला लोकांकडून आणि घरच्याच बहीण भावाकडून भरपूर शिव्या शापही मिळाले.

याशिवाय रस्त्यावर पडलेल्या अपघातग्रस्तांची मदत करण्याला माझे प्राधान्य असायचे. वडील अश्या अपघातात गेल्याने, त्यांना पाणी तरी मिळाले असेल का हा विचार माझ्या डोक्यातून आजही जात नाही. त्यामुळं माझ्यासमोर एखाद्या दारूड्याचा जरी अपघात झाला तरी मी आधी जाऊन पाणी पाजते. असाच एकदा म्हाताऱ्या आजीचा डोळ्यादेखत अपघात झाला, तेव्हा रक्ताने भरलेल्या त्या आजींना मी स्वत: उचलून रस्त्याच्या कडेला ठेवलं होतं. अशी मदत शक्य तितक्या लोकांना आजही करते. पुढे महाविद्यालयीन जीवनातही दबंगगिरी कायम होती कधी बस रोको, तर कधी छेड काढणाऱ्यांची धुलाई. एकदा तर एकाने माझी छेड काढली , मग काय त्याच्या घरात शिरून कानशिलात लगावली. ही बातमी गावभर पसरली होती, पण माझ्या भावाला मात्र हा सगळा आगाऊपणा वाटायचा आणि मग त्याने माझं कॉलेजला जाणंच बंद केलं.

पुढे आम्ही नागपुरात राहायला आलो. मला शिक्षण थांबवायचं नव्हतं. मी पुढे एम.ए., ए.टी.डी, बी.एम.सी. आणि आता एमएसडब्ल्यू (क्रिमीनॉलॉजी) करतेय. नागपूरला  राहायला आल्यानंतर २ ते ३ वर्षातच मी लोकमत वृत्तपत्रात वार्ड अँम्बेसेडर म्हणून बातम्या लिहू लागले. पैसे मिळत नव्हतेच मात्र माझ्या बातम्यामुळे  वॉर्ड सुधारणा होत होत्या, त्यातही अनेकांशी शत्रुत्व घेतले. ऑगस्ट २००४ पासून मी गुन्हे क्षेत्राशी संबंधित साप्ताहिकांत क्राईम स्टोरीज लिहीतेय. महाराष्ट्र पोलिसांच्या दक्षता मासिकातही लिहायचे. आजपर्यंत माझ्या ४०० च्या वर क्राईम स्टोरीज प्रकाशित झाल्यात. याशिवाय माझे शिदोरी नावाचे पुस्तक आणि नवक्रांती नावाचे मासिकही काही काळ चालवले. पुढे आर्थिक अडचणींमुळे ते बंद करावे लागले. सध्या मी ‘नवी उमेद’ , ’ जयाद्री महाराष्ट्र’ ,’ पोलिस टाईम्स’ इ. ठिकाणी मुक्त पत्रकार म्हणून काम करतेय आणि एका नामांकित कंपनीत नोकरी सुद्धा करतेय.

महाराष्ट्र पोलिसांच्या एका कार्यक्रमात भाषण करताना नीता

माझं काम आणि नीडरपणा बघून लोकमतच्या वरिष्ठ उपासंपादकांनी मला क्राईम बिटमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. माझं तेव्हा पत्रकारितेचे शिक्षण झालं नव्हतं, पण मी  प्रयत्न केला तो क्राईम स्टोरी लिहिण्याचा..त्यावेळी साप्ताहिक पोलिस टाईम्स मध्ये  ऑगस्ट २००४ मध्ये माझी पहिलीच मर्डर स्टोरी फ्रंट पेजवर पहिल्या नंबरवर लागली. तो महाराष्ट्रात गाजलेला खून होता- अक्कू यादव हत्याकांड. दोन- अडीचशे महिलांनी  नागपुरात न्यायालयाच्या आवारात अक्कू यादव या गुंडाची हत्या केली होती. हा लेख खूपच गाजला मग मी दक्षता मध्येही लिहू लागले.

हे सगळं सुरू असताना ‘पाऊल वाकडं पडू द्यायचं नाही’ हे बहिणीनं बजावलेलं आणि चांगलं शिक्षण घेईन हा दुसऱ्या भावाला दिलेला शब्द मी आजही पाळतेय. काही वैद्यकीय कारणांनी, लहानपणीच्या मोठ्या मानसिक आघातांमुळे मी लग्नच न करण्याचा निर्णय घेतला. आजही मी सिंगलच आहे.बाहेरच्यांसोबत दोन हात करताना कधीच मागे हटली नाही मात्र मी  कमजोर पडते ती फक्त कुटूंबापुढे…!  कारण नाती जपायची असतील तर मान अपमान बाजूला सारून आंधळ्या बहिऱ्याचं सोंग घ्यावे लागते. मी ही तेच केलं, माझा समाजकारणाचा किडा, माझी पत्रकारिता, पंगे घेण्याचा स्वभाव या गोष्टी बहीण- भावांना कधी पटल्याच नाहीत.माझ्या या कामामुळे घरच्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेत मी माझ्या मर्यादा व तत्वं पाळूनच या क्षेत्रात काम केलं. तरी मोठी बहीण सोडली तर बाकीची भावंडं या कामाच्या विरोधातच होते आणि अजूनही आहेत. शेवटी माझाही स्वाभिमान आडवा आला. त्यामुळे अडीच वर्षापूर्वी ऐन कोविड काळात भावाचे राहतं घर मी सोडलं. हातात पैसाही नव्हता. यावेळी जवळची नाती दुरावली आणि दुरची माणसं जवळ आली. सामान शिफ्ट करताना मित्रमंडळ आणि एकटीच्या संसाराला लागणारं सामान जमा करायला बहिणीची मैत्रीण सीमाताई बालकोटे आणि माझ्या  बहिणीही धावून आल्यात.

स्वतंत्र राहायला लागल्यावर माझे समाजसेवेचे काम चांगलंच वाढलं आता बंधनं घालणारं कुणीच नव्हतं. मला वृद्धाश्रमात, आसपाच्या वृद्ध गरजूंना मदत करायला फार आवडते. आई वडिलांचा सहवास तर मला लाभला नाही, त्यांच्यात मी माझे आई- वडील पाहते. माझं क्राईम बीट असल्याने पोलिस, गुन्हेगार, गुन्हे, गुंडांचा ससेमिरा, लॉकअपनमध्ये बसून आरोपींची केलेली चौकशी या सगळ्याची मला सवय आहे, भीती कशाचीच वाटत नाही. सुरूवातीच्या काळात तर नागपुरात क्राईम स्टोरीज करणारी मी एकमेव महिला पत्रकार होते. माझी चण, कमी उंची पाहून लोकांना वाटायचं ही काय करेल. पण या गोष्टींवर विश्वास न ठेवणाऱ्या अनेकांना मी माझ्या कामातून कर्तुत्त्व दाखवून दिलंय. असंच एका ठिकाणी खून झालेला असूनही आत्महत्येची नोंद झालेली. कुटुंबही माहिती देण्यास तयार नाही, तुम्ही महिला असून आम्हांला काय मदत करणार असं ते विचारत होते. त्यावेळी मी माझी सूत्रं कामाला लावून, पोलिसांशिवायच थेट महिला आरोपीच्या घरी पोहोचले. फोटो काढले, माहिती घेतली. मला चँलेंज करणाऱ्या अधिकाऱ्यासमोर वरिष्ठांना झाल्या प्रकाराची माहिती दिली. त्या अधिकाऱ्याचे निलंबन तर झालेच शिवाय सात गुन्हेगार गजाआड गेले.

वृद्धाश्रमातील आजोबांचे आशीर्वाद घेताना नीता

एकूणच आयुष्याने खूप परीक्षा पाहिलीये. न घाबरता मी सामोरी जातेय, स्वत:तली संवेदनशीलता हरवू देत नाहीए. माझ्या पोलीस टाईम्स, दक्षता आणि इतर केलेल्या लिखाणावरून लोक मला ओळखायला लागले. अनेकांची कौतुकाची पत्रं आली, रेल्वेत सहप्रवासी तुम्ही नीता सोनवणे ना, म्हणून ओळखतात तेव्हा फार समाधान वाटतं. कामाची पावती म्हणून दोन पुरस्कार आणि एका शाळेकडून सन्मानचिन्ह मिळालंय. हे सगळं होण्यात सुदेश जैन या माझ्या मानसपित्याचा उल्लेख करायलाच हवा. ते नागपूर न्यूजपेपर एजन्सी चालवायचे. त्यांनी शिक्षणापासून, बिझनेसपर्यंत मला मार्गदर्शन, आर्थिक मदत आणि वेळोवेळी मानसिक आधार दिलाय. दुर्दैवाने हे कौतुक पाहायला आई वडील तर नाहीतच पण जैन सर सुद्धा या जगात नाहीत.

आजकाल काही तरूण मुलं- मुली आम्हांला तुमच्यासारखं व्हायचंय, म्हणतात तेव्हा आश्चर्य वाटतं, खरंच मी इतकं काही केलंय का? माझ्यावर अक्षरश: अत्महत्या करण्यासारखी परिस्थिती ओढवली कित्येकदा, पण आहे त्यात समाधान मानणं, आणि आई- वडिलांचे संस्कार यावर मी पुढे जात राहिले. यात माझ्या ताई- जिजूंचे, जैन सरांचे आशीर्वाद आणि मित्र- मैत्रिणींची मोलाची साथ आहे.

 

लेखन: नीता सोनवणे, नागपूर

 

#नवीउमेद

#नागपूर

#ती_चं_आत्मभान

#महिलासक्षमीकरण

#महिलापत्रकार

#Crimereporter

 

 

Leave a Reply